रिचर्ड हॅक्लूटहॅक्लूट, रिचर्ड : (सु. १५५२–२३ नोव्हेंबर १६१६). ब्रिटिश भूगोलवेत्ता, प्रभावशाली राजकीय व्यक्ती व लेखक. हॅक्लूटचा जन्म हेरफर्डशरमध्ये झाला. त्याचे कुटुंब वेल्श मार्चेस प्रदेशातील एक खानदानी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची ईटन येथे मालमत्ता होती. हॅक्लूट पाच वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याचा सांभाळ रिचर्ड हॅक्लूट याच नावाच्या त्याच्या चुलतभावाने केला. त्याचा भाऊ मस्कव्ही कंपनीत वकील होता. त्याच्या मोठमोठ्या व्यक्तींशी ओळखी होत्या. त्याचा फायदा हॅक्लूटला झाला. शिष्यवृत्तीच्या मदतीने हॅक्लूटने वेस्टमिन्स्टर येथे प्राथमिक शिक्षण घेतले आणि १५७० मध्ये त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. तो १५७४ मध्ये पदवीधर झाला. चुलतभावाच्या प्रोत्साहनाने त्याने भूगोल विषयात पदव्युत्तर पदवी मिळविली (१५७७). त्यानंतर ऑक्सफर्डमध्येच त्याची भूगोलाचा अध्यापक म्हणून नेमणूक झाली (१५८०). तेथे आधुनिक भूगोल शिकविणारा प्रथम अध्यापक म्हणून त्यास मान मिळाला. तो आधुनिक भूगोलावर सार्वजनिक व्याख्यानेही देत असे.

 

हॅक्लूटने इंग्लिश दर्यावर्दी आणि समन्वेषक यांच्या मदतीने भौगोलिक जिज्ञासेपोटी विविध ठिकाणी प्रवास केला. या दर्यावर्दींनी लिहिलेली तेथील रहिवाशांची, प्रदेशाची आणि भूवैशिष्ट्यांची वर्णने संकलित करून ती त्याने प्रसिद्ध केली. त्याचेपहिले संकलन डायव्हर्स व्हॉयिजिस टचिंग द डिस्कव्हरी ऑफ अमेरिका, १५८२ मध्ये आणि दुसरे संकलन द प्रिन्सिपल नेव्हिगेशन्स, व्हॉयिजिस अँड डिस्कव्हरीज ऑफ द इंग्लिश नेशन (३ खंड) याची आवृत्ती १५९८–१६०० मध्ये प्रसिद्ध झाली. त्याने प्रवासवर्णने प्रकाशित केली, सामुद्रिक व्यापार आणि समन्वेषणासाठीची महत्त्वाची धोरणे प्रसृत केली. त्याचाच परिणाम म्हणजे ब्रिटिश समन्वेषकांनी उत्तर अमेरिकेतील नवनवीन भागांचा शोध घेऊन तेथे वसाहती स्थापन केल्या.

 

हॅक्लूट लंडन व्हर्जिनिया कंपनीचा सभासद होता. त्याने व्हर्जिनियातील वसाहतीच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कृतिशील पुढाकार घेतला.

 

हॅक्लूटच्या नावाने १८४६ मध्ये ‘द हॅक्लूट सोसायटी ङ्खची स्थापना करण्यात आली. तिचे मुख्य कार्य हॅक्लूटने लिहिलेल्या समन्वेषणाच्यामूळ नोंदी प्रकाशित करणे हे आहे.

 

तो लंडन येथे मरण पावला.

कुंभारगावकर, य. रा.