बुर्सा : तुर्कस्तानमधील एक इतिहास प्रसिद्ध शहर व याच नावाच्या प्रांताची राजधानी लोकसंख्या ४,३१,८४४ (१९८० अंदाज). हे इस्तंबूलच्या दक्षिणेस सु.९० किमी. व मार्मारा समुद्रावरील मूदान्या बंदराच्या आग्नेयीस २८ किमी. अंतरावर, ऊलू दा शिखराच्या पायथ्याशी वसलेले आहे.

बिथिनीअन राजा पहिला प्रूशिअस याने ख्रि. पू. तिसऱ्या शतकाच्या शेवटी हे वसविले. त्यावेळी ‘प्रूस’ म्हणून ते ओळखले जाई. इ. स. १०७५ मध्ये हे सेल्जुक तुर्कांनी काबीज केले. तेराव्या शतकाच्या प्रारंभी हे शहर बायझंटी साम्राज्यात होते, त्यावेळी त्याचा बराच विकास झाला. १३२६ मध्ये ओरखानाने हे जिंकल्यानंतर ती ऑटोमन साम्राज्याची राजधानी होती. मुरादच्या कारकीर्दीत (१३६२-१३८९) एदिर्ने येथे राजधानी हलविण्यात आली. तुर्कांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात (१९१९-२२) या शहराचे अतोनात नुकसान झाले.

बुर्सा ही आसमंतातील शेतमालाची एक मोठी बाजारपेठ असून व तज्जन्य उत्पादनाचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणूनही विख्यात आहे. कापउ उद्योग, फळे डबाबंदीकरण, दुग्ध व्यवसाय, यंत्रसामग्री, इ. उद्योगही येथे विकसित झालेले आहेत.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या या शहरात प्राचीन वास्तुकलेचे अनेक नमुने आढळतात. ऊलू कामी व येशिल कामी (१४२१) व येशिल तुर्भे यांसारख्या प्रसिद्ध मशिदी येथे आहेत. उद्याने, ऑटोमन साम्राज्याचे वैशिष्ट्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील आच्छादित बाजारपेठा, गरम पाण्याचे झरे इ. मुळे पर्यटकांचे हे एक आवडते स्थळ ठरले आहे.

ओक, द. ह. गाढे, ना. स.