चिनाब : चेनाब, चीनाब. पंजाबच्या पाच नद्यांपैकी एक. लांबी सु. ९६० किमी. ३०० मी. उंचीवरील प्रदेशातील जलवाहनक्षेत्र सु. २७,५२९ चौ. किमी. पंजाब हिमालयाच्या लाहुल भागात ४,८९१ मी. वरील बारालाचा खिंडीच्या आग्नेयीस व वायव्येस उगम पावणाऱ्या अनुक्रमे चंद्रा व भागा या प्रवाहांच्या २,२८६ मी. उंचीवरील तंडी येथील संगमापासून चंद्रभागा किंवा चिनाब वाहू लागते. पीरपंजाल आणि हिमाद्री यांमधील सांरचनिक द्रोणीमधून १६० किमी. वायव्येस वाहत गेल्यावर काश्मीरमधील किश्तवारजवळ ती दक्षिणेकडे वळते. एका निदरीतून पीरपंजाल छेदून पश्चिमेकडे व पुन्हा दक्षिणेकडे वळून रियासीवरून अखनूर येथे ती सपाटीवर येते. खैरी रिहाल येथे ती पाकिस्तानच्या सियालकोट जिल्ह्यात शिरते. काश्मीरसीमेपासून १४ किमी. वरील मराला येथे अपर चिनाब कालवा व पुढे ५६ किमी. वर खांकी येथे १८९२ मध्ये काढलेला लोअर चिनाब कालवा सुरू होतो. नंतर वायव्येचा छाज दोआब व आग्नेयीचा रेचना दोआब यांमधून ती वाहते. त्रिम्मू येथे तिला झेलम व सिंधूजवळ रावी मिळते. बिआसचे पाणी घेऊन आलेल्या सतलजला ती अलीपूरच्या पूर्वेस मडवाला येथे मिळते व मग त्यांचा संयुक्त प्रवाह पंचनद नावाने मिथनकोट येथे सिंधूला मिळतो. १२४५ पर्यंत चिनाब मुलतानच्या पूर्वेकडून वाहत होती १३९७ नंतर ती त्याच्या पश्चिमेकडून वाहू लागली. चिनाबला उनियार, शुदी, भुतना, मारूवरद्वान, गोलनलार, लिडारकोल, बिचलारी व आन्स या उपनद्या मिळतात. गुजराणवाला, लाहोर, झांग व मंगमरी जिल्ह्यांतील ८,०५५ चौ. किमी. क्षेत्राला १९०३-४ मध्ये लोअर चिनाब कालव्याचा लाभ मिळून पडीक जमिनी लागवडीस आल्या. चिनाबच्या डाव्या तीरावर मुलतानच्या व शुजाबादच्या पठाण राजांनी पूर-कालवे काढलेले होते. ब्रिटीश अंमलात त्यांची बरीच सुधारणा झाली. रेचना दोआबात १० लाख हे. जमिनीला चिनाबच्या पाण्याचा लाभ होतो. सपाट भागात चिनाब नौकासुलभ आहे.

ऋगवेदातील असिक्नी म्हणजेच चिनाब तिच्या काठी अनेक रोगहारक वनस्पती आहेत असा उल्लेख आहे.

कुमठेकर, ज. ब.