ग्रात्स : ऑस्ट्रियातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि स्टिरिया प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,४९,२oo (१९७१). हे मूर नदीकाठी, व्हिएन्नाच्या १८o किमी. नैर्ऋत्येस, श्लॉसबर्ग (४५७ मी.) शिखराच्या कुशीत वसले आहे. सु. नवव्या शतकात बांधलेल्या येथील किल्ल्यात चौदाव्या शतकात हॅप्सबर्ग घराण्याची राजधानी होती. त्यामुळे मध्ययुगीन काळाती २७ मी. उंचीचा क्लॉकटॉवर, ३५ मी उंचीवरील भव्य घंटा, कॅथीड्रल, बरोक शैलीतील चर्च, १५८६ साली स्थापन झालेले विद्यापीठ, जुन्या हत्यारांचे संग्रहालय व दारुखाना इ. वास्तू येथे पहावयास मिळतात. आधुनिक ग्रात्स व्यापार आणि उद्योगधंद्यांचे केंद्र असून येथे पोलाद, यंत्रे, कागद, काच कातडीकाम, कापड इत्यादींचे उद्योग आहेत. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ केप्लर (१५७१—१६२९) हा येथील विद्यापीठात काम करीत होता. आजही ग्रात्सला शैक्षणिक महत्त्व आहे.

शाह, र. रू.