किष्किंधा : रामायणकालीन प्राचीन नगर. हे दंडकारण्यातील पंपा सरोवराच्या ईशान्येस तीन किमी. वर असून येथे वानरराज वाली व सुग्रीव यांची राजधानी होती. कर्नाटक राज्यातील तुंगभद्रा नदीकाठच्या हंपीजवळचे आधुनिक अनेगुंदी गाव म्हणजेच प्राचीन काळची किष्किंधा नगरी होय असे म्हणतात. अनेगुंदीपासून थोड्या अंतरावर आग्नेयीकडे तुंगभद्रेच्या काठी वालीप्रासाद व सप्ततालवेधस्थान दाखविले जाते. या स्थळापलीकडील गुंफेमध्ये रामाने वालीवधानंतर विश्रांती घेतली होती. नदीच्या पलीकडील तीरावर वालीवधाचे स्थान असून, तेथील श्वेतशिला वालीच्या अस्थी म्हणून दाखवितात, तर त्याजवळच्या पर्वत शिखरांना तारा, अंगद व सुग्रीव यांच्या नावांनी संबोधतात.

जोशी, चंद्रहास