कोईमतूर : तमिळनाडू राज्यातील जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या ३,५६,३६८ (१९७१). हे नोयिल नदीच्या डाव्या तीरावर, ३९६ मी. उंचीवर, निलगिरी आणि अन्नमलई पर्वतांच्या दरम्यान बोलमपट्टी खोऱ्यात, पालघाट खिंडीच्या तोंडाशी मोक्याच्या जागी वसलेले असून कर्नाटक व केरळ राज्यांना जवळ आहे. येथील हवामान समशीतोष्ण, सु. २५ ते २७·५ से. तपमान व वार्षिक सरासरी पर्जन्य ५५ सेंमी. असे आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर येथे वीज व लांब धाग्याचा कापूस उपलब्ध झाल्यामुळे औद्योगिक विकास वेगाने झाला. कापड, कातडी कमाविणे, साबण, कृषिउपकरणे, कॉफी, साखर इत्यादींच्या गिरण्या, लहानमोठे कारखाने आणि अनेक लघुउद्योग यांचे हे केंद्र आहे. रुंदमापी व मीटरमापी लोहमार्गाचेही हे एक केंद्र आहे. चहा व कॉफीचे मळे आसपासच असल्याने त्या मालाची ही बाजारपेठ आहे. शहरात अनेक शैक्षणिक, कृषिसंशोधनविषयक, तंत्र-वैज्ञानिक संस्था असून साक्षरतेचे प्रमाण ६५·४२ % आहे. राज्यातील औद्योगिक व आर्थिक दृष्ट्या दुसऱ्या क्रमांकाच्या या शहराला इतिहास तेराव्या शतकापासून आहे. येथून ६ किमी. वर पेरूरची मंदिरे प्रेक्षणीय आहेत. गोष्टीश्वर, सभापती, पट्टीश्वर यांपैकी काही मंदिरे टिपूने भ्रष्ट केली असली, तरी ११ मी. उंचीचा ध्वजस्तंभ, १७ मी. उंचीचे गोपूर, छतापासून लोंबणाऱ्या दगडी साखळ्या आणि शिवतांडवनृत्याच्या मुद्रा दाखविणारे आठ खांब ही शिल्पे अजून पाहता येतात. १७६८ ते १७९९ हैदर – टिपू विरुद्ध इंग्रज या लढायांत अनेक वेळा ताबा बदलून अखेर कोईमतूर इंग्रजांकडे आले व १८६५ पासून जिल्ह्याचे ठाणे झाले. मद्रासच्या पश्चिमेस द. रेल्वेने ४९१ किमी. अंतरावर हे स्थानक असून येथून पश्चिम किनाऱ्याकडे व ऊटकमंडकडे लोहमार्ग जातात. येथे विमानतळही आहे.

ओक, शा. नि.