जिंजीचा किल्ला

जिंजी : तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे इतिहासप्रसिद्ध ठिकाण. हे मद्रास-धनुष्कोडी लोहमार्गावर, मद्रासपासून सु. १२१ किमी. तसेच तिंडीवनम्‌-तिरुवन्नामलई हमरस्त्यावर वसलेले आहे. या गावाच्या पश्चिमेस सु. १·५ किमी. वर येथील इतिहासप्रसिद्ध दुर्गम किल्ला आहे. राजगिरी, कृष्णगिरी व चंदरायदुर्ग अशा तीन टेकड्यांवर मिळून हा बांधलेला आहे. यांतील राजगिरी सर्वांत उंच (सु. १८३ मी.) असून त्याच्या तीन बाजूंनी उंच, तुटलेले कडे आणि उत्तरेकडून एक छोटीशी वाट आहे. किल्ल्याभोवती तिहेरी तट असून वर जाण्याची वाट मजबूत व अरुंद आहे. किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष असून त्यात दोन देवळे, कल्याणमहाल, कोठारे, स्‍नानाचे चौरंग, तोफा, कैद्यांची विहीर हे उल्लेखनीय आहेत. हा किल्ला कोणी बांधला याबाबत एकमत नसले, तरी बहुधा हा विजयानगरच्या राज्यकर्त्यांनी बांधला असावा, असा तर्क आहे. राजाराम महाराज या किल्‍ल्यात असताना औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने दिलेला वेढा इतिहासप्रसिद्धच आहे.

कापडी, सुलभा