टेनेसी : अमेरिकेच्या ‘पूर्व दक्षिणमध्य’ विभागातील एक राज्य. क्षेत्रफळ १,०९,४११ चौ. किमी.पैकी पाण्याखाली १,२४८ चौ. किमी. लोकसंख्या ४१,२६,००० (१९७३). विस्तार ३५° उ. ते ३६° ४१’ उ. आणि ८१° ४०’ प. ते ९०१८’ प. यांदरम्यान. याच्या दक्षिणेस जॉर्जिया, ॲलाबॅमा व मिसिसिपी, मिसिसिपी नदीच्या पलीकडे पश्चिमेस आर्‌कॅन्सा व मिसूरी, उत्तरेस केंटकी व व्हर्जिनिया आणि पूर्वेस नॉर्थ कॅरोलायना ही राज्ये आहेत. नॅशव्हिल ही राजधानी आहे.

भूवर्णन : पश्चिम सीमेच्या मिसिसिपीकडून पूर्वसीमेच्या ॲपालॅचिअन पर्वतापर्यंत सु. ६९५ किमी. लांबीचा व १८० किमी. रुंदीचा हा राज्यप्रदेश चढत गेलेला आहे. नैर्ऋत्येस मिसिसिपीच्या काठचा सर्वांत सखल भाग, त्यात मेंफिसच्या दक्षिणेस स. स. पासून फक्त ५८ मी. उंचीचा प्रदेश, वायव्येस राज्यातले एकमेव नैसर्गिक सरोवर रीलफुट पश्चिमेचे सु. १६० किमी. रुंदीचे नदीकाठ मैदान, त्यात अनेक दलदली व डबकी. या सपाट भागाच्या पूर्वेस प्राचीन काळी वाऱ्‍याने वाहून आणलेल्या मातीची टेकाडे, त्यांच्या पूर्वेस सु. २४८ मी. उंचीचा टेकड्यांचा प्रदेश पूर्वेकडे उतरत गेलेला, त्याच्या मध्यभागी ९३ ते १२४ मी. खोलीचा एक विस्तीर्ण लंबगोलाकार उत्तम जमिनीचा खोलगट प्रदेश व त्याभोवतीचे ‘हायलँडरिम’ कडे त्याच्या पूर्वेस चढत गेलेले ५५८ ते १,०८५ मी. उंचीचे कंबर्लंड पठार. त्याची पूर्वकड तुटून एकदम ४६५ मी. खाली ग्रेट व्हॅली खोऱ्‍यात उतरलेली या खोऱ्‍यात अनेक समांतर डोंगररांगांच्या दरम्यान चिंचोळ्या दऱ्‍या खोऱ्‍याच्या पूर्वेस ॲपालॅचिअन पर्वतश्रेणीचा भाग असलेले यूनाका पर्वत व त्यातील ‘ग्रेट स्मोकीज’ डोंगर त्यात सर्वोच्च (२,०२४ मी.) ‘क्लिंगमंझ’ डोम व इतर शिखरे या भागात वनप्रदेश आणि खनिजयुक्त प्रदेश अशी एकूण रचना आहे.

मृदा : राज्यभर विविध शिलाजन्य प्रकारांच्या मृदा आहेत. पश्चिमेस नदीगाळ जमीन, तिच्या पूर्वेस वाऱ्‍याने आणलेल्या विमृदा, उत्तरेत करडी पिंगट व दक्षिणेस लाल, पिवळसर माती मधल्या खोलगट प्रदेशात सुपीक, पिंगट, रेतीमिश्रित मृदा व कंबर्लंड पठारावर चुनामिश्रित माती आहे.

खनिजे : देशात पहिल्या क्रमांकाचे पायराइटचे उत्पादन, दुसऱ्‍या क्रमांकाचे फॉस्फेट्स आणि तिसऱ्‍या क्रमांकाचे जस्त असून उत्तम संगमरवर, कोळसा, तांबे व मँगॅनीज मिळतात.

नद्या : पश्चिम सीमेची मिसिसिपी, टेनेसी व कंबर्लंड या महत्त्वाच्या नद्या आहेत. टेनेसी नैर्ऋत्य व्हर्जिनियात उगम पावून राज्याच्या पूर्वेतील ‘ग्रेट व्हॅली’ खोऱ्‍यातून दक्षिणेच्या ॲलाबॅमा राज्यात जाऊन पश्चिमेला वळते व मग उत्तरवाहिनी होऊन राज्याच्या पश्चिम भागातून केंटकी राज्यात ओहायओला मिळते. टीव्हीए [⟶ टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी] ने या नदीला अनेक ठिकाणी बंधारे घालून पूरनियंत्रण, जलमार्ग व प्रचंड प्रमाणावर विद्युत्‌निर्मिती व्यवस्था केलेली असून या प्रकल्पातल्या अनेक जलाशयांनी मिळून टेनेसीतला १,८२८ चौ.किमी. प्रदेश व्यापलेला आहे. कंबर्लंड नदी केंटकीत उगम पावून टेनेसी राज्यात येऊन परत वळण घेऊन उत्तरेत केंटकीत ओहायओला मिळते. या नदीवरही अनेक धरणे बांधून पूरनियंत्रण व विद्युत्‌निर्मितीची सोय केलेली आहे. रम्य सृष्टिसौंदर्य व मासेमारीची सोय यांसाठी हे जलाशय प्रवाशांचे आकर्षण ठरले आहेत.

हवामान : पश्चिमेच्या सखल भागाचे हवामान देशाच्या दक्षिण विभागासारखे–दीर्घ दमट उन्हाळे, अल्पकाळ सौम्य हिवाळे, क्कचित कडक थंडी असे असते तर पूर्वेच्या डोंगराळ भागात हवामान देशाच्या ईशान्य भागासारखे–दीर्घ हिवाळे, खूप हिमपात, सौम्य उन्हाळे, बंदिस्त दऱ्‍याखोऱ्‍यांतील थंडी उंच प्रदेशापेक्षा कमी, असे असते. पाऊस शेतीपुरता, डिसेंबर-जानेवारीत विशेष जोराचा असतो. किमान तापमान ४·४° से., कमाल तापमान २६·७° से. व सरासरी तपमान १५·६° से. असते. वार्षिक पर्जन्य १२५ सेंमी. व हिमपात २० सेंमी. असतो.

वनस्पती : टेनेसीत विविध व विपुल वनस्पती प्रकार आढळतात. सु. ५२% प्रदेश वनाच्छादित आहे. २०० प्रकारच्या वृक्षांपैकी ५९ व्यापारदृष्ट्या उपयुक्त आहेत. पाइन, एल्म, बीच, सिकॅमोर, बासवुड, पीकन, रानचेरी, काळा वॉलनट, हिकरी, हनी, ब्लॅक लोकस्ट, ट्यूलिप, पॉप्लर, मॅपल, पर्सिमॉन, विलो, विषारी आयव्ही व इतर अनेक प्रकारची झाडेझुडपे आहेत. गोल्डन सील, हेपाटिका, डिजिटॅलीस व गिन्सेंग इ. औषधी वनस्पती आहेत.

प्राणी : तीनशे प्रकारचे पक्षी, तीनशे प्रकारचे मासे, ८६ प्रकारचे सरपटणारे प्राणी, आठ प्रकारचे सरडे, चोवीस प्रकारची कासवे इ. विविध प्राणिसृष्टीत क्वेल, मोर्निंग डोव्ह, टर्की, ग्राउझ, पाणपक्षी, हरिण, अस्वल, रानडुक्कर, ससे, मासे यांची शिकार मिळते. रॅटल साप, कॉपरहेड, कॉटन माउथ हे विषारी सापही आहेत.


इतिहास व राज्यव्यवस्था : प्राचीन काळी मातीचे ढिगारे बांधणाऱ्‍या आदिवासींचे अवशेष राज्याच्या पश्चिम भागात आढळतात. नंतरच्या काळात चेरकी, चिकसॉ, चॉक्टॉ, क्रीक व मायामी या रेड इंडियन जमातींचा हा मृगयाप्रदेश होता. इकडे येणारा पहिला गोरा मनुष्य बहुधा १५४१ मध्ये सोन्याच्या शोधार्थ आलेला स्पॅनिअर्ड हरनांदो दे सोटो हा असावा. १६९२ मध्ये सध्याच्या नॅशव्हिलजवळ केलेली फ्रेंच वसाहत ही टेनेसीतली गोऱ्‍या माणसाची पहिली कायम वस्ती होय. १६७३ मध्ये इंग्रज आले. तेव्हापासून शंभर वर्षांत इंग्रजांचा केसाळ चामड्यांचा व्यापार इकडे भरभराटीस आला आणि फ्रेंच व इंडियन युद्धांनंतर फ्रेंचांचा इकडील प्रभाव नष्ट झाला. नॉर्थ कॅरोलायनाला १६६५ मध्ये मिळालेल्या सनदेच्या आधारावर ते राज्य या प्रदेशावर हक्क सांगत होते. १७६० साली डॅन्येल बूनने ‘कंबर्लंड गॅप’ खिंडीतून पश्चिमेकडील केंटकी-टेनेसीचा मुलूख खुला करण्यासाठी मार्ग काढला. ब्रिटिशांचा अंमल व त्यांचे कर यांविरुद्ध बंड करणाऱ्‍या नॉर्थ कॅरोलायनातल्या ‘रेग्युलेटर्स’नी १७७१ मध्ये वॉटॉगा नदीकाठी वसाहत केली व ‘वॉटॉगा असोसिएशन’ ही शासनयंत्रणा उभारली. स्वातंत्र्ययुद्धात ५०० वॉटॉगा वसाहतवाले जॉन सेव्हिअरच्या नेतृत्वाने लढण्यास गेले व ब्रिटिशांवरील किंग्ज मौंटन येथील विजयात सहभागी झाले. स्वातंत्र्ययुद्धानंतर वॉटॉगा हा पर्वतपार मुलूख नॉर्थ कॅरोलायनाने केंद्रसत्तेकडे आदा केला पण शासनाने या प्रदेशाचा बंदोबस्त काहीच केला नाही, हे पाहून सेव्हिअरने तेथे ‘फ्रॅक्लिन राज्य’ संघटित केले. नॉर्थ कॅरोलायनाने या भागावर पुन्हा हक्क सांगितला व सेव्हिअरला राज्यद्रोही ठरवून कैदेत टाकले. तथापि तो निसटला. पुन्हा एकदा नॉर्थ कॅरोलायनाने केंद्रसत्तेकडे प्रदेश दिला आणि १७९० मध्ये राष्ट्रसंसदेने टेनेसी हा प्रदेश म्हणून संघटित केला. प्रदेशाला राज्यदर्जा मिळण्याचा पहिला मान टेनेसीला १७९६ मध्ये मिळाला. यादवी युद्धात या राज्यात दोन्ही बाजूंचे पक्षपाती होते पश्चिमेतल्या लोकांची निष्ठा दक्षिणेच्या बंडखोर राज्यांकडे, तर पूर्वेतल्या लोकांची उत्तरेच्या सरकारपक्षाकडे त्यांच्यापैकी अँड्रू जॅक्सन इतर सीनेटर्सप्रमाणे राजीनामा न देता सीनेटर राहिला. टेनेसीतले १,१५,००० लोक दक्षिणेतर्फे तर ३०,००० उत्तरेतर्फे लढले. चिकमॉगच्या लढाईत उत्तरेच्या फौजांची चॅटानूगात कोंडी झाली पण सेनापती बदलल्यानंतर तेथे व लुकआउट मौंटनच्या लढाईत दक्षिणेच्या फौजांचा पराभव झाला. टेनेसी जिंकल्यावर अध्यक्ष लिंकनने अँड्रू जॅक्सनला राज्यपाल नेमले व पुढे १८६४ मध्ये तो उपाध्यक्षही झाला. १८६६ साली टेनेसीला राष्ट्रात पुनःप्रवेश मिळाला. युद्धोत्तर ‘पुनर्रचने’ ची झळ दक्षिणेच्या इतर राज्यांप्रमाणे जरी टेनेसीला लागली नाही, तरी राजकीय व आर्थिक दृष्ट्या काळ बिकट गेला. गोऱ्‍यांचा वरचष्मा रहावा या आत्यंतिक मताची कुप्रसिद्ध ‘कू क्लक्स क्लॅन’ ही गुप्त गुन्हेगार संघटना १८६५ मध्ये निघाली. नंतर बऱ्‍याच वर्षांनी टेनेसी राज्य प्रसिद्धीस आले, ते १९२५ मध्ये स्कोप्स नावाच्या शिक्षकावर उत्क्रांतिवाद शिकवण्याबद्दलचा खटला गाजला तेव्हा. १९३० नंतरच्या मंदीच्या काळात केंद्रनियुक्त ‘टीव्हीए’ टेनेसी खोरे प्राधिकरणाने राज्याचा पूरोध्वस्त, उजाड, धुपलेला प्रदेश पार बदलून तेथे शेतीयोग्य जमीन, तुडुंब जलाशय व शक्तिशाली विद्युत् केंद्रे निर्माण केली. तेथील प्रचंड वीजपुरवठ्यामुळे ओकरिज येथील प्रयोगशाळा व कारखाने शक्य झाले आणि त्यातील शास्त्रज्ञांनी व तंत्रज्ञांनी ‘मॅनहॅटन प्रकल्पा’तून पहिला अणुस्फोटक तयार केला. पहिल्या महायुद्धात टेनेसीने ८९,९२५ व दुसऱ्‍यात ३,३४,०९२ लोक दिले. दुसऱ्‍या महायुद्धानंतर लहान गावांकडे नवे कारखाने आकृष्ट होऊन उद्योगधंद्यांना विविधता आली. टेनेसीची अंतर्गत शासनव्यवस्था बरीचशी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इतर राज्यांसारखीच आहे. राज्यपाल त्याच्या कार्यकारी मंडळातर्फे कारभार पाहतो. राज्याच्या सीनेटचे ३३ व प्रतिनिधिगृहाचे ९९ सदस्य अनुक्रमे ४ व २ वर्षांसाठी निवडलेले असतात. देशाच्या काँग्रेसवर टेनेसीचे २ सीनेटर व ८ प्रतिनिधी असतात.

आर्थिक व सामाजिक स्थिती : कृषी व्यवसायात २२% लोक असून मुख्य उत्पादन कापूस, सरकी, तंबाखू, सोयाबीन, गवत, मका, मांसासाठी व दुभत्यासाठी पोसलेली जनावरे, शेतकामासाठी खेचरे व घोडे यांचे आहे. त्यांशिवाय गहू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, बटाटे, रताळी, भाजीपाला होते. मेंफिस येथे जगातील सर्वांत मोठा कापूस बाजार आहे. १९७० च्या सुरुवातीस ३,४५,००० दुभत्या गाई २३,०८,००० गुरे ४५,००० मेंढ्या ९,२६,००० डुकरे होती. दक्षिणेकडील दुग्धव्यवसाय व जर्सी गायींची पैदास यांसाठी टेनेसी विख्यात आहे. कारखानदारीत २१% लोक असून मुख्य निर्मिती रासायनिक माल, फॉस्फेट खते, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, कापड, कपडे, शुद्ध धातू मुख्यतः जगातील फार मोठ्या कारखान्यातील ॲल्युमिनियम, फर्निचर, छपाई व प्रकाशन, रबर व प्लॅस्टिक माल, यंत्रे यांची होते. व्यापारउदीमात १७% लोक आहेत. १९७० मध्ये लोहमार्ग ५,३८२ किमी. फक्त माल वाहतुकीसाठी व रस्ते १,२५,८७० किमी. पैकी सु. ९३% पक्के होते. तिन्ही मुख्य नद्यांतून मालवाहतूक व सर्व प्रमुख शहरी विमानतळ होते. १११ नभोवाणी व १४ दूरचित्रवाणी केंद्रे असून मोठ्या शहरांत अनेक दैनिके व साप्ताहिके होती. लोकवस्ती ५६% ग्रामीण असून निग्रोंचे प्रमाण सु. १६% आहे. पूर्वीचा तीव्र वर्णभेद हळूहळू कमी होत असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षणापासून सुरुवात होऊन एकात्मता मूळ धरीत आहे. १९२५ पासून ७ ते १६ वर्षे वयापर्यंत शाळा हजेरी सक्तीची असून १६ वर्षाखालील मुलीस कामावर लावणे अवैध आहे. १९७२ मध्ये १,७८९ सार्वजनिक शाळांतून ४१,९४२ शिक्षक व ९,३६,०४७ विद्यार्थी होते. ४४ महाविद्यालये व ८ विद्यापीठे मिळून १९६८–६९ मध्ये १,१८,६२९ विद्यार्थी होते. १६६ रुग्णालयांत २३,०७६ खाटा व मनोरुग्णालयांत ७,०९६ खाटा होत्या. वृद्ध, अंध, अपंग यांस मदत दिली जाते. ग्रंथालये, संग्रहालये, बँका इ. सोयी भरपूर आहेत. राज्यातून जॅक्सन, जॉन्सन व पोल्क हे तीन राष्ट्राध्यक्ष निवडून आले होते.

महत्त्वाची स्थळे : मेंफिस हे औद्योगिक केंद्र, कपाशीचे जागतिक केंद्र व अमेरिकन ‘जॅझ’ नृत्यासाठी प्रसिद्ध नॅशव्हिल ही राजधानी असून शिक्षणाचे, ग्रामीण संगीताचे व वाद्यवृंदांचे केंद्र चॅटानूगा हे औद्योगिक, वाहतूक व ऐतिहासिक ठिकाण व नॉक्सव्हिल येथे टीव्हीएचे कार्यालय असून ओकरिज अणुसंशोधनासाठी प्रसिद्ध आहे. ग्रेट स्मोकी मौंटन व टीव्हीएचे जलाशय ही प्रवाशांची विशेष आकर्षणे आहेत. धर्म, पंथ, रूढी, समाजजीवन, भाषा, कला व क्रीडा यांबाबतीत टेनेसीचे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इतर राज्यांशी सामान्यतः साधर्म्य आहे. तथापि देशातील नवविचारांशी व जीवनपद्धतीशी एकरूप होण्यास टेनेसीची पावले हळू व सावधगिरीची आहेत. दक्षिणेकडील राज्यांची वैशिष्ट्ये येथे अद्याप रेंगाळताना आढळतात.

ओक, शा. नि.