नंदादेवी : भारतातील सर्वोच्च शिखर.

नंदादेवी : हिमालयाचे पाकिस्तानव्याप्त प्रदेशाव्यतिरिक्त भारतातील सर्वोच्च शिखर. उंची ७,८१७ मी. हे दुटोकी शिखर उत्तर प्रदेश राज्याच्या उत्तर भागात, गढवाल जिल्ह्याच्या पश्चिम सीमेजवळ आहे. याची पूर्व व पश्चिम शिखरे सु. ७,५०० मी. उंचीच्या ३ किमी.च्या दातेरी कटकाने जोडलेली आहेत. याच्या भोवती सु. ११२ किमी. परिघाच्या व सरासरी ६,१०० मी. उंचीच्या पर्वतरांगांची दोन वलये आहेत व त्यांत ६,४०० मी. पेक्षा जास्त उंचीची १९ शिखरे आहेत. या वलयांतून पश्चिमेकडून वाट काढून सु. ६२५ चौ. किमी. प्रदेशातील हिमवहन करणाऱ्या हिमनदीतून निघालेला ऋषिगंगा नदीचा खळाळता प्रवाह खाली कोसळतो आणि खोल, भयानक निदऱ्यांतून वाहत जाऊन पुढे गंगेला मिळतो. मायलम व पिंडारी हिमनद्यांना हिमपुरवठा नंदादेवी हिमक्षेत्रातूनच होतो. पिढ्यान्‌पिढ्या भाविक हिंदू यात्रेकरू जवळपासच्या भागात येऊन जात असले तरी १९३४ पर्यंत नंदादेवीच्या भीषण, रम्य परिसरात कोणीही पाय ठेविला नव्हता. त्यावर्षी एरिक शिप्टन व टिलमन यांनी तिघा शेरपांसह ऋषिगंगेच्या निदरीतून मोठ्या कष्टाने व धाडसाने वाट काढून आतल्या पर्वतवलयाच्या आत प्रवेश केला. भोवतीच्या पर्वतउतारांवर फर व स्प्रूसचे वृक्ष, मधल्या खोऱ्यात रानफुलांनी फुललेले व रानशेळ्या आणि रानमेंढ्या चरत असलेले ऊर्मिल कुरण, निळ्याशार पाण्याची छोटी छोटी सरोवरे, अनेक हिमनद्यांचे गोठलेले अंत्य प्रवाह आणि या सर्वांच्या मध्यभागी उभे असलेले नंदादेवीचे पवित्र शिखर असे विलोभनीय दृश्य त्यांनी पाहिले. १९३६ च्या २९ ऑगस्टला ओडेल व टिलमन यांनी नंदादेवी प्रथम सर केले. त्यानंतर १९५१ मध्ये तेनसिंग नंदादेवीच्या पूर्व शिखरावर चढून गेला होता. १९६४ मध्ये कॅ. नरेंद्रकुमार यांच्या नेतृत्वाखालील भारतीय तुकडीनेही नंदादेवी चढून जाण्यात यश मिळविले. नंदादेवीच्या दक्षिणेस सुंदरडुंगा खोऱ्यात १९७० पासून कलकत्ता विद्यापीठातर्फे शास्त्रीय संशोधन चालू आहे.

खातु, कृ. का.