जोहॅनिसबर्ग : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाचे सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ६,५४,६८२ उपनगरांसह १४,३२,६४३ (१९७०). हे प्रिटोरियापासून ५० किमी.वर आणि दरबानपासून ४८० किमी.वर ट्रान्सव्हालमधील विट्‌वॉटर्झरँड या सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या कटक मालिकेच्या दक्षिण उतारावर १८८६ मध्ये वसलेले आहे. येथे आसमंतातील सोन्याच्या खाणींशिवाय रसायने, कापड, कातडीसामान, अभियांत्रिकी उद्योग, औषधे इत्यादींचे मोठमोठे कारखाने असून खाणकंपन्या, उद्योगधंद्यांच्या व व्यापारी कंपन्या, बँका यांची कार्यालये व शासकीय खात्यांच्या शाखा आहेत. 

जोहॅनिसबर्ग : एक विहंगम दृश्य.

येथे गोरे, काळे, आफ्रिकी, यूरोपीय, आशियाई इ. सर्व प्रकारच्या लोकांची वस्ती असून वर्णभेद कसोशीने पाळला जातो. काळ्या-गोऱ्या लोकांसाठी वेगळे वस्तीविभाग, शाळा, तंत्रशाळा, महाविद्यालये, रुग्णालये व इतर आरोग्यविषयक सोयी, करमणुकीची व खेळांची विविध प्रकारची साधने, ग्रंथालये, संग्रहालये, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, उद्याने व कलाविथी इ. सांस्कृतिक गोष्टी असून दूरध्वनी, रेडिओ, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे व नियतकालिके इ. संपर्कसाधने सर्वांस उपलब्ध आहेत. देशातील लोहमार्गांचे व सडकांचे हे मोठे केंद्र असून येथे तीन विमानतळ आहेत. शहरवासियांसाठी लोहमार्गांची आणि सडकांची चांगली सोय आहे.

विट्‌वॉटर्झरँड विद्यापीठ, आफ्रिकन्स विद्यापीठ, वेधशाळा, कृत्रिम तारामंडळ वगैरे जोहॅनिसबर्गची वैशिष्ट्ये आहेत.  

लिमये, दि. ह.