धनसिरी नदी : (धनश्री). आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रेची डावीकडील प्रमुख उपनदी. लांबी सु ३०० किमी. ही बरैल टेकड्यांत उगम पावून उत्तर ईशान्य दिशेला वाहते. काही अंतर आसाम-नागालँड सीमेवरून व अरुंद दरीतून वाहत गेल्यावर अनेक उपनद्यांचे पाणी घेऊन दिमापूरजवळ ती सिबसागर जिल्ह्यात शिरते. येथे तिचे खोरे भिकीर व नागा टेकड्यांदरम्यान नसराळ्यासारखे एकदम रूंद होऊ लागते. गोलाकाट येथे ५० किमी. रूंद होते. येथून पश्चिम वाहिनी होऊन धनसिरीमुख येथे ती ब्रह्मपुत्रेस मिळते. तीच्या खोऱ्यात चहा, तांदुळ, कापुस ही प्रमुख पिके होतात. या खोऱ्यात, विशेषतः नागा टेकड्यांच्या बाजूला, लोकवस्ती जास्त दाट आहे. बोकाजान येथे या नदीवर रेल्वेपूल असून धनसिरी मुखापासून गोलाघाटापर्यंत जलवाहतूक होते. दिमापूर, बोकाजान, गोलाघाट ही धनसिरीच्या खोऱ्यातील प्रमुख शहरे आहेत.

डिसूझा, आ. रे.