मुझफर नगर : भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,७१,८१६ (१९८१). हे राज्याच्या पश्चिम भागात, दिल्लीच्या उत्तर ईशान्येस, मीरत-हरिद्वार रस्त्यावर असून रस्ते व लोहमार्गांनी ते दिल्लीशी जोडलेले आहे. शाहजहानच्या कारकीर्दीत खान-इ-जहान याने १६३३ मध्ये सरवर्ट या जुन्या नगराच्या शेजारी याची स्थापना केली व आपल्या वडिलांच्या नावावरून त्यास मुझफरनगर नाव दिले. १८२४ मध्ये हे सहारनपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाणी बनले व तेव्हापासून या नगरात विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यानंतर दोनच वर्षांनी मुझफरनगर जिल्ह्याची स्थापना झाली. १८७२ मध्ये शहरात नगरपालिका स्थापन झाली. मुझफरनगर हे कृषिमालाच्या, विशेषतः गहू, तसेच घोंगड्यांच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र असून काही छोटे निर्मितिउद्योगही चालतात. येथे दोन महाविद्यालये आहेत.

चौधरी, वसंत