इंफाळ : पूर्वीच्या मणिपूर संस्थानाची व आताच्या मणिपूर राज्याची राजधानी. २४ ५०’ उ. ९३ ५९’ पू. लोकसंख्या १,००,३६६ (१९७१). इंफाळ व नंबुल नद्यांमधील एका सुंदर खोऱ्यात, समुद्रसपाटीपासून सु. ८०० मी. उंचीवर हे वसले असून, मणिपूर राज्याचे सांस्कृतिक व व्यापारी केंद्र आहे. येथील कलाकौशल्याच्या वस्तू व हातमागाचे कापड प्रसिद्ध असून मणिपुरी नृत्यकलेचे हे आद्यपीठ समजले जाते. पोलो खेळाचे हे मूलस्थान असावे, असाही समज आहे. येथे सहा महाविद्यालये व कित्येक प्रशाळा आहेत. जिल्ह्यातील प्रमुख शहरांशी हे सडकांनी जोडलेले असले, तरी डोंगराळ प्रदेशामुळे, नागा लोकांच्या असंतोषामुळे तसेच देशाच्या सीमेलगत असल्याने येथली विमानतळ महत्त्वाचा मानला जातो. दुसऱ्या महायुद्धात सुभाषचंद्र बोसांचे सैन्य इंफाळपर्यंत आले होते. ईशान्य रेल्वेच्या मणिपूररोड (दिमापूर) स्थानकाच्या २१५ किमी. दक्षिणेस हे असून इंफाळपासून सु. १०७ किमी. पूर्वेस ब्रह्मदेशाची हद्द लागते. स्त्रियांच्या आभूषणांसाठी प्रसिद्ध असलेला भारतातील सर्वांत मोठा बाजार ‘खवैरामबंद’, श्री. गोविंदजीचे मंदिर व राजवाडा पाहण्यासारखे आहेत. येथून जवळच असलेल्या लोकटाक सरोवरावरील बहुउद्देशी प्रकल्प पुरा झाल्यानंतर इंफाळला खूपच महत्त्व येणार आहे. (चित्रपत्र ७४).

ओक, शा. नि.

बाजारातील एक दृश्य, इंफाळ