पैकारा : तमिळनाडू राज्यातील महत्त्वाचे जलविद्युत्‌निर्मिती केंद्र. ते निलगिरी जिल्ह्यातील ऊटकमंडच्या वायव्येस सु. २० किमी. अंतरावर असून कर्नाटक व तमिळनाडू यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या मोयार नदीच्या उगम प्रवाहापैकी पैकारा प्रवाहावर आहे. या जलविद्युत्‌निर्मिती केंद्राचे काम १९३२ मध्ये पूर्ण करण्यात आले असून याची उत्पादनक्षमता ७० मेवॉ. इतकी आहे. मोयार नदीच्या पाणलोट क्षेत्रात सु. २०० सेंमी.वर पाऊस पडतो. त्यामुळे वीज उत्पादन करण्यास पुरेसे पाणी उपलब्ध होते. कोईमतूर येथील वस्त्रोद्योग, सिमेंट कारखाने, रेशीम उद्योग, मदुरा येथील वस्त्रोद्योग व निलगिरीच्या परिसरातील चहावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांसाठी लागणारी वीज येथूनच पुरविली जाते. अलीकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा पुरवठाही येथून केला जातो.

फडके, वि. शं.