सोलापूर शहर : महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचे आणि उत्तर सोलापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९,५१,११८ (२०११). जिल्ह्याच्या पूर्व भागातील सीना नदीखोऱ्यात सस.पासून सु. ५४८ मी. उंचीवर हे शहर वसले आहे. ते पुण्यापासून आग्नेयीस सु. २४५ किमी. तर साताऱ्याच्या पूर्वेस सु. २२० किमी. अंतरावर आहे. हे शहर अवर्षणप्रवण क्षेत्रात येत असल्यामुळे येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान बरेच कमी म्हणजे केवळ ५४·५ सेंमी. आहे.

सोलापूर या नावाविषयी विविध मतप्रवाह आहेत. सोळा गावांचे मिळून निर्माण झालेले म्हणून ‘सोलापूर’ अशी एक व्युत्पत्ती मानली जाते. इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मतानुसार सोलापूर हे बरेच जुने गाव आहे. प्राचीन कोरीव लेखांमध्ये त्याचा निर्देश ‘सोन्नलगे’ किंवा ‘सोन्नलागी’ असा आढळतो. यादव काळापर्यंत हे नाव प्रचलित होते. पुढे सोन्नलगेचे रूपांतर सोन्नलपूर असे होऊन सोळाव्या शतकापर्यंत ते वापरात राहिले. सोलापूर किल्ल्यातील एका कोरीव लेखात ‘सोन्नलापूर ‘असा उल्लेख आढळतो. पुढे ‘सोलापूर’ असे लिहिले जाऊ लागले. शिवकालात हे नाव प्रायः रूढ झाले. मोगल काळात मात्र सोलापूरऐवजी सन्दलापूर (चंदनापूर) हे नाव उपयोजिले जाई.

सोलापूर शहराला प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इ. स. पू. २०० पासून सातवाहन, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे आणि शेवटी ब्रिटिश या विविध सत्तांनी सोलापूरवर राज्य केले. बहमनी सत्ता काळात चौदाव्या शतकात येथे सोलापूर किल्ला बांधण्यात आला. तेव्हापासून या शहराचे ऐतिहासिक महत्त्व वाढले. सोलापूर किल्ला हा भुईकोट किल्ल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. २९२·६ मी. x १६०·९ मी. क्षेत्रात उभारलेल्या व साधारणतः चौकोनाकृती असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम अतिशय मजबूत आहे. किल्ल्याभोवती दुहेरी तटबंदी व त्याभोवती सदोदित पाण्याने भरलेला खंदक होता. शेजारच्या तलावातील पाणी या खंदकात घेतले जाई. किल्ल्याच्या बाहेरील तटास चार बाजूंना चार मोठे बुरूज आणि त्यांमध्ये तेवीस बुरूज आहेत. दिंडी दरवाजाच्या आतील बाजूस मोठे बुरूजांचे संकुल आढळते. किल्ल्यातील तिसरा दरवाजा ओलांडून आत गेल्यानंतर २२८·६ मी. लांब व १२८·९ मी. रुंदीचे आवार दिसते. ग. ह. खरे यांच्या मते या भागात इतिहासकाळामध्ये विविध हेतूंनी बांधल्या गेलेल्या लहान-मोठ्या सु. ३०० इमारती होत्या. आजही या भागात मंदिर, मशिदी, बुरूज इत्यादींचे अवशेष आढळतात. किल्ल्यामध्ये ठिकठिकाणी विविध शिल्पे आढळतात.

सोलापूरचा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. पुणे-हैदराबाद यांदरम्यान असलेल्या स्थानामुळेही याला महत्त्व आहे. आदिलशाही व निजामशाही यांच्यात या किल्ल्याच्या मालकीवरून सतत लढाया होत राहिल्या. इ. स. १५२३ मध्ये या दोन सत्ताधिशांमध्ये मैत्रीचा तह झाला. अनेक सत्ताधिशांचे मुक्काम या किल्ल्यात असत. दक्षिणेकडील स्वारीवर आलेल्या औरंगजेबाचा नेहमीचा मुक्काम या किल्ल्यात असे. कर्नाटकात जाताना आणि विजापूरवरील आक्रमणाच्या वेळी अनुक्रमे शहाजीराजे आणि छ. शिवाजी महाराजांनी आपला मुक्काम येथे केलेला असावा. दुसरे बाजीराव पेशवे, साताऱ्याचे छ. प्रतापसिंह भोसले येथे राहिलेले आहेत. इ. स. १७९५ मध्ये निजामाच्या पराभवा-नंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. तेव्हापासून पेशवाई बुडेपर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांची सत्ता राहिली. इ. स. १८१८ पासून १९४७ पर्यंत तो ब्रिटिशांच्या ताब्यात होता. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात हा किल्ला देण्यात आला.

गिरणगाव म्हणून सुपरिचित असलेल्या सोलापूर शहराला वस्त्रोद्योगाची वैभवशाली परंपरा आहे. इ. स. १८५९ मध्ये येथपर्यंत लोहमार्ग आला, तेव्हापासून या उद्योगाला अधिकच चालना मिळाली. येथील पहिली कापड गिरणी ‘सोलापूर स्पिनिंग ॲन्ड वीव्हिंग कंपनी ‘ने इ. स. १८७७ मध्ये स्थापन केली. हातमाग, यंत्रमाग, सूतगिरण्या, कापडगिरण्या आणि वस्त्रोद्योगाशी निगडित विविध प्रक्रियाउद्योग येथे चालतात. येथील कोष्टी व पद्मशाली हे विणकर समाज हातमाग व्यवसायात आणि कलात्मक हस्तकौशल्यात पारंगत आहेत. येथील प्रामुख्याने उत्तम प्रतिच्या जेकॉर्ड चादरी तसेच पलंगपोस, सतरंज्या, टॉवेल, नॅपकिन व सुती साड्या ही उत्पादने जगभर प्रसिद्ध आहेत. वस्त्रोद्योगातील उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर परदेशी निर्यात केली जाते. उत्पादनातील विविधता, आकर्षक रंगसंगती, टिकाऊपणा आणि उपयुक्तता ही या उत्पादनांची वैशिष्ट्ये आहेत. येथील विडी उद्योग प्रसिद्ध असून विडी कामगारांसाठीची स्वतंत्र वसाहत आहे. लगतच्या औद्योगिक वसाहतीत विविध लघु तसेच अभियांत्रिकी उद्योग आहेत. सोलापूरची शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याच्या पोळ्या व ज्वारीची कडक भाकरी सर्वदूर प्रसिद्ध आहे. कापूस व इतर कृषिमालाच्या बाजारपेठेचे हे प्रमुख केंद्र आहे. शहरात पुलगम टेक्स्टाईलसारखी वस्त्रोत्पादनाची मोठी विक्री केंद्रे असून, सोलापूरात आलेले पर्यटक आवर्जून अशा विक्री केंद्रात मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना आढळतात. पुणे-सोलापूर-हैदराबाद-विजयवाडा क्र. ९ आणि सोलापूर-विजापूर-चित्रदुर्ग क्र. १३ हे दोन राष्ट्रीय महामार्ग शहरातून जातात. मुंबई–चेन्नई व सोलापूर–विजापूर हे लोहमार्गही शहरातून जातात.

 

सोलापूरला राजकीय सांस्कृतिक परंपरा असून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लक्ष्मीनारायण बोल्ली, द्वारकानाथ कोटणीस, यू. म. पठाण ह्या येथील उल्लेखनीय व्यक्ती आहेत. देशभक्त रामकृष्णजी जाजू यांची सोलापूर ही कर्मभूमी होती. ब्रिटिशांच्या विरोधात चळवळ उभारण्याचे कारण देऊन येथील यल्लप्पा रेवणसिद्धप्पा धनशेट्टी, श्रीकिसन लक्ष्मीनारायण सारडा, जगन्नाथ भगवान शिंदे व अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या चौघांना ब्रिटिशांकडून १२ जानेवारी १९३१ रोजी फाशी दिली गेली.

सोलापूर विद्यापीठ (स्था. २००४), दयानंद महाविद्यालय (स्था. १९४०) व संगमेश्वर महाविद्यालय (स्था. १९५३) या येथील प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व सोलापूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने २००७ मध्ये येथे सोलापूर महोत्सव आयोजित केला होता. सोलापूर शहर हे बहुभाषिक असून येथे मराठी, हिंदी, कानडी, तेलुगू या भाषा बोलल्या जातात. १ मे १९६४ रोजी सोलापूरमध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली.

पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूरला विशेष महत्त्व आहे. वैभवशाली परंपरा असलेला येथील भुईकोट किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. येथील सिद्धेश्वर मंदिर विशेष प्रसिद्ध असून, प्रतिवर्षी मार्गशीर्ष-पौष या महिन्यांदरम्यान येथे मोठी जत्रा भरते. त्याशिवाय येथील मल्लिकार्जुन मंदिर, जुने राम मंदिर, विठ्ठल मंदिर, रूपाभवानी, काळजापूर, आदिनाथ मंदिर, मारुती मंदिर, जैन मंदिर, सिद्धरामेश्वराची समाधी, शुभराय मठ, प्रॉटेस्टंट चर्च, द्वारकानाथ कोटणीस यांचे स्मारक इ. उल्लेखनीय आहेत. सिद्धेश्वर तलाव, धर्मवीर संभाजी जलाशय (कंबर तलाव) व त्याचा निसर्गरम्य परिसर, स्मृती वन, हुतात्मा बाग, रेवणसिद्धेश्वर प्राणिसंग्रहालय, हिप्परण्याचा एकरूख तलाव ही येथील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. सोलापूर–विजापूर महामार्गावर, सोलापूरपासून ५ किमी. अंतरावर वनविभागाच्या वतीने १२५ हे. परिसरात विकसित केलेला सिद्धेश्वर वनविहार प्रकल्पसुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सोलापूर शहरा-पासून जवळपास तुळजापूर (उस्मानाबाद जिल्हा), अक्कलकोट, विजापूर (कर्नाटक राज्य), नान्नज अभयारण्य इ. धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे असून ती पाहण्यासाठी बरेच पर्यटक सोलापुरात राहतात. त्यामुळे सोलापुरात तारांकित हॉटेलांपासून धर्मशाळेपर्यंत राहण्याच्या चांगल्या सुविधा आहेत.

चौधरी, वसंत