देवास : मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण.  उपनगरांसह लोकसंख्या ५१,८६६ (१९७१). हे इंदूरपासून ३९ किमी., माळवा पठारावरील चामुंडा पहाड टेकडीच्या पायथ्याशी वसले आहे. टेकडीवरील देवीवासिनी मंदिरावरुन यास देवास हे नाव पडले असावे. पूर्वीच्या देवास संस्थानची ही राजधानी होती. मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील व लोहमार्गावरील हे स्थानक आहे. हे १७३९ मध्ये मराठी अंमलाखाली आल्यानंतरच यास महत्त्व प्राप्त झाले. येथे जैन व हिंदू भग्न मंदिरे आहेत हे दळणवळणाचे व शेतमालाच्या विक्रीचे केंद्र आहे. कापड व पीठगिरण्या, हातमागावरील कापड, साबण हे येथील मुख्य उद्योगधंदे आहेत. शहरात राजवाडे, माध्यमिक शाळा, दवाखाने, डाक व तार कार्यालये असून संगीत अकादमी आणि विक्रम विद्यापीठाशी संलग्न असलेली शिक्षक प्रशिक्षण व कृषिमहाविद्यालये आहेत.

कांबळे, य. रा.