बोट्स्वाना : दक्षिण आफ्रिका खंडातील एक भूवेष्टित स्वतंत्र देश. १९६६ पर्यंत ब्रिटीशांची वसाहत असलेला हा देश ‘बेचुआनालँड’ या नावाने ओळखला जाई. हा देश १७० ४७’ द. अक्षांश ते २६० ५४’ द. अक्षांश आणि २०० पू. रेखांश ते २९० २१’ पू. रेखांश यांदरम्यान पसरलेला आहे. क्षेत्रफळ ५,७५,००० चौ. किमी. लोकसंख्या ८,१९,००० (१९८० अंदाज). ईशान्येस व पूर्वेस झिंबाब्वे (ऱ्होडेशिया), आग्नेयीस व दक्षिणेस द. आफ्रिका प्रजासत्ताक, पश्चिमेस व उत्तरेस नामिबिया आणि झँबिया, यांनी हा देश वेढलेला असून याच्या उत्तर व दक्षिण सरहद्दीवरुन अनुक्रमे झँबीझी आणि मोलोपो या नद्या वाहतात. गाबरोनी (लोकसंख्या ५४,००० – १९८०) ही देशाची राजधानी होय.

भूवर्णन : हा देश द. आफ्रिकेतील पठारी प्रदेशात मोडतो. देशाचा बहुतेक भाग ⇨ कालाहारी  वाळवंटाने व्यापलेला आहे. भूरचनेच्या दृष्टीने पश्चिमेकडील कालाहारी वाळवंटी प्रदेश व पूर्वेकडील लहानलहान टेकड्यांचा प्रदेश, असे देशाचे प्रमुख दोन भाग पडतात. कालाहारी वाळवंटाने २४० पू. रेखांशापर्यंतचा (निम्म्यापेक्षा जास्त) देशाचा पश्चिमेकडील सर्व भाग व्यापला असून, हा प्रदेश समुद्रसपाटीपासून सरासरी ९०० मी. उंचीचा आहे. या प्रदेशात कँब्रियन-पूर्व काळातील खडकांवर वाळूचे थर साचून हे वाळवंट तयार झाले आहे. देशाच्या उत्तर भागात असलेल्या ओकोव्हँगो दलदलीचाही समावेश या वाळवंटी प्रदेशातच होतो. ही दलदल १६० किमी. लांब व ५० ते ८० किमी. रुंदीच्या खचदरीमधील क्षारसरोवरामुळे निर्माण झालेली आहे. याच्या उत्तरेला देशाच्या सरहद्दीलगत ‘माबाबे डिप्रेशन’ हा खोलगट भाग आहे.

लहान व तुटक टेकड्यांनी बनलेला देशाचा पूर्व आणि आग्नेयीकडील भाग ‘व्हेल्ड’ या समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशात मोडतो. येथील जमीन सुपीक असल्याने बहुतेक शहरे याच भागात वसली आहेत.

देशातून बाराही महिने वाहणारा असा एकही मोठा नदीप्रवाह नाही, बहुतेक नद्या देशाच्या सरहद्दीवरून वाहतात. दक्षिण सरहद्दीवरून मोलोपो ही सु. ९६० किमी. लांबीची नदी वाहते. ती द. आफ्रिका प्रजासत्ताक व बोट्स्वाना यांच्या सरहद्दीजवळ उगम पावते. सुरुवातीला ही पश्चिम दिशेने व नंतर नैर्ऋत्य दिशेने बोट्स्वानाच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पुढे ऑरेंज नदीस मिळते. लिंपोपो ही देशाच्या पूर्व सरहद्दीवरून नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने वाहणारी नदी द. आफ्रिका प्रजासत्ताकात उगम पावून प्रथम वायव्य व नंतर देशाच्या सरहद्दीवरून ईशान्य दिशेने व पुढे झिंबाब्वेच्या सरहद्दीवरून पूर्व दिशेने वाहत जाते. हिला शाशी ही उत्तरेकडून येणारी व देशाच्या पूर्व सरहद्दीवरून वाहणारी नदी सरहद्दीवरच मिळते. ताती ही तिची प्रमुख उपनदी होय. देशाच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणारी क्वांडो नदी नामिबियातून दक्षिण दिशेने वहात येऊन देशाच्या सरहद्दीजवळील दलदलीत विलीन होते. चोबे ही उत्तर सीमेवरुन नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने वाहणारी १९२ किमी. लांबीची नदी येथील दलदलीत उगम पावून झँबिया व बोट्स्वाना यांच्या सरहद्दीवर झँबीझी नदीस मिळते. ओकोव्हँगो ही देशातील महत्त्वाची नदी वायव्येकडून अंगोलातून वहात येऊन बोट्स्वानातील ओकोव्हँगो दलदलीमध्ये लुप्त होते. या नदीचीच एक लहान शाखा पुढे एन्‌गामी सरोवरापर्यंत जाते. काही काळ ही नदी पुढे आग्नेयीस बोटेटी नदीच्या रुपाने डाऊ सरोवरातून माकारीकारी दलदलीपर्यंत जाते. या मुख्य प्रवाहांशिवाय देशात लाट्सने (लिंपोपोची उपनदी), माइटेंग्वे, नैर्ऋत्य सरहद्दीवरुन वाहणारी नोसाब इ. लहान लहान नद्या तर ओकोव्हँगो, माकारीकारी या दलदली व एन्‌गामी, डाऊ ही सरोवरे आहेत.

या पठारी प्रदेशाचा फक्त ईशान्येकडील व वायव्येकडील ओकोव्हँगो दलदलीचा प्रदेश सोडला, तर सर्वत्र रेताड व नापीक जमीन असून चुनखडीचे प्रमाण जास्त आढळते. पूर्वभागात मात्र थोडीफार गाळयुक्त जमीन आढळते.

हवामान : सर्वसाधारणपणे बोट्स्वानाचे हवामान उपोष्ण कटिबंधीय प्रकारचे असले, तरी उंचीनुसार हवामानात थोडाफार फरक पडत जातो. हिवाळ्यात देशात रात्रीची हवा थंड असते, तर दिवसा उबदार असते. येथील वाळवंटी प्रदेशात हिमतुषारांचे प्रमाण जास्त असते. या कोरड्या हवामानाच्या प्रदेशात ऑक्टोबर ते फेब्रूवारी हा कडक उन्हाळ्याचा काळ असून जानेवारी महिन्यात सर्वांत जास्त तापमान असते. या काळात ३०० ते ३४० से. पर्यंत तापमान जाते. जून ते ऑगष्ट या थंडीच्या दिवसांत जुलै महिना सर्वांत जास्त थंडीचा असतो. या काळात तापमान ८० ते १० से. पर्यंत खाली येते. ऑगष्ट महिन्यात पश्चिमेकडून कालाहारी वाळवंटावरुन येणाऱ्या वाऱ्यांमुळे देशात माती व वाळू पसरली जाते. देशात ऑक्टोबर ते एप्रिल पावसाळा असून या काळात पर्जन्याच्या प्रमाणात स्थलपरत्वे फरक होत गेलेला आढळतो. देशात सरासरी ४६ सेंमी. पाऊस पडतो. ईशान्य भागात पावसाचे प्रमाण जास्त (६९ सेंमी.) असते, तर नैर्ऋत्येकडील कालाहारी वाळवंटी प्रदेशात ते कमीकमी (२३ सेंमी. पेक्षाही कमी) होत जाते.

वनस्पती व प्राणी : देशाचा जवळजवळ ८४% भूप्रदेश सॅव्हाना प्रदेशातील गवत व काटेरी झुडूपे यांनी व्यापलेला आहे. देशाच्या ईशान्य भागात मोपानी (आफ्रिकन आयर्नवूड), मोगोनोनो व मोकुसी (ऱ्होडेशियन साग), तर कालाहारी वाळवंटी प्रदेशात मोरुकुरु हे वनस्पतिप्रकार प्रामुख्याने आढळतात. गवताळ प्रदेशात लव्ह ग्रास, पॅनिकम, क्रॅब ग्रास, ब्रिस्टल ग्रास इ. गवताचे प्रकार आढळतात. हा प्रदेश गुरेपालन व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. देशातील महत्त्वाचे वनविभाग चोबे नदीखोऱ्यात असून त्यांत प्रामुख्याने मोपानी मोकवा किंवा ब्लडवुड, मोकुसी, मोनॅटो किंवा ऱ्होडेशियन ॲश हे वनस्पतिप्रकार आढळतात. उत्तरेकडील ओकोव्हँगो दलदली प्रदेशात बऱ्याच पाणवनस्पती असून काही भागांत विशिष्ट त्सामा जातीच्या कलिंगडाचे उत्पादन घेतले जाते.


वनस्पतींप्रमाणेच बोट्स्वानातील वन्य प्राणीजीवनही निसर्तःच समृद्ध आहे. त्यामुळे शिकारीसाठी मृगयाक्षेत्र म्हणून तसेच नैसर्गिक व राष्ट्रीय उद्यानांसाठी बोट्स्वानाला महत्त्व आहे. चोबे व मोरेमी ही राष्ट्रीय उद्याने व शिकारीची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. यांशिवाय ओकोव्हँगो प्रदेश, एन्‌गामी सरोवर प्रदेश, माकारीकारी दलदलीचा प्रदेश, कालाहारी वाळवंटी प्रदेश वन्य प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील जंगलात दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध हत्तींचे कळप मोठ्या प्रमाणावर आढळतात. यांशिवाय सिंह, चित्ते, पाणघोडे, जिराफ, रानरेडे, सुसरी, लहान-मोठी हरणे इ. प्राणी तसेच नाग व पफॲडर (आफ्रिकन मंडली) हे विषारी सर्पही विपूल आहेत. देशात अनेक प्रकारचे विंचू, टॅरँट्युला (कोळी), वाळवी इ. प्रकारचे प्राणीही अनेक आहेत. येथील जंगलात वनगाईही थोड्याफार दिसून येतात. पक्ष्यांमध्ये शहामृग, पाणकोळी, माळढोक, बगळे, करकोचे इत्यादींचे प्रमाण जास्त आहे. ओकोव्हँगो व चोबे या नद्यांमध्ये टिलापिया, टायगर फिश, मांजरमासा इ. प्रकारचे मासे सापडतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : बोट्स्वानाचा प्राचीन इतिहास आख्यायिकात्मक स्वरुपाचा आहे. येथील लोक स्वतःला मासिलोच्या नेतृत्वाखाली सतराव्या शतकात या प्रदेशात राज्य करणाऱ्या सान (बुशमेन) जमातीचे वंशज असल्याचे मानतात. अठराव्या शतकात त्स्वाना लोकांनी त्यांना जिंकून गुलाम बनविले. १८०१ मध्ये बांतू लोकांच्या स्थलांतराच्या वेळी सोथो टोळ्या दक्षिण आफ्रिकेत आल्या. १८२० पासून मॅतबीली व झूलू लोकांनी या प्रदेशावर हल्ले करण्यास सुरुवात केली. याच परिस्थितीत या शतकाच्या मध्यावर डेव्हिड लिव्हिंग्स्टन व रॉबर्ट मॉफट या ब्रिटीश धर्मप्रसारकांनी (मिशनरी) येथे केलेल्या कार्यामुळे येथील लोकमत ब्रिटीशांना अनुकूल झाले. येथील स्थानिक जमातीतील अनेकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. झूलू लोकांनी देशात घातपाती व दहशतवादी कृत्ये सुरु केल्यामुळे देशातून मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर सुरु झाले. अशा परिस्थितीतच १८६४ मध्ये ताती नदीखोऱ्यात (देशाची पूर्व सरहद्द) सोन्याचा शोध लागल्यामुळे ट्रान्सव्हालमधून बोअर लोक या प्रदेशात येऊ लागले. त्यामुळे देशाच्या सरहद्दीबाबत वादविवाद सुरु झाले. येथील बामांग्वाटो जमातीने मॅतबीलींच्या आक्रमणांना यशस्वीपणे तोंड दिले व बोट्स्वाना ट्रान्सव्हालमध्ये विलीन करण्याच्या बोअर लोकांच्या मागणीस विरोध केला. त्यांच्यापासून व नैर्ऋत्य आफ्रिकेतील जर्मनांपासून संरक्षण मिळण्यासाठी १८७२ मध्ये बामाग्वाटोंचा नेता बनलेल्या तिसऱ्या कामाने ग्रेट ब्रिटनकडे संरक्षण मागितले. कामाने १८६२ मध्येच ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. संरक्षणाच्या मागणीमुळेच १८८५ साली मोलोपो नदीचा उत्तरेकडील भाग ब्रिटीश अधिरक्षित भाग म्हणून व दक्षिणेकडील भाग ब्रिटीश बेचुआनालँड या नावाने ब्रिटीश वसाहत म्हणून ओळखला जाऊ लागला. हा भाग १८९५ मध्ये दक्षिणेकडील केप कॉलनीला (विद्यमान द. आफ्रिका प्रजासत्ताकाला) जोडण्यात आला. ब्रिटीश साउथ आफ्रिका कंपनीकडे ही वसाहत सुपूर्त करण्यास ब्रिटीश शासन अनुकूल होते. तथापी बाक्वेना, बांग्वाकेत्से व बामांग्वाटो या तीन जमातींच्या प्रमुखांनी त्यास विरोध दर्शवून ब्रिटीश शासनाचा अधिरक्षित भाग म्हणूनच राहण्याचा आग्रह धरला. त्या बदल्यात देशाच्या पूर्वभागातून लोहमार्ग बांधण्यासाठी काही भूभाग ब्रिटीश सरकारला देण्यास त्यांनी मान्यता दिली. सदर लोहमार्ग १८९६-९७ साली बांधण्यात आला. पहिल्या महायुद्धकाळात बेचुआनालँडमधून ब्रिटीशांना बरेचसे मजूर पुरविण्यात आले. दुसऱ्या महायुद्धातही आफ्रिकन स्वयंसेवक संघातर्फे इटली व आशियाई देशांत या भागातील बऱ्याच लोकांची भरती करण्यात आली. ३० सप्टेंबर १९६६ रोजी ‘बोट्स्वाना प्रजासत्ताक’ या नावाने हा देश स्वतंत्र झाला.

जुन्या १९६५ च्या संविधानातच काही दुरुस्त्या करून देशाचे विद्यमान संविधान तयार झाले. राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख असून त्याची निवड संसद सदस्य करतात. संसदेत सार्वत्रिक प्रौढ मतदानाने निवडलेले ३२ सदस्य असून त्यांशिवाय ४ सदस्य राष्ट्राध्यक्षाने नियुक्त केलेले असतात. त्याशिवाय महाधिवक्ता (पदसिद्ध सदस्य) व सभापती असे मिळून संसदेची सदस्यसंख्या ३८ असते. यातूनच एकूण १० सदस्यांच्या मंत्रिमंडळाची नेमणूक राष्ट्राध्यक्ष करतो. उपराष्ट्राध्यक्षांचे पद हे मंत्र्यासारखे असते. राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष व १० मंत्री मिळून मंत्रिमंडळ बनते. याखेरीज देशातील ८ मुख्य जमातीचे प्रमुख व चार जिल्ह्यांतील जमातींच्या उपप्रमुखांमधून निवडलेले चार सदस्य मिळून एक मंडळ असते. हे मंडळ आणखी तीन सदस्यांची निवड करते. या मंडळाकडे काही विधेयके अथवा अधिनियम संमतीसाठी पाठविण्यात येतात. देशातील स्थानिक प्रशासनासाठी ९ जिल्हापरिषदा व चार नगरपरिषदा आहेत. सर सेरेत्से कामा हा देशाच्या स्वातंत्र्यापासून तीन वेळा सलगपणे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. त्याचा १३ जुलै १९८० मध्ये मृत्यू झाला व त्यानंतर डॉ. क्वेट केतुमाइल जॉनी मसाइरे हे बोट्स्वानाचे राष्ट्राध्यक्ष झाले. ऑक्टोबर १९७८ मधील संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे होते : बोट्स्वाना डेमॉक्रॅटिक पार्टी ३०, बोट्स्वाना पीपल्स पार्टी १ व बोट्स्वाना नॅशनल फ्रंट १. संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल आणि ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी इ. आंतरराष्ट्रीय संघटनांचा हा देश सदस्य आहे.

येथील न्यायव्यवस्था ब्रिटीश न्यायव्यवस्थेच्या पद्धतीची आहे. देशात लोबात्सी येथे उच्च न्यायालय असून प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकारी न्यायालये असतात. देशात स्वतंत्र अपील न्यायालय आहे. १९७७ साली देशात स्थायी स्वरुपाचे संरक्षणदल उभारण्यात आले. विशेषतः सीमाभागाच्या संरक्षणासाठी देशात १९८० साली जी भूसेना उभारली आहे, तीत दोन बटालियन असून एकूण सैनिकसंख्या २,००० आहे. याशिवाय निमलष्करी सैनिक १,२०० होते. देशात छोटी वायुसेनाही असून तीत वाहतुकीची, हवाई गस्तीची आणि प्रशिक्षणाची काही विमाने आहेत.

आर्थिक स्थिती : बोट्स्वाना हा एक अविकसित देश असून त्याची अर्थव्यवस्था बव्हंशी पशुपालन व्यवसायावरच अवलंबून आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी जागतिक बँक, अमेरिका व ग्रेट ब्रिटन यांच्याकडून अर्थसहाय्य घेण्यात आले. देशातील ९०% लोक शेती व पशुपालन यांवर उपजीविका करतात. तथापि कालाहारी वाळवंटावरून वाहत येणाऱ्या वाळूचे थर साठून येथील जमीन निकस बनते. याशिवाय देशात वारंवार पडणारे दुष्काळ, पारंपारिक शेती, वादळे, रोगराई हे शेतीव्यवसायातील महत्त्वाचे अडथळे आहेत. येथील शेती पावसावरच अवलंबून असून तिचे प्रमाण देशाच्या पूर्वभागातच जास्त असलेले दिसून येते. १९७६ साली देशात १३,६०,००० हेक्टर जमीन लागवडयोग्य होती. तीपैकी फक्त ५% जमिनीतच दुय्यम प्रतीची पिके घेतली जात. यात ज्वारी, मका, मिलेट, कडधान्ये इत्यादींचा प्रामुख्याने समावेश असतो. १९७७ साली त्यांचे अनुक्रमे ५६,००० ६२,००० ५,००० आणि १७,००० मे. टन उत्पादन घेण्यात आले. नगदी पिकांमध्ये कापूस, भुईमूग, घेवडा व सूर्यफुलांचे बी ही प्रमुख होत.


१९७७ पासून देशात धरणांच्या व कूपांच्या (बोअरहोल्स) द्वारे शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. यांशिवाय शेतकऱ्यांना उत्तम बी-बियाणे, खते, जंतुनाशके इत्यादींच्या रुपाने मदत केली जाते. पशुपालन व त्यावर आधारित उद्योगांच्या बाबतीत मात्र या देशाला निसर्गाची साथ आहे. दूध व दुग्धपदार्थ, गुरांची कातडी, मांस, लोकर यांसारख्या उत्पन्नांमुळे देशाला एकूण उत्पन्नाच्या सु. ८०% तर ग्रामीण भागातून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या सु. ५६% उत्पन्न मिळते. १९७७ साली निर्यातीपासून मिळालेल्या परकीय चलनापैकी २५% पेक्षा जास्त चलन या व्यवसायातून मिळाले होते. परंतु त्याच वर्षी लाळ रोगाच्या साथीमुळे ५ लाखापेक्षा जास्त गुरे आजारी पडल्याने लोबात्सी येथील १९५४ मध्ये सुरु करण्यात आलेला कत्तलखाना बंद करावा लागला होता. यामुळेच १९७८ साली बोट्स्वाना सरकारने या रोगाची प्रतिबंधक लस तयार करण्याचा कारखाना देशात सुरु करण्याविषयी एका फ्रेंच कंपनीशी करार केला व पशुवैद्यकीय संशोधनासाठी देशात एक संस्था स्थापन करण्याचे ठरविले. देशातील निकस जमीन, कमी पाऊस व उष्णकटिबंधीय गवताच्या जाती यांमुळे हा रोग ग्रामीण भागात जास्त फैलावतो. देशात १९७९ साली एकूण ३३,००,००० गुरे १६,५०,००० शेळ्या व बकऱ्या ६,२०,००० कोंबड्या असे पशुधन होते. यांशिवाय १९७७ साली ९,००० घोडे ४०,००० गाढवे २०,००० डुकरे होती. याच वर्षी देशातील इतर उत्पादने (मे. टनांत) पुढीलप्रमाणे होती : बीफ व व्हील ३१,००० मांस ५,००० गाईचे दूध ८१,००० कोंबड्यांची अंडी ५०० गुरांची कातडी ३,६००.

पशुपालनाखालोखाल देशात खाणकाम उद्योग महत्त्वाचा आहे. देशातून होणाऱ्या निर्यातमालात अशुद्ध खनिजांचा वाटा मोठा आहे. १९६७ सालापर्यंत देशात ॲस्बेस्टस व मँगॅनीज यांचेच थोडेफार उत्पादन होई. याच वर्षी देशाच्या उत्तर भागात ओरापा येथे हिऱ्याच्या खाणीचा शोध लागला व त्यानंतर चार वर्षांनी हिऱ्यांच्या उत्पादनास सुरुवात झाली. १९७६ साली या खाणीतून २.४ द.ल. कॅरट हिऱ्यांच्या उत्पादनाचे उद्दिष्ट होते. १९७९ साली ते ४.५ द.ल. कॅरटपर्यंत वाढविण्यात आले. याच वर्षी ओरापाच्या आग्नेयीस असलेल्या लेथलहाकाने येथील खाणीतून ४ द. ल. कॅरट हिऱ्यांचे उत्पादन घेण्यात आले होते. देशाच्या दक्षिण भागातील ज्वानेंग येथील खाणीतून १९८२ पासून हिऱ्यांच्या उत्पादनास सुरुवात करण्यात येणार आहे. हिऱ्यांशिवाय देशात संगजिरा, कोळसा, तांबे व तांबे-निकेल यांची धातुके, सेंधव इ. खनिजे सापडतात. लोबात्सी भागात उच्च प्रतीचे फ्ल्युओरस्पार सापडते. १९७८ साली सेलेबी-फिक्‌वे येथील खाणीतून ४०,००० टन तांब्याचे खनिज, तर मोरुपुले येथील खाणीतून ३,१५,००० टन कोळशाचे उत्पादन घेण्यात आले. सैंधव व सोडाॲश माकारीकारी प्रदेशात सापडतात. निकेल-तांबे धातूक सेल्‌कीर्क आणि फीनिक्स यांच्या परिसरात व तांबे धातूक माउनच्या दक्षिणेस तसेच गांझीच्या जवळ सापडते. देशात काही कुटिरोद्योगही चालतात. यांशिवाय चोबे व ओकोव्हँगो नद्यांमध्ये स्थानिक गरजेपुरती मासेमारी केली जाते.

ऑगस्ट १९७६ पासून देशाचे ‘पुला’ हे अधिकृत चलन असून १ पुलाचे १०० ‘थेबे’ असे भाग केले आहेत. १९७८ साली देशात १, ५, १०, २५ व ५० थेबेंची नाणी व १, २, ५ आणि १० पुलांच्या नोटा प्रचलित होत्या. याच वर्षी १ अमेरिकी डॉलर = ८२.८ थेबे व मार्च १९८१ मध्ये एक स्टर्लिंग पौंड = १.६८८ पुला असा विनिमय दर होता. देशात स्टँडर्ड बँक व बार्क्लेज बँक इंटरनॅशनल या बँकांच्या ५ शाखा व ४६ प्रतिनिधीसंस्था आहेत. यांशिवाय सरकारी अर्थसहाय्य असलेली राष्ट्रीय विकास बँक व डाकघर बचत बँकही आहे.

वाहतूक व संदेशवहन : बोट्स्वानामध्ये वाहतुकीची साधने मर्यादित स्वरुपाची आहेत. बहुतेक महत्त्वाचे मार्ग देशाच्या पूर्व भागात असून द. आफ्रिकेतील मॅफेकिंग ते झिंबाब्वेमधील बूलवायो यांना जोडणारा लोहमार्ग या देशाच्या पूर्व भागातूनच जातो. याची देशातील लांबी २४६ किमी. असून या मार्गाची व्यवस्था झिंबाब्वेकडून (नॅशनल रेल्वे ऑफ झिंबाब्वे) पाहिली जाते. बोट्स्वानानेही रेल्वेमार्गासाठी ‘बोट्स्वाना रेल्वे निगमा’ची स्थापना केली आहे. १९७३ मध्ये देशातील मोरुपुले कोळसाक्षेत्र व सेलेबी-फिक्वे येथील फिक्वे खाणप्रदेशांपर्यंत लोहमार्ग टाकण्यात आले आहेत. १९७९ साली देशात एकूण ९९८ किमी. पक्के १,५४० किमी. खडीचे व ४,९०१ किमी. लांबीचे कच्चे रस्ते होते. १९७७ साली बोट्स्वाना. झँबिया (बोट्-झॅम) हा नाटा ते काझुंग्गूला यांना जोडणारा महामार्ग तयार करण्यात आला आहे. देशात याच वर्षी एकूण २१,८०० मोटारगाड्या होत्या. बोट्स्वानात एकूण ३ विमानतळ असून त्यांशिवाय काही धावपट्ट्याही आहेत. फ्रान्सिसटाउन व गाबरोनी येथील विमानतळ महत्त्वाचे आहेत. ‘झँबिया एअरवेज’ तर्फे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक केली जाते. ‘एअर बोट्स्वाना’ आणि ‘साउथ आफ्रिकन एअरवेज’ यांमार्फत गाबरोनी येथून हवाई वाहतूक केली जाते. द. आफ्रिका प्रजासत्ताक (केपटाउन) व झिंबाब्वे यांना जोडणारे दूरध्वनी, लोहमार्ग इ. बोट्स्वानातूनच जातात. देशातील जिल्हाठाणी व पोलीसठाणी गाबरोनी राजधानीशी बिनतारी संदेशवहनाने जोडलेली आहेत. आंतरराष्ट्रीय दूरसंदेशवहनासाठी १९८० साली देशात एक केंद्र उभारण्यात आले. देशात १९७८ साली १०,८३३ दूरध्वनी संच, ३९ मुख्य डाकगृहे व ४२ दुय्यम टपाल कचेऱ्या होत्या. १९७७ साली ६०,००० रेडिओसंच होते.

लोक व समाजजीवन : बोट्स्वानातील लोकजीवन मात्र कष्टाचे आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे देशातील लोकवस्ती पूर्व भागाचा अपवाद वगळता सर्वत्र विरळ आहे. पूर्व भागात लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स सात, तर इतरत्र ती एकापेक्षाही कमी आहे. देशात १९७० साली ४,००० गोरे ३,५०० मिश्रवंशीय, ४०० आशियाई व इतर ‘बॅटवाना’, म्हणजे आफ्रिकन जमातीचे होते. बॅटवाना लोकांची भाषा व संस्कृती यांचे पश्चिमेकडील सोथो जमातीशी साम्य आढळते. बॅटवानामध्ये आठ प्रमुख जमातींचा समावेश असून ते प्रामुख्याने बांतू भाषा बोलतात. बामांग्वाटो जमातीचा मोठा गट असून ते लोक ईशान्य भागात राहतात. बाकावेंगा आणि बांग्वाकेत्से दक्षिण भागात, बटावाना नैर्ऋत्य आफ्रिकेच्या सरहद्दीलगत, तर बॅकगाट्ला, बामालेटे, बॅटलोक्का हे आग्नेय भागात आणि बारोलाँग आग्नेय सरहद्दीलगत राहतात. यांशिवाय बुशमन हे देशातील मूळचे रहिवासी ‘सारवा’ अथवा ‘मासारवा’ या स्थानिक नावांनी ओळखले जातात. यापैकी काही लोक नारोन, आउएन, कुंग व हेइकुम या गटांतील असून भटके आहेत. हे कालाहारी वाळवंटी प्रदेशात आढळतात.

देशात ख्रिस्ती हा प्रमुख धर्म असून १९७६ साली रोमन कॅथलिक पंथीय लोक २३,९२० होते. त्यांशिवाय यहुदी लोक अल्प प्रमाणात आढळतात. बोट्स्वानामध्ये क्षय, जठरांत्रशोथ, न्यूमोनिया व अपपोषणामुळे निर्माण होणारे आजार मुख्यत्वे दिसून येतात. मलेरिया चोबे व एन्गामीलँडच्या दलदली भागात आढळतो. १९७८ साली देशात १३ सार्वजनिक रुग्णालये, २१ प्रसूतिगृहे, एक मानसोपचार केंद्र, ३८८ आरोग्यकेंद्रे, ९४ दवाखाने होते. त्यांतून एकूण १,८७१ खाटांची सोय होती (१९७७). देशात ८९ डॉक्टर, ६ दंतवैद्य, ६८० परिचारिका होत्या. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे सरकारने धोरण आखले आहे. सात वर्षांखालील मुलांना मोफत वैद्यकीय उपचारांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.


शिक्षण : बोट्स्वानामध्ये शालेय शिक्षण सक्तीचे नाही. १९७८ साली एकूण ३३६ प्राथमिक शाळांत १,४३,००० विद्यार्थी ४४ माध्यमिक शाळांत १६,१०० विद्यार्थी व ‘बोट्स्वाना अँड स्वाझीलँड ’ विद्यापीठात ६०० विद्यार्थी शिकत होते. देशात औद्योगिक व व्यावसायिक शिक्षणाच्याही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. देशातील सेत्स्वाना भाषिकांत साक्षरतेचे प्रमाण २५%, तर इंग्रजी भाषिकांत १५% आहे. शिक्षणाला उत्तेजन देण्याच्या हेतूने १९८० सालापासून प्राथमिक शिक्षण मोफत करण्याचे सरकारी धोरण आहे. बेकारीचा प्रश्नही मोठा आहे. देशात गृहनिर्माण, औद्योगिक, शक्तिनिर्मिती अशा निगमांची स्थापना करण्यात आली आहे. यांशिवाय बोट्स्वानामध्ये काही व्यापारी व विकास संघटनाही स्थापन करण्यात आल्या आहेत.

इंग्रजी ही देशाची शासनभाषा असली, तरी देशात सेत्स्वाना भाषिक बहुसंख्य आहेत. ही भाषा बोट्स्वानातील बहुसंख्य आफ्रिकन लोक बोलतात. बुशमनांची भाषा मात्र खोइसान भाषेशी जुळणारी आहे. देशात १९८० साली बोट्स्वाना डेली न्यूज  हे दैनिक गाबरोनी येथून इंग्रजी व सेत्स्वाना या दोन्ही भाषांतून प्रसिद्ध होत होते. याशिवाय १९७९ साली बोट्स्वानात एक महत्त्वाचे साप्ताहिक, एक राजपत्र व ४ मासिके प्रसिद्ध होत होती.

महत्त्वाची स्थळे : देशातील बहुतेक महत्त्वाच्या शहरांचा विकास पूर्व भागातच, प्रमुख लोहमार्ग व महामार्गाला अनुसरुन झालेला आढळून येतो. गाबरोनी हे देशाच्या राजधानीचे ठिकाण असून या शहराची स्थापना १८९० साली करण्यात आली. १९६६ पासून हे देशाची राजधानी व शैक्षणिक केंद्र म्हणूनही विख्यात आहे. फ्रान्सिसटाउन (लोकसंख्या ३२,००० – १९८० अंदाज) हे देशाच्या पूर्व सरहद्दीजवळील शहर लोहमार्गावरील स्थानक असून परिसरातील खाणीमुळे औद्योगिक व त्याबरोबरच राजकीय दृष्ट्याही प्रसिद्ध आहे. येथे विमानतळ आहे. सेलेबी-फिक्वे (२९,०००) व कान्या (२२,०००) ही देशातील औद्योगिक शहरे आहेत. कान्या हे आग्नेय भागातील शहर परिसरातील ॲस्बेस्टसच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. बांग्वाकेत्से जमातीचे हे मुख्य ठिकाण आहे. लोबात्सी (२०,०००) हे प्रमुख लोहमार्ग व महामार्गावरील शहर असून द. आफ्रिका प्रजासत्ताकाच्या सरहद्दीजवळ दुग्धोत्पादनाच्या परिसरात वसलेले आहे. बारोलाँग जमातीचे ते प्रमुख केंद्र आहे. मोचूदी (२०,०००) हे आग्नेय सरहद्दीजवळील शहर कृषिउत्पादनासाठी महत्त्वाचे असून बॅकगाट्ला जमातीचे ते प्रमुख केंद्र आहे. मोलेपोलोले (१९,०००) शहर कालाहारी वाळवंटाच्या पूर्व सीमेवर वसले असून ते बाक्वेना जमातीचे प्रमुख केंद्र आहे. महालाप्ये (१९,०००) हे लोहमार्ग व महामार्गावरील शहर गाबरोनीच्या ईशान्येस असून येथे विमानाची धावपट्टी आहे. माउन (१६,०००) शहर देशाच्या उत्तर भागात एन्‌गामी सरोवर प्रदेशात ओकोव्हँगो द्रोणीच्या आग्नेय सीमेवर वसले आहे. येथे विमानाची धावपट्टी असून बटावाना जमातीचे ते केंद्र आहे.

पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने बोट्स्वानाला महत्त्वाचे स्थान आहे. देशात शिकारीची आठ राखीव जंगले असून शिकारीसाठी येथे पर्यटकांची वर्दळ असते. पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी सरकारचे प्रयत्न जारी आहेत. पर्यटकांत द. आफ्रिका प्रजासत्ताकातील लोकांची संख्या जास्त असून १९७९ साली एकूण ५८,१०० पर्यटकांनी बोट्स्वानाला भेट दिली.

संदर्भ : 1. Cervenka, Zdenk, Republic of Botswana, 1970.             2. Jons. D. Aid and Development in Southern Africa, London, 1974.             3. Sillery, Anthony, Botswana : Short Political History, London, 1974.  

चौंडे, मा. ल.

बुशमन शिकारी वैशिष्टयपूर्ण गृहरचना, सेरोवे.
शुष्क नदीपत्रातील पाणवठा

बोट्‌स्वाना