बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ७२,७६९ (१९८१). हे सोलापूर शहराच्या वायव्येस कुर्डुवाडी-लातूर या अरुंदमापी लोहमार्गावरील (बार्शी लाइट रेल्वे) स्थानक आहे.

 हे व्यापारी शहर, विशेषतः तूरडाळ व ज्वारी यांची मोठी बाजारपेठ, म्हणून प्रसिद्ध आहे. यांशिवाय कापडगिरण्या, कापूस कारखाने, डाळीच्या आणि तेलाच्या गिरण्याही शहरात आहेत. येथे शासनातर्फे औद्योगिक वसाहत स्थापन करण्याची योजना आहे. दर शनिवारी भरणारा बाजार, विशेषतः जनावरांचा, प्रसिद्ध आहे. बार्शी शहराला चांदणी नदीतून पाणीपुरवठा केला जातो. येथे नगरपालिका (स्था. १८६५) असून रुग्णालय, जनावरांचा दवाखाना, आयुर्वेदिक दवाखाना, भाजीमंडई यांसारख्या सुविधा उपलब्ध असून शैक्षणिक दृष्ट्या शाळा, महाविद्यालय यांचीही चांगली सोय आहे. शहरात कर्करोग निदान केंद्र आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याच्या योजना आहेत.

  बार्शीतील श्रीभगवंताचे (विष्णूचे) हेमाडपंती मंदिर उल्लेखनीय असून महाएकादशीनिमित्त (आषाढी व कार्तिकी) पंढरपूरला जाणारे वारकरी हमखास द्वादशीला या मंदिराला भेट देतात. ५४वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन येथे भरले होते (१९८०).

 कापडी, सुलभा