अंबरनाथ : ठाणे जिल्ह्याच्या कल्याण तालुक्यातील औद्योगिक वसाहत. लोकसंख्या ५६,४६१ (१९७१). मुंबई-ठाणे रेल्वेमार्गावर कल्याणच्या आग्नेयीस सहा किमी. वर अंबरनाथ आहे. रेल्वेस्थानकापासून गाव सु. चार किमी. दूर आहे. येथे एक प्राचीन शिवालय आहे. ह्याच्या सभामंडपाच्या द्वारावरील शिलालेखानुसार शिलाहारांपैकी महावनिराज याने हे देवालय १०५० मध्ये बांधले असावे. मध्ययुगीन व हेमाडपंती वास्तुकलेचे अत्युत्तम मिश्रण असलेल्या त्याच्या आजच्या स्वरूपावरून देवालयाचा पूर्वी जीर्णोद्धार झाला असावा. आज देवालय मोडकळीस आलेले असूनही, त्याच्या भिंती, छत, स्तंभ, विमान ह्यांची बांधणी व त्यांवरील शिवपार्वती, त्रिमूर्ती, गणेश इ. देवादिकांची चित्रे आणि विविध कोरीव आकृत्या प्रेक्षणीय आहेत. दुसऱ्या महयुद्धानंतर अंबरनाथला महत्त्व मिळाले. येथे युद्धोपयोगी साहित्य, आगपेट्या, घड्याळे, खते, रसायने ह्यांचे कारखाने आहेत.

दातार, नीला.