पनामा: उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या खंडांना जोडणाऱ्या संयोगभूमीवर पूर्व-पश्चिम पसरलेला एक छोटासा प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ ७७,०९० चौ. किमी. पैकी १,४४० चौ. किमी. अ.सं.सं. च्या मालकीचे. लोकसंख्या १७,७१,३०० (१९७७). विस्तार ७° १५’ उ. ते ९° ३९’ उ. आणि ७७° १५’ प. ते ८३° ३०’ प. यांदरम्यान. याच्या पश्चिमेस कोस्टा रीका व पूर्वेस कोलंबिया हे देश असून, उत्तरेस कॅरिबियन समुद्राची ७६७ किमी. लांबीची किनारपट्टी व दक्षिणेस पॅसिफिक महासागराची १,२३४ किमी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. याचा पूर्व-पश्चिम विस्तार सु. ७२० किमी. असून रुंदी ५० ते १८० किमी. आहे. या देशातून जगप्रसिद्ध पनामा कालवा जातो. पनामा सिटी हे राजधानीचे शहर आहे. दोन खंडांच्या मोक्याच्या जागी देश असल्याने याला जागतिक व लष्करी दृष्ट्या फार महत्त्व आहे. 

भूवर्णन: देशाची भूपृष्ठरचना डोंगराळ व पर्वतीय असून दोन्ही किनाऱ्यांनजीक सखल प्रदेश आहे. मध्यातून पूर्व – पश्चिम जाणाऱ्या पर्वतरांगा आहेत. यातच पश्चिमेस चीरीकी (३,४७८ मी.) हे सर्वोच्च ज्वालामुखी शिखर आहे. देशाचा ८७% भाग७०० मी. पेक्षा कमी उंचीचा, १०% भाग ७०० मी. ते १,५०० मी. मध्यम उंचीचा व फक्त ३% अत्युच्च आहे. देशात ५०० पर्यंत नद्या असून बहुतेक कमी लांबीच्या आणि पॅसिफिकला मिळणाऱ्या आहेत. डॅरिएन प्रांतांतील पॅसिफिकला मिळणारी ट्वीरा ही नदी व्यापारी दृष्टीने उपयुक्त आहे. तसेच अटलांटिकच्या किनाऱ्यालगत वाहणारी चॅग्रेस ही नदी देशाच्या विकासाचा आधार होऊ शकेल. देशालगतच्या बेटांची संख्या १,६०० असून त्यांत कॅरिबियनमधील सान ब्लास द्वीपसमूह, पॅसिफिकमधील क्वीबा, पर्ल ही महत्त्वाची आहेत.

देशाचे हवामान उष्ण कटिबंधीय सागरी आहे. किनाऱ्यालगत सरासरी तपमान २७° से. व डोंगराळ भागात ते १०° ते १९° से. पर्यंत असते. आर्द्रता बऱ्याच काळपर्यंत ८०% पर्यंत असते. पर्जन्याचे प्रमाण कॅरिबियनच्या बाजूस ३०० सेंमी. पर्यंत, तर पॅसिफिकच्या बाजूला ते १६० सेंमी. पर्यंत आहे. सर्वसाधारणपणे पाऊस एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत पडतो. इतर काळ कोरडा असतो. 

खनिजसंपत्ती विविध व भरपूर असली, तरी फक्त सोने, चांदी व मँगॅनीज एवढीच खनिजे काढली जातात. चुनखडी भरपूर प्रमाणात उपलब्ध झाल्याने सिमेंटच्या उत्पादनात वाढ झाली आहे. 

बहुतांशी पनामात दाट अरण्ये व अधूनमधून गवताळ प्रदेश आढळतात. कॅरिबियनच्या बाजूस सदाहरित वृक्षांचे आधिक्य आहे तर पॅसिफिकच्या  बाजूस पानझडी वृक्ष आढळतात. अरण्यांतून पक्षी, माकडे, हरिणे, चित्ते यांची संख्या बरीच आहे. पॅसिफिकची बाजू मासेमारीस अधिक अनुकूल आहे. 

इतिहास व राज्यव्यवस्था: सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे स्पॅनिश लोकांच्या आगमनापूर्वी येथे इंडियन टोळ्यांची सत्ता विखुरलेली होती. कोलंबसचा साथीदार बास्तीदास १५०१ मध्ये येथे आला व १५०९ मध्ये स्पेनने कोलंबिया व पनामा भागांवर आपला गव्हर्नर नेमून हे आपल्या साम्राज्यात सामील केले. त्यानंतर १५१३ मध्ये बॅल्बोआने ही संयोगभूमी पार करून पॅसिफिकचा प्रथम शोध लावला. १५१९ मध्ये पनामा सिटी हे शहर राजधानी म्हणून वसविले. दक्षिण अमेरिकेतील संपत्ती स्पेनकडे नेण्यास पुढील तीन शतके या शहराचा फार उपयोग झाला. सोळाव्या शतकात ड्रेक व सतराव्यात मॉर्गन या ब्रिटिश चाच्यांनी हे शहर लुटले. पनामा विभाग बृहत्‌कोलंबियात १८२१ मध्ये समाविष्ट झाला. १८८६ पर्यंत कोलंबियाचा एक भाग म्हणून पनामाने अंतर्गत स्वायत्तता उपभोगली, परंतु त्यानंतर पनामा कालवा खणण्यास अ.सं.सं. कडून फूस मिळाल्याने १९०३ मध्ये पनामा कोलंबियातून फुटून निघून स्वतंत्र झाला. त्यानंतर पनामाने अ.सं.स्ं. ना कालवा खणण्यासाठी व त्याच्या दोन्ही अंगांस ८ किमी. ची भूमी कालवा विभाग म्हणून कायम भाडेपट्ट्याने वापरण्यास परवानगी दिली. १९१४ मध्ये कालव्यातून वाहतूक सुरू झाली. १९२४ मध्ये कोलंबियाने पनामाच्या स्वतंत्र अस्तित्वास मान्यता दिली. अ.सं.सं.नी पनामाच्या अंतर्गत कारभारात वारंवार ढवळाढवळ केली. कालव्यावरील स्वामित्वाच्या वादामुळे पनामा देश करार मोडण्यास उद्युक्त झाला. अ.सं.स. नी कालवा विभागावरील सत्ता सोडावी याबद्दल उभय देशांत १९७४ मध्ये एकवाक्यता झाली व १८ एप्रिल १९७८ च्या करारान्वये ३१ डिसेंबर १९९९ नंतर ही सत्ता पनामाला देण्याचे ठरले. 

नवीन घटना १७७२ पासून अंमलात येऊन ५०५ सदस्यांची एक राष्ट्रीय सभा निवडणुकीने अस्तित्वात आली आहे. ही सभा राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीची निवड करते. राष्ट्रपतींच्या हाती संपूर्ण कार्यकारी सत्ता असते तथापि ऑक्टोबर १९७२ पासून पुढील सहा वर्षांकरिता ही सत्ता सेनादलप्रमुखाच्या हाती सुपूर्त करण्यात आलेली आहे. १९६९ पासून येथे राजकीय पक्षांवर बंदी आहे. राजकीय ध्येयवादापेक्षा येथे व्यक्तिपूजेला अधिक वाव आहे. 

देशांतर्गत सुव्यवस्थेसाठी ११,००० जवानांचे एक राष्ट्रीय संरक्षणदल आहे व त्याच्याच प्रमुखाच्या हाती सध्या राष्ट्रपतीची सत्ता आहे. बाह्य आक्रमणापासूनच्या संरक्षणाची जबाबदारी अ. सं. सं. वर आहे. पनामाची विभागणी नऊ प्रांत व इंडियनांसाठी राखीव तीन विभाग यांमध्ये झालेली आहे. प्रत्येक प्रांतावर राष्ट्रपतीच्या हुकमाने गव्हर्नरची नेमणूक केली जाते. नऊ प्रांतांची विभागणी ६३ नगरपालिकाक्षेत्रांतून केलेली असून, त्यांचा कारभार लोकनियुक्त मंडळ व नगराध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे. राष्ट्राध्यक्षाच्या नियुक्तीनुसार दहा वर्षांसाठी नऊ न्यायाधीशांच्या एका सर्वोच्च न्यायालयाला न्यायनिवाड्याचे संपूर्ण अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालयाला न्यायनिवाड्याचे संपूर्ण अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायाधीशांच्या नेमणुका केल्या जातात. देशाने देहांताची शिक्षा रद्द केलेली आहे. पनामा संयुक्त राष्ट्रांचा व अमेरिकन राष्ट्रसंघटनेचा (ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स) सदस्य आहे. 

आर्थिक स्थिती: पनामाच्या आर्थिक स्थितीचा बव्हंशी भार कालव्याच्या भाड्यावर व त्या देशात नोंदलेल्या व्यापारी जहाजांच्या उत्पन्नावर निर्भर आहे. शेती उत्पादने व कोळंबी (मासळी) यांपासून सु. ५०% उत्पन्न मिळते. तांदूळ, मका, द्विदल धान्ये यांचे उत्पन्न देशाच्या गरजा भागविण्यापुरते असून केळी, कोको, कॉफी, नारळ, संत्री, टोमॅटो यांचे उत्पादन निर्यातीसाठी केले जाते. १९७४-७५ साली पुढीलप्रमाणे शेती उत्पादन झाले (आकडे हजार क्विंटलमध्ये) : घेवडे ८९·४ कॉफी ९९·३ मका १,३०८·७ तांदूळ ३,९३२·४ ऊस ३७,९७८. केळ्यांचे उत्पादन मळे पद्धतीने मोठ्या कंपन्या करतात. कोळंबीचा निर्यातीत तिसरा क्रमांक लागतो. अन्नपदार्थ, चिनीमातीची भांडी, तयार कपडे, सिगरेटी, हॅट, साबण, खाद्यतेले यांसारखे छोटे उद्योग येथे आढळतात. १९४८ मध्ये एक सिमेंटकारखाना व १९६२ मध्ये कोलोन येथे एक तेलशुद्धीकरण कारखाना सुरू झाला. 

ऊर्जानिर्मितीच्या बाबतीत पनामाची प्रगती चांगली आहे. १९६८ मध्ये ४८५ द. ल. किवॉ. ता. असलेले उत्पादन १९७४ मध्ये ९९२ द. ल. किवॉ. ता. पर्यंत वाढले. पनामा सिटी व कोलोन यांना ५,२५,२०० घ. मी. गॅसचाही पुरवठा झाला.

  

देशात मध्यवर्ती बँक नाही तथापि १९०४ साली स्थापन झालेली ‘बँको नॅशनल द पनामा’ ही व्यापारी बँक सर्व सरकारी व्यवहार सांभाळते. याशिवाय विविध देशांच्या ७५ बँका या देशात आर्थिक व्यवहार हाताळीत असतात. बॅल्बोआ ही सुवर्णमुद्रा कायदेशीर चलन असून देशाचे कागदी चलन नाही. डिसेंबर १९७६ मध्ये १ पौंड=१·६६ बॅल्बोआ व १ अमेरिकी डॉ. = १ बॅल्बोआ असा विनिमय दर होता.

  

पनामाचा विदेशीय व्यापार बहुतांशी अ.सं.सं.शी चालतो. त्यापाठोपाठ कोस्टा रीका, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला, कोलंबिया व एक्वादोर हे देश येतात. अन्य देश म्हणजे फ्रान्स, प. जर्मनी, जपान, कॅनडा यांचाही आयात-निर्यातीत वाटा आहे. निर्यातीत प्रामुख्याने केळी, पेट्रोलियम पदार्थ, मासळी या गोष्टी असून, आयातीत उत्पादित वस्तू, खनिज तेल, यंत्रे, वाहतुकीची साधने, अन्नपदार्थ, रसायने या गोष्टी येतात. 


अंतर्गत वाहतुकीच्या दृष्टीने देश मागासलेला आहे. एकूण ४२६ किमी. लांबीचे तीन लोहमार्ग आहेत. त्यांतील ७७ किमी. लांबीचा कोलोन व पनामा सिटी यांना जोडणारा अ.सं.सं.च्या मालकीच्या पनामा कालव्याला साहाय्यक असा महत्त्वाचा मार्ग आहे. दुसरे मार्ग हे पश्चिमेकडील बोकास डेल टोरो व चीरीकी या प्रांतांतील केळी उत्पादनाच्या क्षेत्रातील शहरांना आणि बंदरांना जोडतात. मोटारीचे मार्गही फारच थोडे आहेत. त्यांतील मेक्सिकोकडून येणारा अमेरिकन आंतरराष्ट्रीय हमरस्ता पनामा सिटीपर्यंत पूर्ण झाला असून. कोलंबियाकडील उरलेल्या भागाच्या कामास सुरुवात झाली आहे. याशिवाय पनामा सिटी व कोलोन यांना जोडणारा ८० किमी. लांबीचा हमरस्ता कालवा क्षेत्रातून तयार केला आहे. या सर्वांवर मात करणारी गोष्ट म्हणजे ८४ किमी. लांबीचा पनामा कालवा की, जो सर्वस्वी अ.सं.सं.च्या मालकीचा आहे. पनामा सिटीजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ असून सर्व जागतिक विमानकंपन्या त्याचा वापर करतात. व्यापारी जहाजांच्या बाबतीत पनामाचा क्रम जगातील देशांत फार वरचा आहे. बऱ्याच देशांतील जहाजे पनामाच्या निशाणाखाली आंतरराष्ट्रीय वाहतूक करतात. त्यांचा टनभार १७ द.ल. टनांपर्यंत आहे. खाजगी मालकीची व व्यापारी पद्धतीवर चालणारी १०८ नभोवाणी व दोन दूरचित्रवाणी केंद्रे या देशात आहेत. 

लोक व समाजजीवन: देशाची १९७० च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १४,२८,०८२ होती आणि १९७७ पर्यंत ती अंदाजे १७,७१,३०० इतकी झाली. दर हजारी जननप्रमाण ३०·६ असून मृत्युप्रमाण ४·९ आहे. देशातील ८३% लोकसंख्या पॅसिफिकच्या बाजूस वसली असून नागरी जनतेचे प्रमाण ४१ टक्क्यांहून अधिक आहे व शहराकडे ओघ वाढतच आहे. एकट्या पनामा सिटीची लोकसंख्या ४,२७,७०० (१९७७) आहे. इंडियन व गौरवर्णीय किंवा निग्रो व गौरवर्णीय यांच्या संमिश्र जमातींना येथे ‘मेस्तीसो’ म्हणतात. यांची संख्या ६५% आहे. याशिवाय १३% निग्रो, ११% गौरवर्णीय, १०% इंडियन, १% चिनी असे वर्गीकरण आहे.

  

स्पॅनिश भाषा बोलणारे ९२% लोक असून तीच राज्यभाषा आहे. बऱ्याच लोकांना इंग्रजी समजते व इंडियन जमाती स्थानिक भाषा बोलतात. येथे सर्वांना धर्मस्वातंत्र्य आहे. तथापी ९३% लोक रोमन कॅथलिक पंथाचे व ५% प्रॉटेस्टंट पंथीय आहेत. इंडियन जमाती आपापल्या चालीरीतींना चिकटून आहेत. साक्षरतेचे प्रमाण ७८% आहे. ७ ते १५ वर्षांपर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांसाठी फी आकारली जाते. १९३६ पासून पनामा सिटी येथे एक केंद्रीय विद्यापीठ आहे. याशिवाय सांता मारीआ ला आंटीग्वा येथे एक धार्मिक विद्यापीठ आहे. या देशाचा सर्वांत अधिक म्हणजे ३३% खर्च शिक्षणावर होतो. 

देशात मुद्रण स्वातंत्र्य असून पनामा सिटीमधून तीन स्पॅनिश व दोन इंग्रजी दैनिके प्रसिद्ध होतात. एकूण ६९ सिनेमागृहे असून त्यांतील ४६ पनामा जिल्ह्यात आहेत. पनामा सिटीत राष्ट्रीय ग्रंथालय, पुरालेखागार व संग्रहालय आहे. ग्रंथालयाच्या शाखा सर्व प्रांतांच्या प्रमुख ठिकाणी आहेत. बेसबॉल हो लोकप्रिय खेळ असून मुष्टियुद्ध, घोडदौड, पोहणे, मासे पकडणे व शिकार यांचाही शौक आहे. पनामाचे लोकसंगीत व नाट्यही प्रसिद्ध आहे. 

मालक व नोकर यांच्या सहकार्याने सरकारी नियंत्रणाखाली आरोग्यसेवा व निवृत्तिसाहाय्य योजनांचा नोकरांना लाभ मिळतो. १९७५ पासून सुधारित आरोग्यसेवा व निवृत्तिवेतन यांसाठी कर वाढविण्यात आले आहेत.

  

पर्यटन: पनामा देश हौशी प्रवाशांचे आकर्षण बनत आहे. १९७५ मध्ये २,८२,६९६ प्रवासी या देशात येऊन गेले. कोस्टा रीका, एल् साल्वादोर, प. जर्मनी, फ्रान्स, हाँडुरस, स्पेन, स्वित्झर्लंड या देशांतील प्रवाशांना ९० दिवस व ब्रिटनमधील प्रवाशांना ३० दिवस राहण्यास परवान्याची गरज लागत नाही. 

पनामा सिटी हे यूरोपियनांनी वसविलेले सर्वांत जुने ऐतिहासिक शहर असून देशातील सर्वांत मोठे शहर आणि पॅसिफिकवरील बंदर आहे. अटलांटिकच्या बाजूस कोलोन हे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. डेव्हिड हे पश्चिमेकडील शेती विभागातील महत्त्वाचे शहर आहे. (चित्रपत्रे २, १३).

आठल्ये, द. बा.


पनामा


पनामा सिटी : एक विहंगम दृश्य.

वसाहतकालीन सीमाशुल्क कार्यालय, पॉर्तोबेलो, पनामा.   सान होसे चर्चमधील सुवर्णवेदी, पनामा सिटी.   पनामा कालव्यातील पर्यटन-बोट   राष्ट्रीय संसदेचे अधिवेशन, पनामा सिटी.