जम्मू : जम्मू व काश्मीर राज्यातील जम्मू प्रांत व जिल्हा यांचे प्रमुख ठिकाण व राज्याची हिवाळी राजधानी. उपनगरांसह लोकसंख्या १,६४,२०७ (१९७१). बाह्य हिमालयाच्या पायथ्याशी, शिवालिकच्या मैदानी प्रदेशात, समुद्रसपाटीपासून सु. ३६४ मी. उंचीवर, चिनाबची उपनदी तावी हिच्या काठी हे वसले असून काश्मीर खोऱ्याचे प्रवेशद्वार समजले जाते. हे श्रीनगरच्या दक्षिणेस सडकेने २०६ किमी. व पठाणकोटच्या वायव्येस १०५ किमी. असून येथपर्यंत भारतीय रेल्वे आलेली आहे. अमृतसर, लेह, श्रीनगर, दिल्ली यांच्याशी येथून नियमित विमानवाहतूक चालते. पाकिस्तानच्या सरहद्दीजवळ (लाहोर १४४ किमी.) मोक्याच्या जागी असल्याने जम्मूस मोठे लष्करी महत्त्व आले आहे. प्रांतातील ही सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. येथे पिठाच्या गिरण्या, औषध संशोधन संस्था, रेशीम कारखाने, लाकूडकामाचे व विविध कलाकामांचे छोटे छोटे उद्योग, खिळ्यांचा कारखाना इ. असून येथील ‘नारा’ लेसप्रकार सुप्रसिद्ध आहे. शिक्षणाचेही हे मोठे केंद्र असून येथे विद्यापीठ, विविध महाविद्यालये व शाळा असून उपनगरात नुकतीच सैनिकी शाळा स्थापन झाली  आहे. पूर्वींच्या संस्थानिकांची ही हिवाळी राजधानी असल्याने येथे त्यांचे राजवाडे असून त्यांत विविध कार्यालये आहेत. जम्मूमध्ये आकाशवाणी केंद्र असून अनेक सांस्कृतिक संस्था आहेत.

शाह, र. रू.