चंद्रगिरी : आंध्र प्रदेश राज्याच्या चित्तूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण आणि रेल्वे स्थानक. हे स्वर्णमुखी नदीच्या उजव्या तीरावर तिरुपतीपासून ११ किमी. आणि चित्तुरच्या उत्तरईशान्येस ४८ किमी.वर पूर्व घाटाच्या दरीत वसलेले आहे.

तालिकोटची लढाई हरल्यानंतर विजयानगरच्या साम्राज्याची ही राजधानी होती. इ. स. १००० मध्ये इमादी नरसिंह यादव रायलूने येथील किल्ला बांधला. त्यानंतर त्याची मालकी अनेकांकडे आली व गेली. हा किल्ला ग्रॅनाइटी खडकावर, पायथ्यापासून सु. १८३ मी. आहे. तटबंदी, तिच्या आतील विजयानगरच्या राजांचा राजवाडा, अनेक छोटी मंदिरे इ. भग्नावशेष सध्या पाहावयास सापडतात. येथील गोपुरे सुंदर नक्षीकामयुक्त असून दरबार हॉलचा वापर सध्या प्रवासी बंगला म्हणून केला जातो. आधुनिक चंद्रगिरी शहर हे अत्यंत रेखीव व प्रमाणबद्ध आहे.

कापडी, सुलभा