सहारा : जगातील सर्वांत मोठे उष्ण कटिबंधीय वाळवंट. अरबी भाषेतील ‘ सहारा ’ म्हणजे ‘ वाळवंट ’ यावरून या प्रदेशाला हे नाव पडले आहे. उत्तर गोलार्धातील या वाळवंटाने उत्तर आफिकेचा विस्तृत प्रदेश व्यापलेला आहे.पश्र्चिमेस अटलांटिक महासागरापासून पूर्वेस तांबडया समुद्रापर्यंत, तसेच उत्तरेस ॲटलास पर्वत व भूमध्य समुद्रापासून दक्षिणेस सॅव्हाना किंवा सूदान प्रदेशापर्यंत याचा विस्तार असून तो पूर्व-पश्र्चिम ५,६३० किमी. तर उत्तर-दक्षिण १,९३० किमी.पेक्षा अधिक आहे. क्षेत्रफळ सु. ७७,००,००० चौ. किमी. सांप्रत दक्षिणेस १५°३’ उ. अक्षवृत्तापर्यंत सहाराचा विस्तार असून तो दक्षिणेस हळूहळू वाढत असल्याचे आढळून आले आहे. मोरोक्को, अल्जीरिया,टयुनिशिया, लिबिया, ईजिप्त, मॉरिटेनिया, माली, नायजर, चॅड व सूदान इत्यादी देशांत सहाराचा विस्तार झालेला आहे. सहाराला वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. नाईल नदी व तांबडा समुद्र यांदरम्यानचे पूर्व वाळवंट व न्यूबियन वाळवंट तर ईजिप्त-लिबिया यांच्या सरहद्द प्रदेशातील लिबियन वाळवंट म्हणून ओळखले जाते.

भूरचना : विस्तृत वालुकामय प्रदेश, पर्वतीय प्रदेश, विस्तीर्ण खडकाळ पठारे व मैदाने, रेतीयुक्त मैदाने व वालुकागिरी, उथळ व हंगामी जलमय द्रोणी, खोलगट भागातील विस्तृत द्रोणी प्रदेश ही सहारातील प्रमुख भूरूपे आहेत. नाईलच्या खोऱ्यातील कृषिक्षेत्र व मरूदयानांमुळे हे ओसाड वाळवंट खंडित झालेले आहे. दक्षिण भागात उत्तरेकडील सहारा वाळवंट व दक्षिणेकडील आर्द्र सॅव्हाना प्रदेश यांदरम्यानचा साहेल हा संकमणात्मक प्रदेश आहे. संपूर्ण सहाराचा विचार केला तर बहुतांश भाग कमी उंचीचा पठारी असून मध्यवर्ती भाग पर्वतीय व उंचवटयाचा आहे. सहारा प्रदेशाची सरासरी उंची ३०० ते ४०० मी. दरम्यान आहे. मध्य सहारात अहॅग्गर व तिबेस्ती हे प्रमुख पर्वतीय प्रदेश असून त्यांची निर्मिती ज्वालामुखी क्रियेतून झालेली आहे. ह्या ओसाड ओबडधोबड पर्वतीय प्रदेशांचे वारा व पाणी यांमुळे बरेच खनन झालेले आहे. यातील काही शिखरांची उंची सस.पासून ३,००० ते ३,५०० मी.पर्यंत आढळते. अहॅग्गर पर्वत अल्जीरियाच्या दक्षिण भागात असून त्यातील तहात शिखराची उंची २,९१८ मी. आहे. अहॅग्गरच्या दक्षिणेस असलेले एअर व आद्रार दे झीफोरा हे पर्वतीय भाग म्हणजे अहॅग्गरचेच विस्तारित भाग आहेत. एअर पर्वताची उंची एकदम कमी होत जाऊन तो तेनेरे या सपाट व वालुकामय मैदानात विलीन होतो. अहॅग्गरच्या ईशान्येस असलेला उंचवटयांचा प्रदेश तासिली-एन-अज्जेर नावाने ओळखला जातो. चॅडच्या उत्तर भागात असलेल्या तिबेस्ती पर्वतात उंच शिखरे आहेत. त्यांतील मौंट एमीकूसी ( उंची ३,४१५ मी.) हे सहारातील सर्वोच्च शिखर आहे.

दक्षिण मोरोक्को ते ईजिप्त यांदरम्यानच्या उत्तर सहारा प्रदेशात स्थलांतरित वालुकागिरी ( अर्ग ), रेतियुक्त मैदाने ( रेग ) व वाऱ्याच्या झीज कार्यामुळे उघडया पडलेल्या तलशिलांचा प्रदेश ( हामाडा ) आढळतो. अर्ग हा सहारामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळणारा भूविशेष आहे. सहाराच्या एकूण क्षेत्रफळाच्या एक दशांशपेक्षा अधिक क्षेत्र अर्गने व्यापले आहे. काही ठिकाणी अर्गची उंची १८० मी.पर्यंत आढळते. केशाकर्षण व बाष्पीभवन क्रियेमुळे भूपृष्ठावर क्षार जमा होतात. वारा व रेती यांच्या घर्षण कार्यामुळे या क्षारयुक्त भागावर गिलावा केल्यासारखे वाळटी वंकिंवा खडकाळ मैदान दिसते त्याला ‘ रेग ’ म्हणतात. वाऱ्यामुळे यातील वाळू व बारीक घटक वाहून गेलेले असतात. रेगने सहाराचे बरेच क्षेत्र व्यापले आहे. दक्षिण सहाराचा प्रदेश कमी उंचीच्या पठारांनी व विस्तृत मैदानांनी व्यापलेला आहे. या प्रदेशात अतिशय तुरळक प्रमाणात खजुराचे वृक्ष आढळतात.

पश्र्चिम सहारा सखल, मंद उताराचा, वालुकागिरी व रेतीयुक्त मैदानांचा असून अधूनमधून त्यात कमी उंचीचे हामाडा व टेकडया आढळतात. तानेझ्रूफ्त हा त्यातील सर्वांत विस्तृत व भूरूपविरहित प्रदेश असून तो सहारातील सर्वांत निर्जन व ओसाड भागांपैकी एक आहे. एल् जाऊफ, अर्ग शेष व अर्ग ईगिडी ही पश्र्चिम भागातील वाळवंटे आहेत. पश्र्चिम सहारातील फारच थोडा भाग सस.पासून ३०० मी.पेक्षा अधिक उंचीचा आहे. अगदी पश्र्चिमेचा भाग तर १५० मी.पेक्षाही कमी उंचीचा आहे. उत्तर सहारामध्ये ग्रेट ईस्टर्न व ग्रेट वेस्टर्न अर्ग हे अतिशय ओसाड वालुकामय भाग आहेत. पूर्व सहाराचा बहुतांश भाग लिबिया वाळवंटाने (१३,००,००० चौ. किमी.) व्यापलेला आहे. त्यात वालुकागिरी व उघडे पडलेले खडक ही भूरूपे आढळतात. अगदी ईशान्य भागात ईजिप्तमध्ये  ‘ क्वॉटारा डिप्रेशन ’ हा सस.पासून १३३ मी. खोलीचा प्रदेश आहे. आफ्रिका खंडातील हा दुसरा सर्वाधिक खोलीचा भाग आहे.

नाईल व नायजर वगळता सहारातून वाहणाऱ्या अन्य मोठया व कायमस्वरूपी नदया नाहीत. ॲटलास पर्वताच्या पूर्व पायथ्याजवळ सस.पेक्षाही खोल असलेल्या द्रोणींमध्ये अधूनमधून वाहणारी खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत, त्यांना ‘ शॉट ’ म्हणतात. ॲटलास पर्वताकडून सहारा प्रदेशाकडे वाहत येणाऱ्या खंडित प्रवाह भागात आर्टेशियन विहिरी व झृयांच्या प्रदेशात मरूदयाने आढळतात. विहिरी किंवा झरे हे या प्रदेशातील पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. मोठया पावसानंतर अल्पकाळ वाहणाऱ्या येथील नदयांना ‘ वाडी ’ म्हणतात. त्यांच्या संख्या पुष्कळ आहे.

हवामान : सहाराचे हवामान उष्ण व कोरडे असते. अती शुष्कता हे येथील हवामानाचे वैशिष्टय आहे. जगातील सर्वांत उष्ण प्रदेशांमध्ये सहाराचा समावेश होतो. सांप्रत सहारा वाळवंट दोन प्रकारच्या हवामानांच्या विभागांत मोडते. उत्तरेकडे उपोष्ण कटिबंधीय शुष्क वाळवंटी प्रदेश आहे. दक्षिण सहारात स्थिर, खंडीय उपोष्ण कटिबंधीय वायुराशी व अस्थिर, दक्षिणी उष्ण कटिबंधीय सागरी वायुराशी यांच्यातील आंतरक्रियांमुळे उष्ण कटिबंधीय कोरडे हवामान निर्माण झाले आहे.

कोरडी हवा व मेघाच्छादनाचा अभाव यांमुळे सूर्यास्तानंतर लगेचच तापमानात एकदम घट होते. त्यामुळे दैनिक तापमानकक्षा नेहमीच सु. २८° से. असते. उन्हाळ्यात सरासरी तापमान सतत ३८° से.पेक्षा अधिक राहते. जगातील सर्वाधिक म्हणजे ५८° से. इतक्या अधिकृत तापमानाची नोंद सप्टेंबर १९२२ मध्ये लिबियातील अल् अझीझीयाह येथे झाली आहे. उत्तर सहारापेक्षा दक्षिण सहारात तापमानकक्षा कमी असते. हिवाळ्यात सरासरी तापमान १०° ते १६° से.च्या दरम्यान असते. हिवाळ्यात रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते. सहारातील केवळ काही पर्वतीय प्रदेश वगळता कोठेही वार्षिक सरासरी पर्जन्यमान १३ सेंमी.पेक्षा अधिक असत नाही. उत्तर सहारात बहुतांश वृष्टी हिवाळ्यात होते. मध्य सहाराचे वार्षिक सरासरी वृष्टिमान २.५ सेंमी. असून बाहेरच्या बाजूस हे प्रमाण १२.५ सेंमी.पेक्षा अधिक वाढलेले आढळते. पूर्वेकडील व पश्र्चिमेकडील विस्तृत प्रदेशात वर्षाला केवळ २ ते ५ सेंमी. पाऊस पडतो. काही प्रदेशात तर कित्येक वर्षांपासून पाऊसच पडलेला नसतो. मात्र कधीतरी येणाऱ्या एखादया मुसळधार पावसात १३ सेंमी.पेक्षा अधिक पाऊस पडून जातो. पर्वताचे माथे कधीकधी हिमाच्छादित बनतात. उत्तर सहारात वसंत ऋतूत उष्ण, धूळयुक्त दक्षिणी वारे वाहतात तर दक्षिण सहारात हिवाळ्यात धूळयुक्त ईशान्य वारे वाहतात.


वनस्पती व प्राणी : सहारातील वेगवेगळ्या प्रदेशांत सामान्यपणे गवत, विविध फुलझाडे, खजूर, ताड, बाभूळ व टॅमॅरिकेसी कुलातील वनस्पती आढळतात. मरूदयानाचा भाग वगळता इतरत्र तुलनेने जेथे अधिक पाणी उपलब्ध असते तेथे तुरळक व विखुरलेली वनश्री दिसते. बहुतांश वनस्पतींची, विशेषत: लहान फुलझाडांच्या प्रकारातील वनस्पतींची, मुळे अगदी वरच्यावर राहतात आणि ओलाव्यासाठी कधीतरी पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतात. काही भागात कोरडया हवामानात टिकाव धरू शकणारे गवत, झुडुपे व इतर वनस्पती आढळतात. काही वनस्पती अल्पजीवी असतात. वनस्पतींचे जमिनीवर पडलेले बी पाऊस पडेपर्यंत अंकुर न फुटता तसेच पडून राहते. हा कालावधी काही वर्षांचा देखील असू शकतो. पाऊस पडल्यानंतर मात्र त्यांची वेगाने वाढ सुरू होऊन सहा ते आठ आठवडयांत त्यांचा जीवनकाळ संपून जातो. वर्षापेक्षा अधिक काळ जिवंत राहणाऱ्या वनस्पती वेगवेगळ्या मार्गांनी पाणी मिळवितात. मरूदयानात किंवा वाडीजवळ आढळणाऱ्या वनस्पतींची मुळे जमिनीत खूप खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. यांमध्ये खजूर, टॅमॅरिकेसी कुलातील व इतर वनस्पती आणि वेगवेगळ्या वाळवंटी झुडुपांचा समावेश होतो. काही वनस्पती आपल्या पानांच्या साहाय्याने हवेतील बाष्प शोषून घेतात. दक्षिण अल्जीरियातील तानेझ्रूफ्त या अती कोरडया प्रदेशात तसेच लिबियाच्या वाळवंटातील काही भागात कोणत्याही प्रकारची वनश्री आढळत नाही. त्यामुळे तेथे मरूदयाने किंवा पशुपालक जमातीही नाहीत. अंतर्गत सहारात पर्जन्य अतिशय कमी असल्याने केवळ तुरळक ठिकाणीच शेळ्या व उंटांसाठी चारा उपलब्ध होतो. तेथे आढळणाऱ्या जमातीही तुरळक व भटक्या आहेत.

सहारातील बहुतांश प्राणिजीवन वाळवंटाच्या उत्तर व दक्षिण सरहद्द प्रदेशात आणि मरूदयानात आढळते. पांढरे कुरंग, ॲडॅक्स नावाने ओळखले जाणारे दुर्मिळ हरिण हे सहारामध्ये सर्वाधिक आढळणारे प्राणी असून ते वालुकागिरींतून भटकत असतात. यांशिवाय साप, सरडे, जर्बिल, साळिंदर, तरस, ससे, फेनेक नावाने ओळखले जाणारे छोटे कोल्हे हे प्राणी व वेगवेगळ्या प्रकारचे कीटक सहारात आढळतात. खडकाळ पठारी भागात बर्बरी मेंढया आढळतात. बरेचसे प्राणी पाण्याशिवाय दीर्घकाळ राहू शकतात. ते खात असलेल्या वनस्पतींपासून काही प्रमाणात पाणी मिळवितात. अनेक लहान प्राणी दिवसा उष्णतेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आपल्या बिळात राहतात व रात्री खादयाच्या शोधार्थ बाहेर पडतात. खडकाळ भागात किंवा वालुकागिरीत सामान्यपणे सरडगुहिरा व कोबा आढळतात. पक्ष्यांच्या स्थानिक व स्थलांतरित ३०० वर जाती पाहावयास मिळतात.

इतिहास : प्लाइस्टोसीन हिमयुग सु. १०,००० वर्षांपूर्वी संपले. त्यावेळी सांप्रत सहारा प्रदेशातील हवामान बरेच आर्द्र स्वरूपाचे होते. अल्जीरिया व इतर वाळवंटी भागात सापडलेल्या गुहाचित्रांवरून एकेकाळी सहाराचे हवामान आर्द्र आणि जमीन सुपीक होती हे स्पष्ट होते. अनेक सरोवरे व प्रवाहांचे अस्तित्व होते. अगदी सुरूवातीस या भागात आफिकन लोकांचे वास्तव्य असे. बराचसा भाग गवताळ प्रदेशांनी व जंगलांनी व्यापलेला होता. त्यांत हत्ती, जिराफ व इतर वन्य प्राण्यांचा वावर असे. सहाराच्या बऱ्याच दक्षिणेस आज आढळणारी गोपालक संस्कृती त्यावेळी या भागात अस्तित्वात असल्याच्या खुणा दिसतात. इ. स. पू. सु. ५००० वर्षांपूर्वीपर्यंत या प्रदेशात मासेमारी व शिकार करणाऱ्या निगॉइड लोकांचे वास्तव्य होते. पुढे त्यांनी मध्यपूर्व आशियाच्या संपर्कातून शेती व पशुपालन  कला अवगत केली. दक्षिण सहारामध्ये म्हणजेच सांप्रत माली देशामध्ये शेती व्यवसाय विकसित झाला होता.

इ. स. पू. सु. ५००० नंतर मात्र येथील हवामान कोरडे बनण्यास सुरूवात झाली. पुढे हजारो वर्षे ही प्रक्रिया चालू राहिली. मूळ आर्द्र हवामान असलेल्या या प्रदेशाचे जलवायुमानदृष्टया वाळवंटी प्रदेशात रूपांतर होत गेले. शतकानुशतके येथील लोकांनी केलेली अतिगुरचराई आणि सहाराच्या सरहद्द प्रदेशातील झाडा-झुडुपांची केलेली बेसुमार तोड यांमुळे सहारा वाळवंटाचा विस्तार वाढतच गेला. सहारा प्रदेश जसजसा कोरडा बनू लागला तसतसे येथील निगॉइड लोक हळूहळू दक्षिणेकडे स्थलांतरित होऊ लागले. आफिकेच्या वायव्य किनाऱ्यावर राहणारे बर्बर लोक हळूहळू संपूर्ण सहारा प्रदेशात स्थायिक होत गेले.

ख्रिस्तपर्वात मध्यपूर्व आशियातून सहाराकडे उंट आणण्यात येऊ लागले. तोपर्यंत सहारा प्रदेशातील व्यापार घोडा व गाडीनेच केला जात असे. बर्बरांच्या ताब्यात असलेल्या व्यापारी मार्गाने उंटांचे तांडे सहाराकडे येऊ लागले. इ. स. ४० ते २३५ या रोमन साम्राज्याच्या उत्कर्षाच्या काळात रोमनांनी सहाराच्या उत्तरेकडील सरहद्द प्रदेशात शहरे वसविली, रस्ते बांधले व शेतीच्या सुधारित पद्धती आणल्या. इ. स. चौथ्या शतकात व्हँडॉल लोकांनी आफिकेच्या उत्तरेकडील भाग जिंकून घेतला. फिनिशियन, ग्रीक व रोमनांच्या उत्तर आफिकेतील वसाहतींच्या काळात सहारा प्रदेश मात्र अपरिचित व असमन्वेषित राहिला. बर्बर हे भटके पशुपालक भूमध्यसागरी किनाऱ्यावर राहत होते ते हळूहळू दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेशाकडे सरकू लागले. मध्य व पश्र्चिम सहाराचा बहुतांश भाग आपल्या वर्चस्वाखाली येईपर्यंत बर्बरांचा हा प्रवास तसाच चालू राहिला.

सहाव्या व सातव्या शतकात अरब लोकांनी उत्तर आफिकेत आकमण करून तेथील लोकांचे इस्लाम धर्मात धर्मांतर घडवून आणण्यास सुरूवात केली. दहाव्या शतकापर्यंत अरबांनी सहाराच्या दक्षिण सरहद्द प्रदेशापर्यंत इस्लाम धर्माचा प्रसार केला. चौदाव्या शतकापर्यंत इस्लामचा प्रसार वाढतच गेला. अरबी हीच सहारामधील लोकांची प्रमुख भाषा बनली. या कालावधीत येथील व्यापार चांगलाच भरभराटीस आला होता. नायजर नदीच्या काठावरील तसेच पूर्वेकडील राज्ये आपल्याकडील सोने व गुलामांच्या बदल्यात उत्तरेकडील लोकांकडून मीठ व इतर वस्तू वस्तुविनिमय पद्धतीने विकत घेत असत.

पंधराव्या शतकात यूरोपीयांचे पश्चिम आफिकेच्या किनाऱ्यावर आगमन झाले. त्यामुळे सागरी मार्गाने येथील वस्तू उत्तरेकडे जाऊ लागल्या. परिणामत: सहारा मार्गाने होणारा व्यापार घटला. अठराव्या शतकाच्या थोडे आधी यूरोपीयांनी सहाराच्या समन्वेषणास सुरूवात केली. तोपर्यंत त्यांना सहाराबाबत फारच थोडी माहिती होती. त्यांच्या नकाशातही हा भाग पूर्णपणे कोरा असे. मध्ययुगात अरबांनी लिहून ठेवलेल्या माहितीच्या आधारे त्यांचे समन्वेषक या प्रदेशाच्या समन्वेषणाचे नियोजन करीत होते. त्यांचे सुरूवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले परंतु १८५० च्या दशकात मात्र हे महावाळवंट पार करण्यात अनेक समन्वेषकांना यश आले. ब्रिटिश समन्वेषकांचा गट ( डेनम, क्लॅपर्टन, ऑडने ), फ्रेंच समन्वेषक रेने व   जर्मन समन्वेषक हाइन्रिख बार्ट हे त्यातील यशस्वी समन्वेषक ठरले. दरम्यानच्या काळात यूरोपीयांनी उत्तर आफिकेत वसाहती स्थापन करण्यास सुरूवात केली होती. फ्रान्सने सहाराच्या बऱ्याच प्रदेशावर ( ईजिप्त, लिबिया, अँग्लो-ईजिप्शियन सूदान व पश्चिमेकडील स्पॅनिश प्रदेश वगळता ) ताबा मिळविला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फ्रान्स, स्पेन, इटली व ग्रेट ब्रिटनने सहाराच्या वेगवेगळ्या भागाचा ताबा घेतला. १९५० च्या दशकापासून सहारामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या जोरदार चळवळी सुरू झाल्या. १९६० च्या दशकापर्यंत स्पॅनिश सहारा वगळता इतर सर्व यूरोपव्याप्त प्रदेश स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले. १९७६ मध्ये स्पेनने स्पॅनिश सहारावरील आपला ताबा सोडला आणि तो प्रदेश पश्चिम सहारा म्हणून अस्तित्वात आला. सहाराच्या दक्षिण सरहद्द भागात साहेल हा संकमित प्रदेश आहे. १९६० च्या दशकाच्या अखेरपासून हा प्रदेश तीव्र अवर्षणग्रस्त बनला. १९८० च्या दशकापर्यंत ती परिस्थिती तशीच राहिली. या अवर्षण काळात पडलेला दुष्काळ व उपासमारीमुळे अगणित भटके पशुपालक व त्यांचे पशुधन मृत्यूच्या खाईत लोटले गेले. संपूर्ण प्रदेश उजाड झाला. हे अवर्षण म्हणजे या प्रदेशातील सामान्य व नियतकालिक वातावरणीय बदल आहे. काहींच्या मते हे अवर्षण म्हणजे सहारा प्रदेशाचा विस्तारच आहे.


आर्थिक स्थिती : सहारातील मानवी व्यवसाय काही अपवाद वगळता पूर्णपणे पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून आहेत. केवळ जेथे भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठालगत पाणी उपलब्ध आहे अशा मरूदयानांतच कायमस्वरूपी मानवी वस्ती आढळते. अशी मरूदयाने सहाराच्या बहुतांश भागात विखुरलेली आहेत. पैकी बरीचशी वाडीच्या काठावर किंवा इतर वाळवंटी प्रदेशापेक्षा थोडया अधिक पाऊस पडणाऱ्या उंचवटयाच्या भागात आढळतात. सहारात एकूण सु. ९० मोठी आणि अनेक लहानलहान मरूदयाने आढळतात. काही मरूदयानांवर केवळ एक किंवा दोन कुटुंबांचाच उदरनिर्वाह होतो. येथील मृदांत सेंद्रीय घटकांचे प्रमाण कमी असते. खोलगट भागात क्षारयुक्त मृदा आढळतात. त्यामुळे शेती व्यवसायावर मर्यादा पडतात. काही मरूदयानांत ताड वृक्षाच्या छोटया राई आढळतात तर इतर मरूदयाने शेतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. सहारातील बरेच लोक शेती करतात. खजूर, अंजीर व इतर फळे ही येथील प्रमुख व्यापारी पिके आहेत. गहू, बार्ली व विविध प्रकारचा भाजीपाला स्थानिक वापरासाठी पिकविला जातो. प्रामुख्याने जलसिंचनाच्या साहाय्याने पिके घेतली जातात.

इ. स. दहाव्या दशकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत उंटांच्या तांडयांमार्फत येथील व्यापार चालत असे. या तांडयांमार्फत माराकेश, कॉन्स्टंटीन व ट्रिपोली या बर्बरी शहरांकडून तिंबक्तू, कानो या सूदानी केंद्रांकडे कापड, मीठ, काचेचे मणी व अन्य उत्पादित वस्तू विकीसाठी आणल्या जात. त्यांच्या बदल्यात सोने, चामडी वस्तू, मिरी, कोलानट फळे ही उत्पादने व गुलाम विकीसाठी उत्तरेकडे पाठविले जात. अजूनही स्थानिक व्यापार व प्रवासासाठी मोठया प्रमाणात उंटांचा वापर केला जातो. परंतु दूरवर सहारामधून वाहतुकीसाठी ट्रक व विमानांचा वापर केला जातो. काही प्रदेशांतील फरसबंदी रस्ते प्रमुख मरूदयानांना जोडतात. कच्च्या रस्त्यांवरून मोटारी चालविल्या जात असल्या तरी ते जिकीरीचे असते. सहारातील मुख्य वाहतूक मार्ग पश्र्चिम-पूर्व गेलेले असून त्यांना महत्त्वाचे मार्ग येऊन मिळतात.

सहारातील बहुतांश पशुपालक वर्षातील काही काळ वाळवंटात घालवितात. तर उर्वरित काळ पर्वतीय प्रदेशात किंवा मरूदयानात घालवितात. शेळ्या, मेंढया व उंटांचे कळप पाळून तसेच वेगवेगळ्या मरूदयानांदरम्यान आणि वाळवंटाच्या सरहद्द भागातील शहरांदरम्यान व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. १९६० च्या दशकापासून वाळवंटातील तसेच सरहद्द प्रदेशातील शुष्कता वाढत गेल्याने येथील रहिवाशांची संख्या बरीच घटली आहे.

खनिज संपत्तीच्या बाबतीत सहारा समृद्ध आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध धातू खनिजांचा प्रमुख उत्पादक म्हणून सहाराचा विकास होत आहे. अल्जीरिया, लिबिया व टयुनिशियात खनिज तेल व नैसर्गिक वायूची प्रमुख क्षेत्रे असून ती नळमार्गांनी भूमध्य समुद्रावरील वेगवेगळ्या बंदरांशी जोडलेली आहेत. यांशिवाय लोहखनिज, मँगॅनीज, तांबे, युरेनियम, प्लॅटिनम, कोमियम, थोरियम, फॉस्फेट, कथिल, निकेल, जस्त, शिसे, कोबाल्ट, सोने, चांदी यांचे साठे आहेत. परंतु प्रदेशाच्या दुर्गमतेमुळे यातील काही खनिजांचे विशेष उत्पादन घेतले जात नाही. लोहखनिज उत्पादनासाठी मॉरिटेनिया महत्त्वाचा आहे. मोरोक्कोतून मोठया प्रमाणात फॉस्फेटची निर्यात केली जाते. मीठ ही येथील एक महत्त्वाची संपदा आहे. ताउदेनी व बिल्मा मरूदयान येथून मिठाचे मोठे उत्पादन घेतले जाते.

लोक व समाजजीवन : सहारा प्रदेशाची लोकसंख्या सु. २० लक्ष आहे. दर चौ.किमी.स एका व्यक्ती पेक्षाही कमी इतकी लोकसंख्या विरळ आहे. बराचसा भाग निर्मनुष्य आहे. केवळ वनस्पती व पाण्याची उपलब्धता असलेल्या भागातच लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. कायम वस्ती केवळ मरूदयानातच आढळते. मरूदयानातील बहुतांश वस्तींमधील लोकसंख्या २,००० पेक्षा कमी असते. मूर, तुआरेग, बर्बर, अरब, टिबू हे येथील प्रमुख रहिवासी आहेत. बहुतेक सर्वच लोक इस्लामधर्मीय असून अरबी ही त्यांची मुख्य भाषा आहे. सहारातील बहुतांश लोक अरब किंवा बर्बर किंवा अरब-बर्बर यांच्या मिश्र वंशपरंपरेतील आहेत. मूर, अरब-बर्बर यांच्या मिश्र गटांची संख्या बरीच असून ते प्रामुख्याने पश्चिम व वायव्य सहारात राहतात. मूळ बर्बर वंशातील व बर्बरभाषिक तुआरेग हे भटके पशुपालक सर्वत्र व सर्वाधिक आढळतात. त्यांचे केंद्रीकरण एअर व अहॅग्गर या मध्यवर्ती उंचवटयाच्या प्रदेशांत झालेले आहे. मध्य सहारापासून पश्चिम सहारापर्यंत ते भटकत असतात. अल्जीरियातील एम्झाब प्रदेशात बर्बर लोकांचे आधिक्य असून ते खडकाळ टेकडयांच्या किंवा ‘मेसा’ प्रदेशात वसलेल्या नगरांत राहतात. उत्तर सहारात सर्वाधिक संख्या कॉकेसॉइड लोकांची असून अरब व बर्बर त्यांचे प्रतिनिधी आहेत. तिबेस्तीमध्ये आढळणारे टिबू व टेबू हे भटके पशुपालक आहेत. ते मिश्रवंशीय असून निगोंसारखे दिसतात. काहींच्या मते ते सहारातील मूळ रहिवाशांचे वंशज आहेत. दक्षिण सहारात हेमेटिक व निगो यांच्या मिश्र वंशाचे लोक राहतात. सूफ द्रोणी प्रदेशात अरब लोक रहात असून तेथे त्यांनी खजुराच्या वृक्षांची लागवड केली आहे. दक्षिण लिबियातील फेझान या रेतीयुक्त प्रदेशात स्वतंत्र वंश परंपरेतील फेझानी लोक राहतात. ईशान्य लिबियन सायरेनेइका या खडकाळ पठारी प्रदेशाच्या किनारी भागात, तसेच अंतर्गत कुरणांच्या प्रदेशात सानूसी लोक राहतात. काही निगो वंशाचे लोक असून त्यांचे दक्षिण भागात आधिक्य आहे. ग्रेट वेस्टर्न अर्ग व अल्जीरियातील दगडगोटयांचे तानेझ्रूफ्त मैदान यांसारख्या विस्तीर्ण वाळवंटी पदेशात कायमस्वरूपी वस्ती नाही.

सहारातील बहुतेक लोक भटके जीवन जगतात. शेळ्या, मेंढया व गुरांचे कळप पाळतात. पाणी व चाऱ्याच्या शोधार्थ ते वाळवंटी प्रदेशातून भटकत राहतात. हिवाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा भटक्या जमातीचे लोक शेळ्या-मेंढया चारण्यासाठी सहारामध्ये येतात, परंतु उन्हाळ्याचा कोरडा ऋतू सुरू झाला की त्यातील बहुतांश जमाती ॲटलास पर्वताच्या किंवा उंच पठारी प्रदेशाच्या उत्तरेस जातात. दक्षिण सरहद्द प्रदेशात उन्हाळी  पर्जन्याच्या काळात भटके पशुपालक शेळ्या-मेंढया व गुरे चारतात. हिवाळ्याच्या कोरडया काळात ते दक्षिणेकडे स्थलांतर करतात. काही लोक खजूर, बार्ली, गहू व इतर पिकांचे उत्पादन घेतात. काही मरूदयानांत हजारो खजुराची झाडे असतात परंतु जेथे पाण्याचा तुटवडा असतो तेथे एक झाड अनेकांच्या मालकीचे असते. काही प्रदेशातील मरूदयानांत आढळणाऱ्या विहिरी व झऱ्याच्या पाण्यावर खजूर, बार्ली व भाजीपाल्याची लागवड केली जाते.

चौधरी, वसंत