अँटवर्प : बेल्जियममधील अँटवर्प प्रांताची राजधानी आणि यूरोप भूमिखंडातील रॉटरडॅमखालोखाल प्रसिद्ध बंदर. उपनगरांसह लोकसंख्या ६,७३,१११ (१९७०). हे उत्तर बेल्जियममध्ये ब्रुसेल्सपासून उत्तरेस ४२ किमी. वर स्केल्ट नदीकाठी वसले आहे. येथील हवामान ब्रुसेल्सप्रमाणे सम व दमट असून पाऊसही बेताचाच पडतो तथापि हवेतील दमटपणा बेल्जियममधील इतर शहरांच्या मानाने कमी आहे. येथील बहुसंख्य लोक रोमन कॅथलिक आहेत. लोकांची भाषा फ्लेमिश असून तुरळक प्रमाणात फ्रेंच भाषाही बोलली जाते.

 

प्राचीन काळापासून हे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. एका दंतकंथेनुसार नदीकाठी राहणारा अठरा फूट उंच राक्षस येथे येणार्‍या प्रत्येक जहाजाकडून कर वसूल करीत असे खलाशाने कर न दिल्यास त्याचा एक हात तोडून तो नदीत फेकून देई. फ्लेमिश भाषेत फेकणे ह्याला ‘वर्पे’ (Verpen) म्हणतात. हात फेकणे ह्यावरून अँटवर्पे हे नाव गावाला रूढ झाले असावे. ८२६ मध्ये नॉर्मन लोकांनी ते उद्‌ध्वस्त केले असल्याचा पुरावा मिळतो. तथापि १२व्या शतकात ते पुन्हा ऊर्जितावस्थेस आले. उत्तर समुद्रावरील गेंट व ब्रूझ ही बंदरे गाळ साचत गेल्यामुळे निरुपयोगी बनली, म्हणून १६ व्या शतकापासून तेथील सर्व व्यापार अँटवर्पहून चालू लागला. इंग्रज व्यापार्‍यांनी आपले कारखाने येथे उघडले निर्वासित ज्यू रत्‍नपारख्यांनी ही आपली कर्मभूमी बनविली आणि लवकरच अँटवर्प यूरोप खंडाचे सर्वांत मोठे बंदर व व्यापारपेठ झाले. १५७६–८५ दरम्यान स्पॅनिश लोकांच्या स्वार्‍यांमुळे अँटवर्पची खूपच नासधूस झाली. वेस्टफेलियाच्या तहामुळे (१६४८) स्केल्टवर नौकानयनास बंधने आली. त्यामुळे अँटवर्पचे व्यापारी महत्त्व फारच कमी झाले. नेपोलियनने अँटवर्पची सुधारणा करण्याचा प्रयत्‍न केला, परंतु १८३९ मध्ये नेदर्लंड्सने स्केल्टच्या मुखाशी कर घेण्यास सुरुवात केल्याने अँटवर्पचा व्यापार वाढू शकला नाही. १८६३ मध्ये बेल्जियमने स्केल्टवरचे हक्क विकत घेतले आणि अँटवर्पची वाढ झपाट्याने होऊ लागली. दोन्ही महायुद्धांत शहराची बरीच हानी झाली.

अँटवर्पला जगातील मोठमोठ्या बोटींची आवकजावक आहे. येथे मोठा विमानतळ असून लोहमार्गांनी व सडकांनी हे यूरोपातील सर्व प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. ॲल्बर्ट कालव्याने अँटवर्प बेल्जियमच्या आग्नेय भागातील औद्योगिक शहरांशी जोडलेले आहे. हिरे कापणे व त्यांस पैलू पाडणे हा येथील जुना व महत्त्वाचा धंदा. ॲमस्टरडॅमखालोखाल याबाबत अँटवर्पचा क्रमांक लागतो. येथील शेअरबाजार-केंद्र सर्वांत जुने समजले जाते (१४६०). बोटी बांधणे, तेल शुद्ध करणे, मोटारी बांधणे, पेट्रोकेमिकल हे येथील महत्त्वाचे उद्योग असून धातुकाम, रंगकाम, कातडीकाम, छायाचित्रणसाहित्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य, रसायने, दारू गाळणे, लेस तयार करणे वगैरेंचे अनेक कारखाने येथे आहेत. यांशिवाय येथे साखर-शुद्धीकरणाचेही कारखानेही आहेत.

 

अँटवर्प हे बेल्जियममधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर असून अत्यंत प्रेक्षणीय आहे. शहराची रचना अत्यंत रेखीव व आकर्षक आहे. नदीच्या दोन्ही तीरांवर वस्ती असून छोट्या पुलांनी दोन्ही बाजूंचा संपर्क साधला आहे. पूर्वी ठिकठिकाणी लहान बुरूज व काही ठिकाणी कोट बांधले होते, त्यांचे अवशेष आढळतात. गॉथिक शिल्पातील आकर्षक नोत्र दाम या जुन्या चर्चचा मनोरा १२२ मी. उंच असून त्याच्या भिंतीवर रूबेन्स या प्रसिद्ध चित्रकाराची तीन चित्रे आहेत. १५व्या शतकात बर्गंडीच्या राजाने येथे चित्रकला-अकादमी स्थापन केली. सुप्रसिद्ध चित्रकार व्हॅनडाइक याची ही जन्मभूमी तर क्वेंतिन मासाइस आणि रूबेन्स यांची ही कर्मभूमी. येथे १५व्या शतकात बांधलेले नगरभवन प्रबोधनकालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. ह्याशिवाय येथील फ्लेमिश चित्रकलेचे संग्रहालय प्रेक्षणीय आहे. १६व्या शतकात होऊन गेलेल्या क्रीस्तॉफ प्लांतँ या मुद्रणतज्ञामुळे अँटवर्प मुद्रणकलेचे माहेरघर समजले जात असे. येथील प्राणिसंग्रहालय जगप्रसिद्ध आहे. 

देशपांडे, सु. र.

अँटवर्प : बेल्जियममधील प्रमुख बंदर.