वस्ती : पारिस्थितिकी शास्त्राप्रमाणे ‘वस्ती’ ही सजीवांच्या निवासस्थळाचा बोध करून देणारी संज्ञा आहे. ती असे दर्शविते की, त्या ठिकाणी त्या विशिष्ट सजीवाला आवश्यक असणारे पर्यावरणीय घटक उपलब्ध आहेत व तो सजीव तेथे कायम अथवा तात्पुरता निवासी आहे. त्यामुळे ‘पृथ्वी ही सजीवांची वस्ती आहे’ हा संबोध त्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरतो. विशिष्ट सजीवास विशिष्ट पर्यावरणीय घटकांची आवश्यकता असते. काही प्रमाणात उपलब्ध नैसर्गिक घटकांत सजीव आवश्यक ते फेरफार घडवून आणतो व ‘वस्ती’ निर्माण करतो. वस्तीमध्ये त्या सजीवाने नैसर्गिक घटकांत फेरफार करून उपकारक असे घटक निर्माण केलेले आढळतात. ‘वाघांची वस्ती’ असा शब्दप्रयोग केल्यास वाघांना जगण्यास आवश्यक घटक व वाघांचे तेथील वास्तव्य यांचा बोध होतो. सजीवाच्या स्वरूपाप्रमाणे ‘वस्ती’ ही संज्ञा व्यापक प्रदेश किंवा विशिष्ट छोटी जागा किंवा एखादा प्राणी दर्शविते. उदा., गोचिडीचा विचार करता बैल, गाय इ. प्राण्यांचे शरीर ही तिची ‘वस्ती’ असू शकते.

मनुष्यप्राण्याच्या संदर्भात ‘वस्ती’ हा शब्द मनुष्याच्या निवास प्रदेशाचा बोध करून देतो. ‘मनुष्यवस्ती’ ही संकल्पना अत्यंत व्यापक व अर्थगर्भ आहे. कारण येथे आपणास मनुष्य किंवा माणूस (मॅन किंवा मॅनकाइंड) व मानव (ह्यूमन बीइंग-ह्यूमनकाइंड)या शब्दांचे भिन्न अर्थ लक्षात घ्यावे लागतात. मनुष्य किंवा माणूस हे शब्द सामान्यतः ‘मनुष्य हा एक प्राणी (ॲनिमल) आहे’ या अर्थाने विचारात घेतले जातात. मनुष्यप्राणी हा जीव आहे (ऑर्गनिझम), त्यामुळे त्याच्या अस्तित्वासाठी सूर्यप्रकाश, हवा, पाणी, अन्नादी घटक आवश्यक असतात. वस्तीचा विचार करताना या घटकांची उपलब्धता विचारात घ्यावी लागते. तसेच मनुष्यप्राणी हा एकाकी नाही त्याचा इतर जीवांशी साखळी संबंध आहे. विशेषतः अन्नासाठी तो अन्य सजीवांवर, वनस्पतींवर आणि प्राण्यांवर अवलंबून असतो. त्याची अन्नासाठी इतर प्राण्यांशी होणारी स्पर्धा व सहकार्य, अन्न साखळीत उद्‌भवणारे खंड यांचा मनुष्यवस्तीशी संबंध असतो. 

मनुष्यप्राणी हा समूहशील प्राणी आहे. त्यामुळे तो समूहाच्या स्वरूपात वस्ती करणार हेसुद्धा ओघानेच येते. मनुष्यवस्तीचे प्राकृतिक घटक वैयक्तिक व सामूहिक पातळ्यांवर पाहणे व अंती जागतिक पातळीवर ‘पृथ्वी’ हे मानवाचे घर आहे या दृष्टीने वस्तीबाबतचे विचार मांडणे, हे मनुष्यवस्तीच्या दृष्टीने संयुक्तिक आहे.  

मनुष्यवस्तीचे प्राकृतिक घटक 

सूर्यप्रकाश : सजीव सृष्टीचा मूलाधार सूर्यप्रकाश आहे. तो जीवाला आवश्यक ऊर्जा पुरवितो. ४ से.पेक्षा कमी तापमानात वृक्षवाढ थांबते. धान्यास अंकूर येत नाहीत, झाडास पाने येत नाहीत. शरीरास आवश्यक ती ऊर्जा निर्माण करण्याची किमान पातळी सूर्यप्रकाश व तापमान पुरवितात. उष्ण कटिबंधात वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश व तापमान जास्त असते. ध्रुव प्रदेशांकडे त्यांचे प्रमाण घटत जाते. म्हणून उष्ण कटिबंधात सर्वांत प्रथम मनुष्यवस्त्या निर्माण झाल्या. सर्वांत जुन्या मनुष्यप्राण्यांचे व वस्त्यांचे अवशेष पूर्व आफ्रिकेतील टांझानिया, युगांडा व इथिओपिया या देशांत आढळले असून त्यांचा काळ १ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत जातो. अर्थात पाणी व अन्न हे घटक त्याबरोबरीने महत्त्वाचे आहेत. या मनुष्यविकासाच्या जागा उच्च पठारी प्रदेशांच्या आहेत तेथील तापमान वर्षभर १८ से. ते २० से. यांदरम्यान असते. आजही सर्वत्र वातानुकूलनासाठी ठरविलेले कार्यक्षम तापमान १८ से. ते २० से.  इतकेच आहे.

हवा : मनुष्यप्राण्यास जिवंत राहण्यासाठी हवेची, तीमधील ऑक्सिजनची आवश्यकता आहे. विरळ हवेत पुरेसा ऑक्सिजनपुरवठा होत नसल्याने त्या हवेत श्वास घेणे त्रासदायक होते. म्हणून ४,००० मी. पेक्षा जास्त उंच प्रदेशात मनुष्यवस्त्या फारशा आढळत नाहीत. तेथे असणाऱ्या मनुष्याच्या छातीचा आकार मोठ्या फुप्फुसामुळे मोठा आढळतो. पण २,५०० मी.पेक्षा कमी उंचीच्या कोणत्याही भागात भूतलावर हवेची कमतरता नाही. म्हणून हवा आवश्यक घटक असला, तरी तो अद्याप तरी वस्तीवर मर्यादा ठेवणारा घटक नाही. तीव्रवायुप्रदूषणामुळे शहरांच्या काही भागांत तो आज प्रतिकूल बनत आहे.

पाणी : पाणी हा घटक मनुष्यवस्तीला जास्त थेटपणे मर्यादित व नियंत्रित करणारा आहे. झरे, तलाव, नद्या, भूजल हे पाण्याचे स्त्रोत जेथे आहेत, तेथेच मनुष्यवस्ती स्थिरावते. पिण्याचे पाणी हा सर्व वस्त्यांचा निर्णायक घटक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पिण्याचे पाणी वाढत्या वस्त्यांना वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्याशिवाय मनुष्यवस्ती स्थिर राहू शकत नाही.

अन्न : अन्नाची गरज सहज व सतत भागेल अशी स्थळे, पाणी उपलब्ध असल्यास मनुष्यवस्तीसाठी प्रथम निवडली जातात. पाणी असणारी, पण अन्नाचे दुर्भिक्ष असणारी अनेक स्थळे मनुष्यवस्तीरहित आहेत. पाण्याची गरज निर्णायक असली, तरी पाणी तुलनेने विपुल आहे. अन्न दुर्मिळ आहे, कारण लोकसंख्या जास्त आहे. अन्न हे कार्यशक्ती व शारीरिक विकास ह्यांकरिता आवश्यक आहे. वनोत्पादने गोळा करणे, फळझाडे लागवड, शेती, शिकार, पशुपालन, मासेमारी हे अन्नोत्पादनाचे मार्ग प्राचीन काळापासून आजतागायत मनुष्यवस्तीचे आधार ठरले आहेत. तंत्रज्ञान व वाहतूकविकास यांमुळे काही प्रमाणात वस्तीवरची स्थानिक अन्नाची बंधने मनुष्य शिथिल करू शकतो. वस्त्यांची स्थाने, त्यांचे वितरण, संख्या व आकार, अन्नाची आणि पाण्याची उपलब्धता तसेच प्रमाण दर्शवितात. मोठ्या वस्त्यांमध्ये नैसर्गिक अन्नाचे स्त्रोत पुरेसे नसतात म्हणून अन्नसाठे उभारावे लागतात तसेच अन्नपुरवठाप्रणाली विकसित करावी लागते.


वस्त्र व निवारा : तापमान, वारा, थंडी यांपासून संरक्षणासाठी मनुष्यप्राण्याला वस्त्राची व निवाऱ्याची नितांत गरज भासते. वस्त्राचे प्रमाण व स्वरूप हवामानाच्या स्वरूपानुसार बदलते. हवामान थंड असल्यास वस्त्राचे स्वरूप अधिकाधिक उबदार बनते. मानवाने गुहा व कपारी निवारा म्हणून विश्रांतीसाठी वापरल्या. उष्ण कटिबंधात बंदिस्त निवाऱ्याचा प्रश्न फारसा येत नसे पण हिंस्त्र प्राणी व दुसऱ्या मनुष्यांच्या आक्रमणापासून सुरक्षितता व विश्रांती मिळण्यासाठी त्याने निवारा विकसित केला. मनुष्य समूहशील असल्यामुळे अनेक निवारे एकत्र आले व अनेक निवारे असणारी वस्ती निर्माण झाली. जेव्हा ‘वस्ती’ मधील मनुष्य इतरांसह एकत्र राहू लागला, तेव्हा तीतून त्याने मानवी संघटन निर्माण केले. ‘टोळी’ हे पहिले मानवसंघटन म्हणता येते. अशा संघटनामुळे मनुष्यप्राण्याचा मानव बनला.

सुरक्षितता व सजीव साखळी : मनुष्यवस्ती, किंबहुना कोणत्याही सजीवांची ‘वस्ती’, जीवनाची सुरक्षितता पाहून निर्माण केले. सुरक्षिततेच्या विचारात प्रतिकूल पर्यावरणीय घटक व पर्यावरणीय अपघात यांपासून सुरक्षितता मिळविण्याचा मानवाचा प्रथम प्रयत्‍न असतो, उदा., मनुष्यवस्ती-निर्मितीमध्ये पूर, वादळे, समुद्र-तुफाने, भूकंप, कडे कोसळणे, ज्वालामुखी यांपासून वस्ती सुरक्षित ठिकाणी उभारली जाते. त्याचप्रमाणे वस्तीसाठी, अन्न-पाण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या सजीवांपासून व मनुष्यांपासूनही सुरक्षित असे वस्तीचे स्थळ शोधले जाते.

जीवसाखळी : मनुष्य हा एकाकी  सजीव नाही. तो सजीव साखळीतील दुवा आहे. त्याला अन्नासाठी इतर सजीवांवर तसेच वनस्पती व प्राणी यांवर अवलंबून राहावे लागते. वस्तीचे स्थान निवडताना, वस्ती करताना ह्या जीवसाखळीचा मनुष्य जाणीवपूर्वक वा अजाणता विचार करतो. मनुष्यवस्तीचा इतिहास पाहता जीवसाखळी अतूट राखण्याच्या त्याच्या प्रयत्‍नातून झालेल्या मनुष्यवस्तीच्या स्थलांतरांचे अनेक पुरावे आढळतात. विशिष्ट फळे देणारे वृक्ष, पिके व प्राणी वस्तीच्या प्रदेशातून नष्ट झाल्यास मनुष्यवस्त्या उजाड होतात व मनुष्य स्थलांतर करतो. श्रीलंकेच्या जंगलातील अनुराधपूरसारखी मोठी वस्ती या घटकांमुळेच उजाड बनली आहे. द. अमेरिकेतील प्राचीन माया व इंका वस्त्या जीवसाखळी भंग पावल्याने उजाड झाल्या, असे पुरावे आज दिसतात. वस्तीचे चिरंतनत्व आपला जीवसाखळीचा दुवा पक्का ठेवते, याचा नव्याने साक्षात्कार गेल्या वीस वर्षांत मानवाला झाला आहे. पृथ्वी ही आपली ‘वस्ती’ आहे, पृथ्वी हे मानवाचे घर आहे, पृथ्वी एक अवकाशयान प्रणाली आहे व येथील सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी आहे. मानव या साखळीतील एक दुवा आहे. ऑक्सिजननिर्मिती व कार्बन डाय-ऑक्साइड यांचे नियंत्रण यांपासून जीव व पर्यावरण यांची परस्परावलंबी साखळी सुरू झाली. आज वनस्पतींच्या घटत्या प्रमाणामुळे (मानवाच्या अविवेकी जंगलतोडीमुळे आणि वातावरण कार्बन डाय-ऑक्साइड सोडण्यामुळे) ही साखळी धोक्यात आली आहे.

मनुष्यवस्तीचे स्थूल जागतिक वितरण : मनुष्यवस्त्यांच्या निर्मितीवर प्रभाव पाडणारे घटक आपण पाहिले. या वस्त्या विविध प्राकृतिक परिस्थितीमध्ये विकसित झाल्या आहेत. त्यांमध्ये (अ) भूरूपानुसारी वस्त्या व (ब) हवामानानुसार वस्त्या असे, दोन भाग आहेत. (अ) भूरूपानुसारी वस्त्यांमध्ये (१) किनारी वस्त्या, (२) मैदानी वस्त्या, (३) पठारी वस्त्या (४) पर्वती वस्त्या आणि (५) द्वीप वस्त्या, असे प्रमुख प्रकार आहेत.

(ब) हवामानानुसारी वस्त्यांमध्ये (१) विषुववृत्तीय बारमाही पर्जन्याच्या सदापर्णी जंगलातील वस्त्या, (२) सॅव्हाना गवताळ प्रदेश वस्त्या, (३) वाळवंटी वस्त्या, (४) मान्सून वस्त्या, (५) भूमध्य समुद्री हवामान वस्त्या, (६) पश्चिम यूरोपीय वस्त्या, (७) सूचिपर्णी अरण्य तैगा प्रदेश वस्त्या, (८) चिनी किंवा सेंट लॉरेन्स नदीकाठच्या पूर्वकिनारी समशीतोष्ण प्रदेश वस्त्या, (९) बर्फाळ प्रदेश, टंड्रा असे पारंपारिक वस्त्यांचे प्रकार आहेत. या प्रदेशांचे हवामान, शेती व अन्नोत्पादन प्रणाली, लोकसंख्या आणि क्रमबद्ध विकास यांतून वस्ती प्रारूपे निर्माण झाली आहेत. पण आज जागतिक वाहतूक, आंतरराष्ट्रीय व्यापार, जागतिक अन्न व वस्त्र प्रमाणीकरण व प्रमाणित निवासस्थाने रचनाकार यांतून वरील प्रदेशानुसार वस्ती-वैशिष्ट्ये नष्ट होत आहेत. आज जागतिक खाद्यप्रकार, वस्त्र-प्रावरणे, पेहराव, गृहबांधणी व घरसामान यात जगभर एकसारखेपणा येत आहे. प्रदेशानुसारी प्रकारांपेक्षा कार्यानुसारी प्रकार जास्त महत्त्वाचे बनत आहेत. महानगर, मग ते भारतात असो की चीनमध्ये किंवा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये असो, त्यात अधिकाधिक वस्ती-साम्ये आढळतात कारण त्यांची कार्ये सारखीच आहेत. म्हणून मनुष्यवस्तीचे (मॅन्स हॅबिटॅट) आधुनिक रूप मानववस्ती (ह्यूमन सेटलमेंट) पाहणे क्रमप्राप्त ठरते. आज जगभर मानववस्ती कार्यानुसारी बनत आहे.  

मानववस्ती : या चर्चेमध्ये मनुष्यवस्ती व मानववस्ती असे शब्दप्रयोग हेतुपूर्वक वापरले आहेत. मनुष्यप्राणी जेव्हा सुसंस्कृत बनतो, तेव्हा तो मानव बनतो. हे परिवर्तन समूहाने वस्तीत राहण्यामुळे होते. वस्तीत राहणारा मनुष्य आपल्याबरोबर राहणाऱ्या मनुष्यांचे संघटन  उभारतो या संघटनातून मनुष्याला एक नवे सामर्थ्य लाभते. त्यातून त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर बंधने येतात, पण त्याच संघटनामुळे त्याच्यावर येणारी पर्यावरणाची व स्पर्धक प्राण्यांची, ताकदीच्या मर्यादेची व काळाच्या आक्रमणाची बंधने दूर होतात नष्ट होत नाहीत. मनुष्याचा मानव होतो, तेव्हा तो सर्वांत प्रभावी ‘जीव’ बनतो. तो आपला सातत्यपूर्ण समाज निर्माण करतो. या सातत्यपूर्ण समाजाचे प्रतिबिंब त्याच्या सातत्यपूर्ण वस्त्यांमध्ये दिसते. मानववस्ती म्हणजे मानवाचा निवारा असणारे स्थळ. मानवाचा कायमस्वरूपी निवारा असल्यास कायम वस्ती निर्माण होते, तर भटक्या समाजाच्या भटक्या किंवा तात्पुरत्या वस्त्या आढळतात. ‘पृथ्वी परमेश्वराने निर्मिली व वस्ती मानवाने’ असे म्हटले जाते. मानववस्ती हा माणसाचा भूतलावरील सर्वांत स्पष्ट ठसा आहे. मनुष्यवस्त्यांपेक्षा मानववस्त्या तेथील निवाऱ्यांच्या अवशेषांमुळे जास्त स्पष्ट ओळखता येतात. सुरुवातीला मनुष्याने गुहांसारख्या नैसर्गिक निवाऱ्यांचा उपयोग केला पण जसजसे मानवसंघटन प्रभावी बनले, तसतसे मानवाने पक्के निवारे व सामूहिक इमारती बांधण्याचे तंत्र विकसित केले. किल्ले, मंदिरे, राजवाडे यांमुळे मानववस्त्या चिरस्थायी झाल्या. 


मानववस्त्यांची कार्ये : मानववस्त्या पुढील कार्यासाठी निर्माण होतात : 

(१) संरक्षण : मानव निवारा बांधतो. निवाऱ्यामुळे वस्ती निर्माण होते. मानवाला ऊन, थंडी, वारा, पाऊस आणि हिंस्त्र प्राणी व इतर आक्रमक मानवसमूह यांपासून संरक्षणाची गरज असते. ही गरज वस्ती भागविते. वस्तीमुळे मानवाला समूहशक्तीचे संरक्षण मिळते. 

(२) विश्रांती : वस्ती मानवाला विश्रांतीचे, खाजगी जीवनासाठी स्थळ उपलब्ध करून देते. 

(३) संपत्तीची साठवण : मानवाची वैयक्तिक व सामूहिक संपत्ती साठविण्याची सोय वस्तीमुळे होते. धान्य, मौल्यवान वस्तू, शेतीसाधने व नंतरच्या काळात सोने-नाणे इ. संपत्तिरूप वस्तू वस्तीमुळे साठविता येतात. त्या गरज असेल तेव्हा वापरता येतात. 

(४) सामाजिक-सांस्कृतिक कार्ये : वस्तीमुळेच मानवाला कार्यक्षम असे सामाजिक संघटन करता येते. कुटुंब, समुदाय व उत्पादक संघटन, श्रमांचे विभाजन, कार्याचे संयोजन वस्तीत निर्माण होते. सांस्कृतिक घटक, कला, धर्म यांची अभिव्यक्ती व विकास वस्तीशिवाय अशक्य आहे. वस्तीत मानवाला अंतर्मुख होण्यास निवांतपणा मिळतो. वस्तीच्या आधारे तो चिंतनशील बनतो. वस्त्यांची जशी वाढ होते, त्या प्रमाणात त्या वस्त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक कार्य जास्त व्यापक व तरल होते. वरील कार्ये मूलभूत असून सूत्ररूपाने मांडली आहेत. आजच्या वस्त्यांची साधन-संपत्ती, निवासी सोयी, आर्थिक, राजकीय, व्यापारी, प्रशासकीय, शैक्षणिक, आरोग्यसेवा, मनोरंजनादी कार्ये वरील कार्यातूनच विकसित झाली आहेत. 

मानववस्त्यांचे प्रकार : वस्त्यांचे कार्यानुसार दोन प्रकार आहेत : (१) ग्रामीण वस्त्या व (२) नागरी वस्त्या. 

ग्रामीण वस्त्या : ग्रामीण वस्तीची नेमकी व्याख्या करता येत नाही, पण ज्या ठिकाणी बहुसंख्य लोक प्राथमिक व्यवसायांत गुंतलेले आहेत व जेथील लोकसंख्या विरळ आहे, अशा वस्तीला ‘ग्रामीण वस्ती’ असे म्हणता येते. ग्रामीण वस्तीवर कृषी, लाकूडतोड, खाणकाम, मासेमारी, पशुपालन यांसारखे व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या ७५ टक्क्यांंपेक्षा जास्त असते. घरे लहान, साधी, रस्ते अरुंद, कच्चे व इतर सोयी अल्प प्रमाणात असतात. ग्रामीण वस्तीचे स्वरूप देशाच्या प्रगतीनुसार बदलते. ग्रामीण वस्तीचे तीन प्रकार मानले जातात.

 

(अ) कुटिर वस्ती (पडळ) : जेव्हा एखाद-दुसऱ्या झोपडीची वस्ती असते, तेव्हा कुटिर वस्ती बनते. नैसर्गिक साधनसंपत्ती अत्यंत तुटपुंजी असते, तेव्हा एका कुटुंबाच्या निर्वाहाला विस्तीर्ण भूप्रदेशाची गरज भासते व तेथे कुटिर वस्ती निर्माण होते. डोंगराळ, गवताळ प्रदेशांत या वस्त्या आढळतात. बऱ्याच वेळा कुटिर वस्त्या सोडून दिलेल्या आढळतात. 

 

(ब) वाडी (हॅम्लिट) :किमान पाच निवासस्थानांच्या वस्तीस वाडी म्हणावे, असा पाश्चात्त्य देशांत संकेत आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील संकेताप्रमाणे जेथे पाच घरे व दूरध्वनी असेल, अशा वस्तीला ‘वाडी’ म्हटले जाते. सामान्यतः वाडीतील कुटुंबे एकाच मूळ घरातील व नातेवाईक असतात. महाराष्ट्रात वाड्या तेथील बहुसंख्या कुटुंबांच्या आडनावांनी ओळखल्या जातात. जसे मोरेवाडी, शिंदेवाडी इत्यादी. वाडीत एखाद-दुसरे दुकान आढळते. 


(क) खेडे : खेडे म्हणजे शासनाने अधिसूचित केलेली वस्ती होय. महाराष्ट्रात परंपरेने अधिसूचित केलेली खेडी आहेत तर नवीन वस्ती निर्माण झाल्यानंतर तेथील रहिवाशांनी आपली वस्ती खेडे म्हणून शासनाने अधिसूचित करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज करावा लागतो. तपासणीनंतर लोकसंख्या, शेतसारा-क्षेत्रफळ, जमिनीचा पोत व इतर शासकीय कसोट्या लावून खेडे अधिसूचित होते व त्याला मान्यता मिळते. हे नियम सर्वत्र सारखे नसतात. खेड्यात शेतीचे व अन्य प्राथमिक व्यवसायांचे प्राबल्य असते पण त्याचबरोबर काही अन्य सेवाही येथे उपलब्ध असतात. शिक्षण, दुकाने, लोहार, सुतार, डाक कार्यालय, दवाखाना, पाणवठा, रस्ते, ग्रामपंचायत, बॅंकेची शाखा, किरकोळ दुरुस्ती, पीठगिरणी या सुविधा सामान्यतः सर्वसाधारण खेड्यात आढळतात. मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या किंवा वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी आठवड्याचा बाजार विकसित होतो. त्याला अनुसरून केंद्रीय सेवा निर्माण होतात. कालांतराने आठवड्याच्या बाजाराच्या गावाचे ते वाहतूककेंद्र असल्यास ग्रामीण वस्तीचे नगरात रूपांतर होते.

 

नागरी वस्ती :नागरी वस्तीची शास्त्रीय व्याख्या नाही. शासनाने केलेली प्रशासकीय व्याख्या किंवा जनगणनेने केलेल्या व्याख्याच सर्वत्र वापरल्या जातात. नागरी वस्तीमध्ये बिगर-शेती व्यवसायात ७५% पेक्षा जास्त कामकरी लोकसंख्या गुंतलेली असते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये २,५०० पेक्षा जास्त निवासी लोकसंख्या असणाऱ्या वस्तीला ‘नागरी वस्ती’ म्हणतात. भारतात जनगणना विभागाने १९६१ पासून नागरी प्रदेशासाठी खालील कसोट्या लागू केल्या आहेत :

(अ) जेथे नगरपरिषद, महानगरपालिका किंवा लष्करी कॅंटोनमेंट असेल अशा सर्व वस्त्या.  

(ब) खालील अटी पूर्ण करणाऱ्या इतर सर्व वस्त्या : 

१. किमान निवासी लोकसंख्या ५,००० किंवा जास्त

२. पुरुष कामकारी लोकांपैकी ७५% लोक बिगर-शेती उद्योगांत

३. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ४०० पेक्षा जास्त असावी. 

वरील कसोट्या सार्वकालिक किंवा सर्वसमावेशक नाहीत. नागरी वस्ती ही मुख्यतः प्रक्रिया उद्योग करणारी व सेवा पुरविणारी असते. उदा., बाजार, व्यापार, बॅंक, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, करमणूक इत्यादी. [⟶ नगरे व महानगरे].

 

ग्रामीण वसतिस्थाने : ग्रामीण वस्तीचे स्थान निवडताना पुढील घटक विचारात घेतलेले आढळतात :

(१) पाण्याची सोय, पिण्यासाठी व इतर वापरासाठी कायम स्वरूपाचा पाणवठा, झरा, तलाव, नदी किंवा भूजल असेल, अशा ठिकाणी वस्तीचे स्थान निवडले जाते.

(२) भूमी : वस्तीसाठी निवडलेली भूमी सामान्यतः सपाट व घट्ट स्वरूपाची असते. शेतीच्या प्रदेशात वस्तीसाठी त्यांतल्या त्यांत नापीक किंवा खडकाळ असणारी भूमी वापरतात. काळ्या जमिनीत शेत व पांढऱ्या जमिनीत गाव, असे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आढळते.

(३) पुरापासून संरक्षण : नदीकाठी, किनारी भागात पुरामुळे किंवा समुद्राचे पाणी आत घुसून प्रदेश जलमय होण्याची शक्यता असते, म्हणून अशा प्रदेशात वस्तीची स्थाने अथवा गावठाणे उंचावर असतात.


(४) ऊन, वारा, पाऊस या दृष्टींनी निवारा : गावाचे स्थान निवडताना वाऱ्याची तसेच पावसाची दिशा यांचाही विचार केला जातो. उष्ण कटिबंधात पूर्वेस उतारावर, तर समशीतोष्ण कटिबंधात सूर्यासमोर दक्षिणेस उतारावर वस्त्या आढळतात. समुद्रकिनाऱ्यावर सागरी वाऱ्याच्या दिशेने उघडी स्थाने निवडली जातात तर दऱ्यांमध्ये दरी तळाऐवजी दरी उतारावर गावे वसतात.

(५) संरक्षण : जुनी गावे संरक्षणाच्या दृष्टीने सोयी-सुविधा असणाऱ्या ठिकाणी वसविली जातात. खिंडीमध्ये किंवा उंच डोंगरमाथ्यावर जेथून दूरवर टेहळणी करता येते, अशा ठिकाणी व गावाभोवती तट बांधता येईल, खंदक खोदता येईल, अशा ठिकाणी खेडी वसविली जात. गावाकडे जाण्याचा मार्ग हेतुतः दुर्गम राखला जाई. अनेक किल्ले याच दृष्टिकोनातून उभारलेले आढळतात.

(६) पूर्वनियोजित स्थान : जेव्हा नव्या प्रदेशाचा विकास करावयाचा किंवा खाणकामासारखे उद्योग सुरू करावयाचे असतात. तेव्हा उद्दिष्टपूर्तीचा विचार करूनच वस्तीचे स्थान निवडले जाते आणि त्याचे त्या दृष्टीने नियोजन केले जाते. पूर्व रशियातील गावे किंवा ऑस्ट्रेलिया, चिली या देशांतील खाणींची गावे नियोजित स्थानी आहेत.

 

ग्रामीण वस्तीची रचना : पाणी, रस्ते इ. सुविधांसाठी वस्तीच्या रचनेचा अभ्यास महत्त्वाचा असतो. गावातील घरांची रचना कशा पद्धतीने केलेली आहे, त्यावरून ग्रामीण वस्तीचे खालील प्रकार केले जातात.

(अ) एकत्रित किंवा केंद्रीभूत : जेव्हा वस्तीतील घरे एकमेकांस लागून अत्यंत जवळ असतात, तेव्हा केंद्रीभूत वस्ती निर्माण होते. महाराष्ट्राच्या ‘देश’ या भागातील वस्त्या याच प्रकारच्या आहेत. पाणीपुरवठा करणारा तलाव, गावप्रमुखाचे घर, मंदिर किंवा नाक्याचे स्थान या ठिकाणी किंवा सभोवताली सुपीक जमीन असल्यास वस्तीमध्ये कमीतकमी जमीन वापरली जावी म्हणून अशा वस्त्या निर्माण होतात. पायी प्रवास करण्यामुळेही केंद्रीभूत वस्त्या निर्माण होतात. विखुरलेली घरे चोरी, दरोडे या दृष्टींनी असुरक्षित असतात, म्हणूनही केंद्रीभूत वस्त्या निर्माण होतात.

केंद्रीभूत वस्त्यांचे उपप्रकार : (१) ताराकृती वस्ती : जेव्हा वस्ती रस्त्यांच्या नाक्यावर किंवा छेदन स्थानी निर्माण होते, किंवा केंद्रापासून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांस अनुसरून घरे बांधली जातात, तेव्हा ताराकृती वस्ती निर्माण होते.

(२) चौरसाकृती वस्ती : या वस्त्या नियोजनपूर्ण ग्रामीण वस्त्यांच्या प्रदेशांत आढळतात. उदा., अमेरिकेमध्ये जमिनीचे वाटप करताना ६५ हेक्टरांचे भाग पाडून वाटप करण्यात आले व चार शेते एकत्र येतील, त्या कोपऱ्यावर चौरसाकृती वस्ती करण्यात आली.

(ब) विखुरलेल्या वस्त्या : जेव्हा वस्तीमधील घरे स्वतंत्र व एकमेकांपासून दूर, सभोवती शेत किंवा मोकळी जागा असेल अशी आढळतात, तेव्हा या प्रकारची वस्ती बनते. उदा., कोकणात, हिमालय पर्वताच्या दऱ्यांमध्ये या प्रकारच्या वस्त्या आहेत. जास्त पाऊस, उंचसखल भूरचना व कमी उत्पादन जमीन यांमुळे हा रचना-प्रकार निर्माण होतो. बागायत प्रकारची फळबागांची शेती व पाण्याची सहज उपलब्धता यांमुळे शेतातच घरे बांधली जातात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर हा रचना-प्रकार स्पष्ट दिसतो.


(क) रेखाकार वस्त्या : जेव्हा घरे रस्ता, नदी, समुद्र किनारा यांना अनुसरून समांतर रेषेत खूप अंतरापर्यंत बांधलेली असतात, तेव्हा हा प्रकार निर्माण होतो. जेव्हा शेत नदीपासून दूर पसरतात, तेव्हा पाणी घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास नदीकाठ हवा असतो किंवा समुद्रावर मासेमारीत प्रत्येक कोळ्यास जावयाचे असते. हे अंतर कमी करण्यासाठी या प्रकारच्या वस्त्या निर्माण होतात.

ग्रामीण वस्त्या सतत बदलणाऱ्या असतात, त्यांचे रचना-प्रकार कार्यानुसार, तंत्रज्ञानानुसार बदलतात. सुरक्षितता बदलल्यास रचनेमध्ये बदल होतो. आज पाण्याची सोय चांगली असेल मोटार वाहतूक सुरू झाली असेल, तर रचनाप्रकार केंद्रीभूत वस्तीऐवजी विखुरलेला किंवा रेखाकार बनू शकतो पण मूळ गावठाण मात्र तेथेच राहते. भूकंप, सतत येणारे पूर व दुष्काळ यांसारख्या आपत्ती आल्यास वस्ती उठते. उ. अमेरिकेमध्ये शेतीचे यांत्रिकीकरण व मोटारींचा वापर यांमुळे अनेक ग्रामीण वस्त्या उठल्या लोक शहरांत गेले. जेथे सामान्यतः वस्त्यांमध्ये इमारती, रस्ते इ. मध्ये खूप गुंतवणूक असते, तेथील वस्त्या दीर्घकाळ टिकून राहतात.

नागरीकरण व ग्रामीण वस्त्या : नागरीकरण म्हणजे नगरात राहणाऱ्या लोकसंख्येत वाढ होणे. उदा., अधिकाधिक लोक शहरात स्थलांतरित होणे किंवा अनेक खेडी नगरे बनल्यामुळे नागरी लोकसंख्येत वाढ होणे. जेव्हा आर्थिक विकास होतो व मध्यवर्ती खेड्यात व्यापार विकसित होतो एखादा साखर कारखाना खेड्यात स्थापन होतो व तेथे इतर छोटे उद्योग निर्माण होतात, दुकाने वाढतात शाळा-महाविद्यालये सुरू होतात बॅंका, कार्यालये स्थापन होतात, तेव्हा त्या खेड्याचे रूपांतर नगरात होते. अशा प्रकारे काही खेडी सतत नगरांत परिवर्तित होत असतात.

नगरांमध्ये रोजगार संधी जास्त उपलब्ध असतात, त्यामुळे ग्रामीण लोकसंख्येतील उत्साही युवक व धडाडीचे लोक यांचे शहरांकडे सतत स्थलांतर होते. ग्रामीण वस्त्यांमध्ये तरूण कामकऱ्यांची कमतरता भासते. खेड्यांत केवळ म्हातारे, स्त्रिया व मुलेच उरतात खेड्यांतील अनेक शेते ओसाड पडतात. कोकणात असा परिणाम ग्रामीण वस्त्यांवर झालेला दिसतो.

आज ग्रामीण वस्त्यांवर शहरांच्या, विशेषतः महानगरांजवळच्या भागांत, नागरीकरणाचे प्रभाव वेगळ्या प्रकारे कार्य करीत असलेले आढळतात. महानगरांमधील प्रचंड गर्दी, मुख्यतः न परवडणारे जमिनींचे मूल्य, प्रदूषण, अतिकृत्रिम यांत्रिक जीवन व मोटारींसारख्या खाजगी वाहनांची विपुलता यांमुळे अनेक शहरातील कुटुंबे महानगराजवळच्या खेड्यांत रहायला जातात. रस्ते, दूरध्वनी व ग्रामीण पाणीयोजना इ. मुळे आज अनेक खेड्यांत पुरेशा सुविधा आढळतात. शहरात रोज कामाला स्वतःच्या अगर सार्वजनिक वाहनांनी जाणारे, पण खेड्यात राहणारे लोक खेड्याला नगराचे बाह्यात्कारी रूप देतात. यालाच ‘ग्रामनागरीकरण’ म्हणतात. काही वेळा अशा खेड्यांस शयनगृह खेडी असेही म्हणतात. या खेड्यांत नागरी कार्ये मात्र आढळत नाहीत.

ग्रामीण वस्त्या व नागरीकरण हा सतत गतिमान संबंध असणारा अभ्यासविषय आहे.

संदर्भ :  1. James, Preston E. Geography of Man, New York, 1958.

            2. Simons, Martin, The Changing World Deserts, New York, 1967.

डिसूझा, आ. रे.