स्टालिनो : सध्याचे डोनेट्स्क. युक्रेनमधील डोनेट्स्क प्रांताची राजधानी आणि एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या ९,७५,९५९ (२०११). युक्रेनच्या आग्नेय भागात कॅल्मीअस नदीकाठावर हे शहर वसले आहे. १८६९ मध्ये या शहराची स्थापना करण्यात आली. डोनेट्स या समृद्ध कोळसा क्षेत्रात हे शहर वसलेले आहे. ब्रिटिश उद्योजक जॉन ह्यूझ याने येथे लोह-पोलाद उद्योगाची स्थापना केली (१८७२). रशियात लोहमार्गांचा वेगाने विकास केला जात होता. या लोहमार्गांसाठी लागणार्‍या सर्व साधनांची निर्मिती करणे हा मुख्य उद्देश या कारखान्याच्या स्थापण्या-मागे होता. या उद्योगाला लागणारा दगडी कोळसा जवळच्याच डोनेट्स या कोळसा क्षेत्रातून उपलब्ध होत असे. या कारखान्याच्या स्थापनेपासून शहराच्या औद्योगिक विकासास गती मिळाली. एकंदरच कोळसा खाणकाम व लोह-पोलाद निर्मिती उद्योगांचा येथे वेगाने विकास होत गेला. १९१४ मध्ये येथे चार धातुकर्म प्रकल्प व १० कोळसा खाणी होत्या. ह्यूझच्या रशियन भाषेतील उच्चारावरून या ठिकाणाला ‘यूझफ्का’ असे नाव देण्यात आले होते. ऑक्टोबर क्रांतीनंतर त्याचे स्टालिनो असे नामकरण करण्यात आले (१९२४). काही काळ हे स्टालिन या नावानेही ओळखले जाई. रशियातील स्टालिनवरून आलेली सर्व नावे बदलण्याच्या धोरणाचा भाग म्हणून १९६१ मध्ये या शहराचे सांप्रत वापरात असलेले डोनेट्स्क असे नामांतर करण्यात आले. 

  दुसर्‍या महायुद्धकाळात २१ ऑक्टोबर १९४१ रोजी जर्मन फौजांनी या शहरावर आक्रमण केले होते. ८ सप्टेंबर १९४३ रोजी सोव्हिएट फौजांनी पुन्हा त्याचा ताबा मिळविला. या दरम्यान शहराची प्रचंड हानी झाली होती. युद्धोत्तर काळात औद्योगिकीकरणाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे शहराचा भरीव व शाश्वत आर्थिक विकास घडून आला. कोळसा खाणकाम, कोकनिर्मिती, लोह-पोलाद निर्मिती उद्योगां-सारखे अवजड उद्योग, यंत्रनिर्मिती, धातु-जोडकाम, कृषी अवजारे, बांध-कामासाठीची पोलादी उत्पादने, खाणकामाची यंत्रे, खाद्यपदार्थ निर्मिती, वस्त्रोद्योग, रसायने, पादत्राणे, लाकडी सामान, प्रशीतक इ. निर्मिती उद्योग येथे चालतात.

  शहराचा विस्तार खाणींमुळे एकसंध न होता ठिकठिकाणी झालेला दिसतो. शहराचे क्षेत्रफळ सु. ४२० चौ.किमी. असून त्यात निवासी भाग, औद्योगिक विभाग व खुल्या जागा असे भाग आढळतात. येथील लोहमार्ग स्थानकापासून पोलाद उद्योगांपर्यंतचा ९ किमी. लांबीचा रस्ता मुख्य असून त्याच्या कडेने दुकाने, उपहारगृहे व प्रशासकीय इमारती आढळतात. शहरात विविध शिक्षण-प्रशिक्षण व संशोधन संस्था आहेत. त्यांत विद्यापीठ, तंत्रनिकेतन, खाणकाम प्रशिक्षण, दगडी कोळसा संशोधन, वैद्यकीय व व्यापारी संस्था आणि विविध विज्ञान संशोधन संस्थांचा समावेश होतो. डोनेट्स्कमध्ये अनेक संगीतिका गृहे असून बॅले नृत्य-प्रकार, कळसूत्री-बाहुल्यांचे खेळ, संगीत यांसारख्या सांस्कृतिक सुविधा देणारी रंगमंदिरे व संस्था आहेत. येथे भूशास्त्रीय आणि खनिजविज्ञानविषयक व इतर सांस्कृतिक वस्तुसंग्रहालये आहेत.         

चौधरी, वसंत