कझाकस्तान : रशियन संघराज्यांपैकी एक राज्य. क्षेत्रफळ २७,२५,५८० चौ. किमी. लोकसंख्या १·३४७ कोटी (१९७२). पूर्वपश्चिम ३,००० किमी. व दक्षिणोत्तर १,५०० किमी. पसरलेल्या कझाकस्तानच्या पश्चिमेस कॅस्पियन समुद्र, वायव्येस आणि उत्तरेस रशियाची मुख्य भूमी, पूर्वेस चीन आणि दक्षिणेस तुर्कमेन, उझबेकिस्तान व किरगीझिया ही रशियन संघराज्ये आहेत. क्षेत्रफळांच्या दृष्टीने रशियन संघराज्यात हे दुसऱ्या क्रमांकाचे असून आल्माआता ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : या प्रदेशाचा समावेश समशीतोष्ण कटिबंधातील स्टेप या गवताळ प्रदेशात होतो. या प्रदेशात मुख्यत्वेकरून खारी सरोवरे आढळून येतात. प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने या राज्याचे विभाग पुढीलप्रमाणे पाडता येतील : पश्चिमेकडे असलेला कॅस्पियन समुद्रालगतचा प्रदेश व तूराणचा कमी उंचीचा प्रदेश जास्त उंची असलेला मध्यभाग आणि पूर्वेकडे व आग्‍नेयीकडे पसरलेला पर्वतमय प्रदेश. पश्चिम कझाकस्तानमध्ये येणारा कॅस्पियन समुद्रालगतचा प्रदेश व तूराणचा कमी उंचीचा प्रदेश दक्षिण उरलच्या मूगजार टेकड्यामुळे वेगळा केला गेलेला आहे. या प्रदेशात शुष्क आणि विरळ लोकवस्तीच्या उश्तउर्त पठाराच्या पश्चिमेकडील भागाचा समावेश होतो. या प्रदेशातून वाहणाऱ्या मुख्य नद्या उरल व एंबा कॅस्पियनला मिळतात, तर इर्गीझ व तुर्गे नद्या चेल्कार-तेंगिझ या खाऱ्या सरोवरास मिळतात. अरल समुद्राचा उत्तर भाग या राज्यात असून राज्याच्या दक्षिण भागातून वाहणारी सिरदर्या नदी त्याला मिळते. हिवाळ्यात नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत नद्या गोठलेल्या असतात व उन्हाळ्यात पाण्याने भरलेल्या असल्या, तरी पात्र उथळ असल्याने त्या वाहतुकीस उपयोगी पडत नाहीत. मध्य कझाकस्तान भागामध्ये साधारण जास्त उंचीच्या पण जास्त झीज झालेल्या डोंगराच्या रांगा तसेच ग्रॅनाइट, पॉरफिरो व स्लेटच्या टेकड्या आढळून येतात. या प्रदेशात इशिम ही इर्तिशची उपनदी असून नुरा नदी तेंगिझ सरोवरास मिळते. दक्षिण भागातील बेटपाकदला पठारावरून सारीसू व चू या नद्या वाहतात. परंतु बाष्पीभवनामुळे त्या वाळवंटातच वाळून जातात. यांच्या दक्षिणेस मयुमकुम हा वाळवंटी प्रदेश आहे. पूर्व व आग्‍नेय कझाकस्तानमध्ये मध्य आशियातील पठारी प्रदेशातून पसरलेल्या निरनिराळ्या पर्वतरांगांचा समावेश होतो. सगळ्यात उत्तरेकडे अल्ताई रांग असून त्याच्या दक्षिणेस तारबक्ताई आणि त्याच्या दक्षिणेस झुंगारियन आला-तौ रांग व तिएनशान पर्वतरांग आहे. अल्ताई व तारबक्ताई यांच्या दरम्यान समुद्रसपाटीपासून ३६० मी. उंच असलेल्या झेसान सरोवरातून इर्तिश नदी उगम पावते. तारबक्ताई व झुंगारियन यांच्यामध्ये पश्चिमेकडे बालकाश सरोवर पसरले आहे. मंगोलिया व चीनकडून आतमध्ये येण्यास झुंगारियन पर्वतरांगांमध्ये असलेल्या खिंडीचा उपयोग होत आला आहे. आला-तौ व तिएनशान यांदरम्यान इली नदीचा उगम असून ती बालकाशला मिळते. पूर्वभागातील नद्यांवर विद्युत् निर्मिती होते. उत्तरेकडील भागात काळी माती आढळते. या प्रदेशाचे हवामान खंडांतर्गत प्रदेशाप्रमाणे असून कोरडे आहे. अगदी दक्षिणेकडील भाग सोडला, तर उरलेल्या प्रदेशात जानेवारीतील सरासरी तपमान गोठणबिंदूच्या खाली उतरते. ही सरासरी -१६से. असून तपमान -४४ से. पर्यंत काही ठिकाणी उतरते. जुलैतील सरासरी तपमान २३से. एवढे आढळते. काही वाळवंटी भागात तपमान ७०से. पर्यंत जाते. सरासरी पर्जन्यमान ३० सेंमी. पर्यंत तर दक्षिणेकडे ते जवळजवळ शून्यापर्यंत असते. मुख्यत: एप्रिल ते ऑक्टोबर या काळात पाऊस पडतो. पर्वतमय प्रदेशात स्प्रूस, फर, पाईन यांसारखी सूचिपर्णी वृक्षांची जंगले असून कमी उंचीच्या प्रदेशात बर्च, पॉपलर, ॲस्पेन इ. वृक्ष आढळतात. यांशिवाय येथे चेरी, बदाम, अकेशियाच्या जाती, गवत आणि खुरटी झुडपे आहेत. अस्वल, लिंक्स, खोकड, हरिण, जर्बोआ, मारमॉट हे येथील प्राणी असून सुतार, घुबड, गरुड, करकोचा, बदक, हेरॉन इ. पक्षी आढळतात. अरल समुद्रात व बालकाश सरोवरात विपुल मासे आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : कझाकस्तान आणि चीनच्या सिक्यांग-अईगुर स्वायत्त राज्यात पसरलेले कझाक लोक म्हणजे तुर्की-मंगोल जमातींचे मिश्रण होय. यांची शारीरिक ठेवण मंगोल लोकांप्रमाणे असली, तरी त्यांची भाषा तुर्कीवरून आलेली आहे. पहिल्या महायुध्दापूर्वी हे लोक गुरे पाळीत आणि भटके जीवन जगत होते तंबू व राहुट्या ठोकून ते राहत आणि घोडे व गुरे यांची जोपासना करीत दूधदुभत्याचे पदार्थ, घोड्याचे व इतर मांस हे अन्नपदार्थ आणि कातड्याचे कपडे व हाडांची भांडी हे त्यांचे जीवन होते. तेराव्या शतकात हे लोक चंगीझखान व त्याचा मुलगा ज्यूझी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले व नंतर चंगीझखानाचा नातू ‘गोल्डन होर्ड’ प्रसिध्द बाटूखान याने पूर्व यूरोपात स्थापन केलेल्या किपचाक राज्यात हे लोक गेले. पूर्व यूरोप आणि पश्चिम आशिया या प्रदेशांवर सु. तीन शतके अनिर्बंध राज्य केल्यानंतर हे राज्य मोडकळीस आले. सोळाव्या शतकाच्या सुमारास अनेक टोळ्या (खानेट) तयार झाल्या. परंतु कझाक लोक मात्र तुर्कस्तानमधील गवताळ प्रदेशात राहू लागले. या वेळेस त्यांच्या तीन टोळ्या झाल्या व त्यांना लहान, मध्यम व मोठी टोळी (होर्ड) असे संबोधण्यात येई. १५११ ते १५२३ पर्यंत कासम खान याने या तीन टोळ्याचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्‍न केला. सतराव्या शतकात मंगोल लोकांनी झुंगारियन भागातून चीनमधून शेवटचे आक्रमण केले. हे आक्रमक काल्मुल्क टोळीवाले होते. हे लोक जसे पश्चिमेकडे पुढे सरकत गेले तसा लहान टोळीचा राजा १७३१ मध्ये रशियास सामिल झाला. १७७१ पर्यंत आक्रमकांपैकी पुष्कळसे लोक चीनमध्ये परत गेले. त्यानंतर लहान टोळीच्या लोकांनी १७८३ — १७९७ व १८३६ — १८३८ या काळात इसाते त्यामानॉव्ह व मुखांबेत उटेमिसॉव्ह यांच्या नेतृत्वाखाली रशियाविरुध्द बंड केले. मध्यम टोळ्यांनी १८२४ ते १८३० व मोठ्या टोळ्यांनी १८३६ ते १८४७ मध्ये  अनुक्रमे हाबिदुल्ला वालीख्नॉव्ह व कासम खानचा मुलगा किनसारी यांच्या नेतृत्वाखाली रशियाविरुध्द बंड केले. १८५३ मध्ये रशियाने सिरदर्या नदीच्या काठावरील आक्‌मिचेत शहर घेऊन १८५४ मध्ये तेथे किल्ला बांधला. या प्रदेशाचे एकंदर उराल्स्क, तुर्गाई, आक्मॉलिन्स्क व सेमिपलॅटिन्स्क असे चार भाग पाडण्यात आले. १६ ऑगस्ट १९२० पासून कझाक राज्य हे रशियन संघराज्यातील सोव्हिएट सोशालिस्ट प्रजासत्ताक राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. १९३६ मध्ये यास स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा मिळाला. शासनाच्या सोयीसाठी राज्य १५ ओब्‍लास्टमध्ये विभागण्यात आले असून १९७१ मधील निवडणुकीत सुप्रीम सोव्हिएटवर ४७२ प्रतिनिधी निवडून आले आहेत व त्यांपैकी १७० स्त्रिया आहेत. राज्यात ८० शहरे, १७२ शहरीवस्त्या व १९१ ग्रामीण विभाग आहेत. राज्य स्वतंत्र असले, तरी रशियाबरोबर कझाकस्तानचे राजदूत नाहीत.

आर्थिक स्थिती :  गुराढोरांची पैदास करणे, धान्योत्पादन, कपाशीची लागवड व कारखान्यांना उपयुक्त पिके काढणे हे येथील, मुख्य उद्योगधंदे आहेत. १९७१ मध्ये रशियाच्या एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक ३.१६ कोटी हे. जमीन कझाकस्तानमध्ये पिकांखाली असून सु. १५ लक्ष हे. ओलिताखाली आहे. गहू, तंबाखू, रबर व मोहरी ही येथील मुख्य पिके आहेत. यांखेरीज द्राक्षांचे व इतर फळांचे उत्पादनही मोठे आहे. तसेच बीट, बटाटे, भाजीपाला, दूधदुभते, मांस, अंडी, लोकर यांचे उत्पन्न महत्त्वाचे आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर वगैरे यांत्रिक अवजारे आणि जंतुनाशके इ. फवारण्यासाठी विमाने अशा आधुनिक साधनांचा भरपूर वापर केला जातो. कझाकस्तान तेथील उत्तम पशुसंपत्तीकरिता व त्यातदेखील मेंढ्याच्या पैदाशीकरिता प्रसिध्द आहे. येथील मेंढ्यापासून अतिशय उंची प्रकारची लोकर मिळते. येथील प्रसिध्द आखारोमेरिनो ही मिश्रजात मेरिनो जातीची मेंढी व आखार जातीचा पहाडी मेंढा यांपासून पैदा करण्यात आली आहे. १९७२ च्या सुरुवातीस राज्यात ७५ लक्ष गुरे, ३२६ लक्ष शेळ्यामेंढ्या व २७ लक्ष डुकरे होती. खनिजसंपत्तीच्या दृष्टीने कझाकस्तान अतिशय संपन्न आहे. कारागांदामध्ये टंगस्टन व कोळसा, एंबा नदीच्या काठाने मिळणारे तेल, यांखेरीज तांबे, जस्त, शिसे, निकेल, मँगॅनीज, बॉक्साइट, क्रोमियम व मॉलिब्डेनम ही खनिजे राज्यात आढळतात. तांबे, शिसे व जस्त यांचा रशियातील निम्मा साठा या राज्यात आहे. त्यामुळे मोठमोठे औद्योगिक कारखाने व रसायने बनविण्याचे कारखाने येथे आढळून येतात. कारखानदारीत कझाकस्तानचा रशियात तिसरा क्रमांक आहे. बालकाश, इर्तिश व कारास्कपै येथे तांब्याचे शुध्दिकरण, एंबा व अक्त्यूबिन्स्क येथे विमानांसाठी लागणारे तेल, सेमिपलॅटिन्स्क येथे मांस-संवेष्टन प्रकल्प व गुर्येव्ह येथे मत्स्यसंवर्धन केंद्र आहे. १९७१ मध्ये  राज्यात ३७ अब्ज ८० कोटी किवॉ. तास विजेचे उत्पादन झाले. १९७१ मध्ये राज्यात ४८·३ लाख कामगार होते त्यांपैकी ३·१५ लाख विशेषज्ञ होते.

कझाकस्तानमध्ये १९७१ साली एकूण लोहमार्गांची लांबी १३,८०० किमी. होती. तसेच १,०९,१०० किमी. लांबीच्या सडका होत्या. देशांतर्गत जलवाहतुकीच्या मार्गांची लांबी ६,१०० किमी. होती.

लोक व समाजजीवन : कझाकस्तान हे फक्त आता कझाक लोकांचेच राहिलेले नसून त्यामध्ये सु. शंभरावर मूळचे निरनिराळे राष्ट्रीयत्व असणारे लोक राहतात. १९७२ मध्ये राज्यात ३२·६% कझाक, ४२% रशियन, ७·२% युक्रेनियन असून त्यांशिवाय तातार, कोरियन, ऊईगुर, पोल, आझरबैजानी आदी लोक होते. कझाकांची भटकेवृत्ती जाऊन आता ते उत्तम शेती करू लागले आहेत. राज्यातील ५२% लोक शहरात राहतात. १९७१ – ७२ मध्ये कझाकस्तानमध्ये ५,९४५ पूर्वप्राथमिक संस्थांत ५,८८,००० मुले, १०,१०१ प्राथमिक व माध्यमिक शाळांतून ३२,९६,००० विद्यार्थी, १९८ तंत्रसंस्थांतून २,२३,४०० विद्यार्थी, ४४ उच्च शिक्षणसंस्थांतून २,००,५०० विद्यार्थी व २०७ संशोधन संस्थांतून २७,८०० लोक शिकत होते. १९४५ साली राज्यात शास्त्रअकादमी स्थापन झाली असून या राज्यातील प्रदेशातच रशियाच्या अंतराळ मोहिमेचे क्षेत्र आहे. १९७१ मध्ये राज्यात ३०,९०० डॉक्टर व १,६०,९०० खाटा होत्या. राज्यातील पहिले वर्तमानपत्र १९१० मध्ये सुरू झाले. १९७० मध्ये राज्यात ३५५ वर्तमानपत्रे होती त्यांपैकी १३० कझाक भाषेत होती. वर्तमानपत्रांचा एकूण खप ४१·६६ लक्ष होता.

कृषी, पशुपालन, खनिजसंपत्ती आणि कझाक लोकांचे जीवन यांसाठी प्रसिध्द असलेले कझाकस्तान हे महत्त्वाचे रशियन राज्य, चीनला लागून असल्याने लष्करी दृष्ट्याही त्याला अधिकच महत्त्व आले आहे.

वर्तक, स. ह.