आकोट : अकोला जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. हे अकोल्याच्या उत्तरेस ४० किमी. अंतरावर अरुंद रेल्वेमार्गावरील स्थानक असून याचे क्षेत्रफळ २२·६१ चौ. किमी. आहे. १९७१ मध्ये येथील लोकसंख्या ४१,५३४ व साक्षरता ४९·८ टक्के होती. येथे एक ग्रंथालय व एक महाविद्यालय आहे. अकोला शहराशी हे सडकेनेही जोडलेले आहे. सरकी काढून गठ्ठे बांधने व सतरंज्या विणणे हे येथील मुख्य उद्योगधंदे असून विड्याची पाने व आंबे यांसाठी हे प्रसिद्ध आहे. नरसिंग महाराजांची यात्रा कार्तिक वद्य षष्ठीस भरते.

कुलकर्णी, गो. श्री.