सौदी अरेबिया : ( किंग्डम ऑफ सौदी अरेबिया ). आशिया खंडाच्या नैर्ऋत्य टोकावरील अरबस्तान द्वीपकल्पातील राजसत्ताक देश. याचा विस्तार १६० ११’ उ. ते ३२० ९’  उ. अक्षांश व ३४० ३४’  पू. ते ५५० ४१’ पू. रेखांश यांदरम्यान आहे. याचे क्षेत्रफळ २१,४९,६९० चौ. किमी. आहे. लोकसंख्या २,७१,३६,९७७ (२०१० अंदाज ). अरबस्तान द्वीपकल्पातील सु. ८०% भाग सौदी अरेबियाने व्यापलेला आहे. याच्या उत्तरेस जॉर्डन, इराक, कुवेत, पूर्वेस इराणचे आखात, संयुक्त अरब अमिराती, कॉटार, ओमान, आग्नेयीस ओमानचा काही भाग, दक्षिणेस व नैर्ऋत्येस येमेन, पश्चिमेस तांबडा समुद्र व अकाबाचे आखात आहे. सौदी अरेबियाची संयुक्त अरब अमिराती व ओमान या देशांशी असणारी सरहद्द अजून निश्चित नाही. सौदी अरेबिया व कुवेत यांचे तटस्थ क्षेत्र (न्यूट्रल झोन) ५,७०० चौ. किमी. आहे. येथील प्रशासकीय व्यवस्था १९२२—६६ पर्यंत सौदी अरेबिया व कुवेत यांच्याकडून पाहण्यात येत होती. तदनंतर हा प्रदेश दोन्ही देशांत विभागला आहे मात्र खनिज तेल व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीच्या समुपयोजनात दोघांचा सारखाच वाटा आहे. सौदी अरेबियाच्या सरहद्दीची लांबी ७,०२७ किमी. असून यास सु. २,६४० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. रियाद ही देशाची राजधानी आहे ( लोकसंख्या ५१,८८,२८६ — २०१०). सौदी अरेबियाचा संस्थापक राजा अब्दुल अझीझ अल् सौद याच्या नावावरून यास सौदी अरेबिया असे संबोधण्यात येते.

 भूवर्णन :  सौदी अरेबिया अरबस्तान पठाराचा भाग आहे. अरबस्तान पठार पश्चिमेकडे तांबड्या समुद्रापासून पूर्वेला इराणच्या आखाताकडे उतरते आहे. पठार अग्निजन्य खडकांचे असून यावर वालुकाश्म व  चुनखडकांचे थर आहेत. सौदी अरेबियाचे भौगोलिक दृष्ट्या पाच भाग पडतात. 

  (१) पश्चिमेकडील उंचवट्याचा प्रदेश ( हायलँड्स ) : अकाबाचे आखात ते मक्केच्या दक्षिणेस सु. ३२० किमी.पर्यंतचा पर्वतीय भाग ‘ हेजॅझ ’ म्हणून ओळखला जातो. याची सर्वसाधारण उंची ६०० ते ९०० मी. दरम्यान आहे. काही ठिकाणी याची उंची १,८५० ते २,७०० मी.पर्यंत आहे. दक्षिणेकडे याची उंची कमीकमी होत जाते मात्र काही काही ठिकाणी तेथेही जास्त उंची आढळते. उदा., मदीनाच्या पश्चिमेस मौंट रदवा. तांबड्या समुद्रापासून सु. २९० ते ३२० किमी.वर सु. ३७० किमी. असीर हा पर्वतीय भाग आहे. येथे काही ठिकाणी २,७४० मी. पेक्षा जास्त उंची आढळते. येथे मौंट साव्दा हे ३,१३३ मी. उंचीचे देशातील सर्वोच्च शिखर आहे. मॉन्सून वार्‍यापासून येथे पाऊस पडतो. उत्तरेकडे हेजॅझ व दक्षिणकडे असीर या पर्वतमय भागाच्या दरम्यान तांबड्या समुद्रालगत सु. १,६०० किमी. लांबीचा अरुंद किनारपट्टीचा ( मैदानी ) भाग आहे. यास तिहामा म्हणतात. ही किनारपट्टी अरुंद व तांबड्या समुद्रास समांतर आहे. येथे अनेक खाड्या आहेत.

  (२) मध्यवर्ती पठारी भाग : हा भाग हेजॅझच्या पूर्वेस असून यास नेज्द म्हणतात. हा भाग हसापासून दाहना वाळवंटी प्रदेशाने अलग केलेला आहे. याची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमीकमी होत जाते. याची उंची पश्चिम भागात १,५२५ मी. दरम्यान तर पूर्वेकडे ६०० मी. आहे. हा भाग ज्वालामुखी लाव्हापासून बनला असून याच्या उत्तरेस शॅम्मार पर्वत व दक्षिणेस तुवाइक पर्वत आहे. येथे मरूद्याने आहेत. तेथे काही ठिकाणी शेती होते. क्वचित पाऊस पडतो व हिरवळ वाढते. यावर भटक्या अरब लोकांच्या उंट व शेळ्या-मेंढ्यांचे काही काळ पालनपोषण होते.

  (३) उत्तरेकडील वाळवंटी प्रदेश : शॅम्मार पर्वताच्या उत्तरेस हा वाळवंटी प्रदेश असून यास नफूद म्हणतात. याचे क्षेत्रफळ सु. ५७,००० चौ. किमी. आहे. हा अरबस्तान द्वीपकल्पातील दुसरा मोठा वाळवंटी प्रदेश आहे. या प्रदेशातून वाळूच्या टेकड्या आग्नेयीस दाहना या वाळवंटी प्रदेशाकडे सरकतात. दाहना या सु. २० ते ८० किमी. रुंद व सु. १,४६० किमी. लांबीच्या वाळवंटी प्रदेशाने नफूद व रब-अल्-खली हे वाळवंटी प्रदेश जोडले गेले आहेत.

  (४) दक्षिणेकडील रब-अल्-खली ( शून्यालय किंवा शून्य रण ) वाळवंटी प्रदेश : हा सौदी अरेबियातील सर्वांत मोठा वाळवंटी भाग आहे. याने सु. ६,५०,००० चौ.किमी. क्षेत्र व्यापले आहे. याच्या उत्तर भागात सरकत्या वाळूच्या टेकड्या आढळतात. हा भाग  ‘एम्टी क्वार्टर’ म्हणूनही ओळखला जातो. येमेनच्या सरहद्दीजवळ या भागाची सस.पासूनची उंची सु. ७९३ मी. असून ईशान्येकडे इराणच्या आखाताकडे ती सस.पर्यंत आहे. येथे सु. २४४ मी. उंचीच्या वाळूच्या टेकड्या आढळतात. हे वाळवंट अर् रिमल, अहकाफ, बाहर अस् शफी या विविध स्थानिक नावांनी ओळखले जाते. या वाळवंटाचा बराचसा भाग अद्याप निर्जन आहे.

(५) पूर्वेकडील खोलगट प्रदेश ( लोलँड्स ) : दाहना या अरुंद वाळवंटाच्या पूर्वेस इराणच्या आखातालगत हा भाग आहे. यास हसा किंवा ईस्टर्न प्रॉव्हीन्स म्हणतात. याची इराणच्या आखातापासूनची सरासरी रुंदी १६० किमी. असून सरासरी उंची २४० मी. आहे. याचा उतार इराणच्या आखाताकडे आहे. येथील पुष्कळशा भागात विविध आकाराचे दगडगोटे व वाळवंट आहे. येथे गाळाची मृदा, ⇨ वाडी व मरूद्याने आहेत. पूर्व भागात मिठागरे जास्त आहेत. येथे खनिज तेलसाठे मोठ्या प्रमाणात आहेत. खनिजतेल उद्योगामुळे शहरे विकसित झाली आहेत. वाडीमुळे या भागात शेती होते.

  येथे मोठी सरोवरे व मोठ्या नद्या नाहीत. तांबड्या समुद्रास मिळणार्‍या वाडी खोल व कमी लांबीच्या आहेत. यामध्ये अल हाम्द, रॅन्याह, बीशाह, अद-द्वासिर, टॅथलीथ या प्रमुख आहेत. नफूद व रब-अल्-खली वाळवंटातील वाडी वगळता पूर्वेकडील इराणच्या आखातास मिळणार्‍या वाडी लांब आणि उथळ आहेत. यांमध्ये अल्-बॅटिन व सॅहबा प्रमुख आहेत. वाडी व मरूद्यानांलगत सुपीक जमीन आढळते. 

हवामान : येथील हवामान सामान्यतः अतिउष्ण व कोरडे असते. धुळीची व वाळूची वादळे वारंवार होतात. मे ते सप्टेंबर हा कालावधी अत्यंत उष्णतेचा असतो. या कालावधीत दिवसाचे कमाल तापमान ३८० से.पेक्षा जास्त असते, काही ठिकाणी ते ५४० से.पर्यंत असते. किनारी भागात तापमान तुलनेने कमी असते मात्र हवेत दमटपणा जास्त असतो. ऑक्टोबर ते एप्रिलपर्यंतचे तापमान मध्यम असून संध्याकाळी ते १६०  से. ते २१० से. दरम्यान असते. रियाद येथे जुलैमधील तापमान ४२०  से. पर्यंत तर जानेवारीतील तापमान १४.४० से. असते व जेद्दा येथे जुलैत ३०.६० से. व जानेवारीत २२.८० से. असते. पाऊस नोव्हेंबर ते मे दरम्यान पडत असून वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९ सेंमी. असते. असीर या पर्वतीय भागात सु. २५ सेंमी. ते ५० सेंमी. मॉन्सूनचा पाऊस पडतो.

  येथे उत्तर आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशाप्रमाणे वनस्पतिजीवन आहे. देशात २००५ मध्ये २.७३ द. ल. हेक्टर क्षेत्र जंगलाखाली होते. हे एकूण जमिनीच्या १.३ % होते. येथे मोठे वृक्ष नाहीत. लहानलहान झुडुपे आढळतात. बहुतांश भागात खजूराची झाडे आहेत. सुमारे ८० प्रकारची जंगली फुले या वाळवंटी प्रदेशात दिसतात. येथे उंट, लांडगा, कोल्हा, तरस, मुंगूस, ससा, हरिण, चित्ता, घोडा, शेळ्या, मेंढ्या, गाढवे इ. प्राणी आढळतात. गरूड, घुबड, फ्लेमिंगो, पाणकोळी, बगळा, कबूतर, ससाणा, माळढोक, गिधाडे इ. पक्षी व अनेक प्रकारचे साप आढळतात. उष्णकटिबंधीय प्रदेशातील विविध प्रकारचे मासे येथे आढळतात.

  इतिहास व राज्यव्यवस्था : हजारो वर्षांपूर्वी सौदी अरेबियात अनेक भटक्या टोळ्या राहत होत्या. शहरे ही प्रामुख्याने वाळवंटातील मरूद्यानांलगत व व्यापारी मार्गांवर वसली होती. या मार्गांनी अरबस्तान द्वीपकल्प मध्य पूर्वेच्या इतर भागांशी जोडलेले होते. इ. स. पू. सु. ७०० मध्ये सबा लोक सध्याच्या नैर्ऋत्य सौदी अरेबियात व येमेनच्या पश्चिम भागात राहत होते. सबा लोक मसाल्याचे पदार्थ, धूप, सुगंधी द्रव्ये यांच्या व्यापारामुळे समृद्ध बनले होते. तसेच इ. स. पू. सु. ४०० ते इ. स. १०० पर्यंत नेबेटेइन्सचे सध्याच्या सौदी अरेबियात व जॉर्डन या व्यापारी मार्गावर आधिपत्य होते. त्यावेळी हेजॅझमधील ताइफ, मक्का, मदीना इ. शहरांचे महत्त्व वाढलेले होते.

  इसवी सन सुमारे ५७१ मध्ये इस्लाम धर्माचे संस्थापक मुहंमद  पैगंबरांचा जन्म मक्का येथे कुरैश या अरब टोळीतील एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यावेळी मक्का हे व्यापार व दळणवळणाचे केंद्र होते. मुहंमद पैगंबर हे एकेश्वरवादी होते. त्यांच्या आध्यात्मिक भूमिकेस मक्केत विरोध झाल्याने त्यांनी इ. स. ६२२ मध्ये मदिनेस स्थानांतर केले. तदनंतर त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी ६३० मध्ये मक्केचा ताबा घेतला आणि तेथील लोकांना इस्लामचा स्वीकार करण्यास भाग पाडले. मुहंमद पैगंबरांच्या मृत्यूसमयी अरबस्तानचा बहुतांश भाग मुस्लिम वर्चस्वाखाली होता. मुहंमदाच्या वारसदारांनी (खलिफा) इस्लाम धर्माने प्रेरित होऊन अरबस्तानचा पूर्व, पश्चिम व उत्तरेचा बहुतांश भाग जिंकला. तसेच पूर्व पर्शिया, स्पेन, भूमध्य सागरी प्रदेशातील बहुतांश भाग जिंकून तेथे इस्लामचा प्रसार केला. सुमारे ६६१ मध्ये मुआविया खलिफाने आपली राजधानी मदीनाऐवजी सध्याच्या सिरियातील दमास्कस येथे नेली. तदनंतरच्या काळात अरबस्तान द्वीपकल्पातील मुस्लिम साम्राज्याचे राजकीय व धार्मिक महत्त्व कमी होऊ लागले. सुमारे ७५० मध्ये मुस्लिम साम्राज्यात फुटीरवादी वृत्ती बळावून स्वतंत्रराज्ये स्थापन झाली. सुमारे १५०० मध्ये ऑटोमन तुर्कांनी हेजॅझ, असीर या अरबस्तानच्या पश्चिम भागाचा ताबा घेतला, तर १८०० मध्ये अरबस्तानच्या दक्षिण व पूर्व किनार्‍यावर ब्रिटिशांचा अंमल होता. 

सुमारे १५०० च्या मध्यास सौद राजवंशाची (शासक कुटुंब) दारिया म्हणजेच सध्याच्या रियादच्या भागावर सत्ता होती मात्र सतराव्या शतकापर्यंत यास विशेष महत्त्व नव्हते. तदनंतर सौद प्रशासक मुहम्मद इब्न सौद (कार. १७४४—६५) व वहाबी चळवळीचा प्रमुख मुहम्मद इब्न अब्दुल वह्हाब (१७०३—९२ ?) यांची एकी झाली. सौद सैन्याचा वहाबी चळवळीस पाठिंबा होता. त्यांनी वहाबी चळवळीसह राज्य विस्ताराचे धोरण अनुसरले. इब्न सौदच्या मृत्यूनंतर त्याचा वारसदार अब्दुल अझीझ (कार. १७६५—१८०३) याने व त्याचा मुलगा पहिला सौद (कार. १८०३—१४) यांनी राज्यविस्ताराचे धोरण सुरू ठेवले. दरम्यान १७९२ मध्ये वहाबी चळवळीचा प्रमुख अब्दुल वहाब दिवंगत झाला. सौदने १७९७ मध्ये कॉटार, बहारीन, ओमानचा किनारी भाग व मक्केचा काही प्रदेश जिंकला. त्याने १८०१ मध्ये नेज्द, अल् हसा व मक्का आणि १८०४ मध्ये मदीनावर कब्जा केला. याप्रमाणे सौद-वहाबी साम्राज्य अरबस्तानात दक्षिणेस येमेन-ओमानपर्यंत विस्तारले. सौद मक्का येथे मुस्लिम धर्मसभेचा इमाम म्हणून वावरू लागला.


सौद-वहाबी साम्राज्याच्या विस्तारास ईजिप्तचा ऑटोमन सुभेदार मुहंमद अलीने प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मुहंमद अली, त्याचा मुलगा इब्राहिम पाशा आणि सौद यांच्या १८११—१८ पर्यंतच्या संघर्षात सौदचा पराभव झाला. १८१४ मध्ये सौद दिवंगत झाला व त्याचा मुलगा अब्द अल्-अल्लाहला अटक झाली व तदनंतर त्याचा शिरच्छेद करण्यात आला. मुहम्मद इब्न सौदचा नातू टर्की ( १८२३—३४) याने रियाद पुन्हा जिंकले व सौद राजसत्ता सुरू झाली. १८३४ मध्ये टर्कीचा त्याच्या चुलत भावाने खून केला. त्यास टर्कीचा मुलगा फैसल (कार. १८३४—३८, १८४३—६५) याने पदच्युत करून फाशी दिली. १८४० मध्ये मुहम्मद अलीने येथून माघार घेतल्यानंतर सौद फैसलने आपली सत्ता नेज्द, अल् हसा व ओमान येथे प्रस्थापित केली.

  फैसलच्या मृत्यूनंतर सौद साम्राज्यात यादवी झाली. परिणामी साम्राज्य क्षीण झाले. अरबस्तानचा बहुतांश भाग किरगिझ टोळ्यांच्या, ऑटोमनांच्या व मुहम्मद इब्न अल्-रशीदच्या आधिपत्याखाली आला. रशीदशी झालेल्या लढाईत अब्द-अर-रहमान सौदचा पराभव झाला व तो कुवेतला निघून गेला. यावेळी ब्रिटिशांचे या भागावर लक्ष होते. त्यांनी तुर्कानुकुलनाचे आपले धोरण बदलून अरबांना उत्तेजन दिले. त्याचा फायदा घेऊन अब्द–अल-अझीझ इब्न सौद याने कुवेतच्या सैनिकी साहाय्याने रियादवर चढाई करून इब्न रशीदच्या सत्तेखालील रियाद जिंकले (१९०२). १९०६ मध्ये झालेल्या लढाईत रशीदचा वध झाला व नेज्द सौदी अंमलाखाली आले. १९१३ मध्ये सौदने अल् हसाचा ताबा घेतला. पहिल्या महायुद्धात सौद तटस्थ राहिला. १९१५ मध्ये त्याने ब्रिटिशांशी तह केला. त्यामुळे अरबस्तानचे परराष्ट्रसंबंध ब्रिटिश वर्चस्वाखाली आले. युद्ध संपताच सौदने संपूर्ण अरबस्तान आपल्या वर्चस्वाखाली आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. १९१९ मध्ये मक्का येथील शेरीफ हुसेन इब्न अलीबरोबर युद्ध झाले. यामध्ये हुसेनचा तुराबा येथे पराभव झाला. तसेच इब्न सौदचा मुलगा फैसल याने १९२० मध्ये असीरचा ताबा घेतला. सौदने १९२१ मध्ये रशीदी वंशाचा शेवटचा अमीर इब्न रशीदचा पराभव करून उत्तर अरबस्तान जिंकून घेतला परंतु यावेळी ब्रिटिशांच्या मदतीने हेजॅझच्या अमीराची मुले फैसल व अब्दुल्ला यांना इराक व ट्रान्सजॉर्डनची राज्ये मिळाल्यामुळे सौदी अरेबियाच्या उत्तर-पश्चिम सीमेवर ब्रिटिशसंरक्षित अरबी राज्ये पसरली. त्यामुळे हेजॅझ, इराक, ट्रान्सजॉर्डन व सौदी अरेबिया यांच्यात कुरबुरी होत राहिल्या.

  १९२३ मध्ये ब्रिटिशांनी या अरबी राज्यांची एक परिषद कुवेतमध्ये बोलविली होती. परंतु हेजॅझ व सौदी अरेबिया यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. सप्टेंबर १९२४ मध्ये सौदने हेजॅझवर स्वारी केली. त्याने ताइफ, मक्का, मदीना, जेद्दा इ. शहरे एकामागोमाग जिंकली. तेव्हा हेजॅझच्या हुसेनने राजत्याग करून आपला मुलगा अली यास गादीवर बसविले. इब्न सौदची सत्ता खूपच वाढल्याने ट्रान्सजॉर्डनवर इब्न सौदचा हल्ला होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी उत्तर हेजॅझमधील अकाबा व मेन हे जिल्हे व्यापले. तरीही इब्न सौदने ८ जानेवारी १९२६ ला स्वतः हेजॅझचा राजा हा किताब धारण केला. ब्रिटिशांनी इब्न सौदचा विजय मान्य केला व त्या दोघांत मे १९२७ मध्ये तह झाला. या तहामुळे इब्न सौद व ब्रिटिश यांमधील तंटा मिटला. तदनंतर इब्न सौदने आपले लक्ष देशाच्या विकासावर केंद्रीत केले. तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यात व इस्लामचे महत्त्व जतन करण्यात यशस्वी झाला. त्यास आंतरराष्ट्रीय राजकारणात मान मिळू लागला. इब्न सौदने १८ सप्टेंबर १९३२ मध्ये  इब्न, नेज्द व त्याच्या आधिपत्याखालील आश्रित दोन स्वतंत्र राज्यांचे एकत्रीकरण करून ‘ सौदी अरेबिया ’ राज्याची घोषणा केली. इब्न सौद राजा म्हणून येथील सर्वोच्च प्रमुख होता.

नव्याने स्थापन झालेले हे राज्य एकाकी व अप्रगत होते. बहुतांश जनता शेतकरी व भटकी होती. सौदी अरेबिया राज्य जाहीर झाल्यानंतर सरहद्दीवरून व अमीरच्या कुमारास सौदी अरेबिया सत्तेविरुद्ध पाठिंबा दिल्याने येमेनशी युद्ध झाले (१९३४). यामध्ये सौदी अरेबियाने विजय मिळविला. सौदी अरेबियाचा विकास प्रामुख्याने तेल संशोधनानंतर झालेला आहे. १९३३ मध्ये सौदी अरेबियाने अमेरिकन तेल कंपनीस तेल संशोधनाचे व तेल काढण्याचे हक्क दिले. ही कंपनी म्हणजेच अरेबियन अमेरिकन ऑइल कंपनी (१९४४) होय. १९३८ मध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठ्यांचा शोध लागला परंतु प्रत्यक्ष उत्पादन दुसर्‍या महायुद्धानंतर १९४५ मध्ये सुरू झाले. याच वर्षी सौदी अरेबिया संयुक्त राष्ट्र संघाचा व अरब लीगचा सदस्य झाला. 

  इब्न सौदने १९५३ मध्ये मंत्रिमंडळाची रचना केली. त्याने आपला मुलगा फैसल यास वारस नियुक्त केले. राजा इब्न सौद याचा ९ नोव्हेंबर १९५३ मध्ये मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर फैसल सत्तेवर आला व त्याचा भाऊ पंतप्रधान आणि राजकुमार झाला. इब्न सौदने सुरू केलेल्या सौदी अरेबियाच्या विकास योजनांची अंमलबजावणी फैसलने सुरू ठेवली. फैसल व त्याच्या भावांत वाद झाले तदनंतर नोव्हेंबर १९६४ मध्ये फैसल राजा झाला.

  १९६२ मध्ये येमेनमधील यादवीवेळी ईजिप्त व सौदी अरेबियात युद्ध होईल काय याविषयी भीती होती. फैसलच्या कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली. त्याने तेल कारखान्यांतून मिळणार्‍या उत्पादनातून अनेक रुग्णालये, रस्ते, शाळा, इमारती बांधल्या वाहतूक आणि दळणवळण सुधारणांत वाढ केली तसेच अरब जगतात व आंतरराष्ट्रीय घटनांमध्ये सहभाग घेण्यास प्रारंभ केला. इझ्राएल बरोबरच्या युद्धात अरब देशांना आर्थिक मदत केली. १९७३ मध्ये अरब-इझ्राएल युद्धावेळी सौदी अरेबियाने इतर अरब राष्ट्रां-प्रमाणे अमेरिका व नेदर्लंड्स या राष्ट्रांचा तेल पुरवठा तात्पुरता बंद केला. तटस्थ राष्ट्रांचा तेल पुरवठा कमी केल्यामुळे अनेक देशांत खनिज तेल टंचाई निर्माण झाली होती. परिणामी खनिज तेल किमतीत वाढ झाली. २५ मार्च १९७५ ला फैसलची त्याच्या पुतण्याने हत्या केली. तदनंतर खलिद हा राजा व फहद हा राजकुमार झाला. सौदी अरेबियात नोव्हेंबर १९७९ मध्ये जहालमतवादी सुन्नी मुस्लिमांनी मक्का मशिदीचा ताबा घेतला. शासनाने दोन आठवड्यानंतर हे बंड मोडून काढले. दुसर्‍या व तिसर्‍या पंचवार्षिक योजनांची आखणी खलीदने केली. देशाच्या आर्थिक व पायाभूत सुविधांत वाढ होण्यास पंचवार्षिक योजनांमुळे मदत झाली. खलिदचा १३ जून १९८२ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर फहद राजा व पंतप्रधान झाला. १९९० मध्ये इराकने कुवेतवर हल्ला केला, तेव्हा इराक सौदी अरेबियावरही हल्ला करेल अशी भीती होती. त्यामुळे सौदी अरेबियाने अमेरिका व इतर देशांकडून सैनिकी मदतीची मागणी केली होती. यावेळी अमेरिका व अनेक अरब राष्ट्रांनी सौदी अरेबियास मदत केली. फहदचे अमेरिकेबरोबर सलोख्याचे संबंध होते. फहद स्वतःच राजा असल्याने त्याची निरपवाद सत्ता होती तरीसुद्धा त्याने समंत्रक परिषदेची (मजलीस अल्-शूरा) स्थापना केली (१९९३). १९८६ मध्ये फहदने स्वतःस मक्का व मदीना यांचा परिरक्षक म्हणून घोषित केले. १९८७ मध्ये ४०० इस्लामी उपासक मशिदीच्या सुरक्षारक्षकांबरोबरच्या वादात मारले गेले. त्यानंतर १९९४ मध्ये चेंगरा-चेंगरीत २७० यात्रेकरू मरण पावले तेव्हा फहदवर आंतरराष्ट्रीय स्तरा-वरून टीका झाली होती. फहदने आपल्या कारकिर्दीत प्रादेशिक प्रश्नांत समन्वयाची भूमिका घेतली होती. अलिकडे पश्चिमेकडील देशांबद्दल सौदी अरेबियात असंतुष्टता प्रगट होत आहे. 

  १९९६ मध्ये दहरन येथे अमेरिकी सैनिकी तळाजवळ बाँबस्फोट करण्यात आला. त्यामध्ये १९ सैनिक मारले गेले व ३०० जखमी झाले होते. न्यूयॉर्क व वॉशिंग्टनवरील ११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्यात सौदी अरेबियाचे १५ नागरिक सहभागी होते आणि त्यांचा पाठीराखा ओसामा बिन लादेन याच देशाचा होता. मे २००३ मध्ये मानवी बाँब-स्फोटात रियादजवळ १० अमेरिकी नागरिक मारले गेले होते. एप्रिल २००३ मध्ये अमेरिकेने आपले सौदी अरेबियातील सैन्य परत घेण्याचे मान्य केले व दोन्ही देश मित्र असतील असे घोषित केले होते. १ ऑगस्ट २००५ पासून फहदच्या मृत्यूनंतर अब्दुल्ला इब्न अब्दुल अझीझ अल् सौद हा येथील राजा व पंतप्रधान म्हणून कार्यरत आहे. त्याने पूर्वीचीच धोरणे सुरू ठेवली आहेत. देशात प्रथमच नगरपालिका निवडणुका २००५ मध्ये घेतल्या गेल्या. अब्दुल अझीझ अल् सौदने २९ सप्टेंबर २०११ मध्ये २८५ नगरपालिकांच्या १,०५६ सदस्यांसाठी निवडणुका घेतल्या महिलांना निवडणुकीस उभे राहण्याचा व मतदानाचा हक्क नव्हता परंतु २५ सप्टेंबर २०११ ला २०१५ च्या नगरपालिका निवडणुकीस महिला मतदान करू शकतील व निवडणुकीसाठी उमेदवार असू शकतील असे जाहीर केले आहे.

  सौदी अरेबियात निरपवाद राजसत्ता आहे. राजा प्रमुख असून त्याच्याकडे कार्यकारी व वैधानिक अधिकार आहेत. येथे लिखित संविधान नाही. येथील राज्यकारभार व न्यायव्यवस्था इस्लाम कायद्यावर (शरियत) आधारित आहे. १ मार्च १९९२ च्या तीन राजहुकूमनाम्यांनुसार (डिक्री) मध्यवर्ती नगरपालिका व ६० संसदीय समंत्रक परिषद अशी प्रशासनाची पद्धत निश्चित केली आहे. समंत्रक परिषदेस वैधानिक अधिकार नाहीत. राजा पंतप्रधानही असतो. याशिवाय दोन उपपंतप्रधान व मंत्रिमंडळ असते. जुलै १९९७ च्या राजहुकूमनाम्याप्रमाणे समंत्रक परिषदेचे अध्यक्ष व ९० सदस्य, २००१ प्रमाणे अध्यक्ष व १२० सदस्य होते. तसेच २००५ च्या राजहुकूमनाम्याप्रमाणे समंत्रक परिषदेचे अध्यक्ष व १५० सदस्य आहेत. हे सदस्य राजामार्फत चार वर्षांसाठी नियुक्त केलेले असतात. शासन व्यवस्थे-साठी देशाचे चार विभाग व तेरा प्रांत आहेत (२००५). कायदा करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, ही जबाबदारी राजा व मंत्रिमंडळाची आहे. देशात खून, बलात्कार, शस्त्र लूटमार, घातपाती कृत्य, मादक पदार्थांचा व्यापार, जारकर्म, स्वधर्मत्याग यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.

सैनिकी सेवा ऐच्छिक आहे. अरब-इझ्राएल युद्धानंतर सैन्यदलाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संरक्षण व्यवस्थेत सु. ७५,००० व सीमा सुरक्षादलात सु. १०,५०० सैनिक होते (२००७). किंग्ज अब्द-अल्-अझीझ मिलिटरी ॲकॅडमी, रियाद येथे सेना अधि-कार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येते. रियाद, जेद्दा, जूबॅइल येथे नाविकतळ आहेत. नाविकदलात १५,५०० नौसैनिक होते (२००७). हवाईदलाचे प्रमुख हवाईतळ रियाद, धारान, हफर-अल-बॅटिन येथे आहेत. संरक्षण मंत्र्याच्या अखत्यारीत तिन्ही सैन्यदले असतात. देशातील प्रमुख ठिकाणांची व राजपरिवाराची सुरक्षा ही जबाबदारी राष्ट्रीय संरक्षण दलाकडे आहे. यामध्ये सु. १,००,००० नॅशनल गार्ड होते (२००७). 


आर्थिक स्थिती : सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने खनिज तेल व त्यासंबंधी उद्योगांवर अवलंबून आहे. ओपेकमध्ये सौदी अरेबियाचा सहभाग महत्त्वाचा आहे. पंचवार्षिक योजनांद्वारे दीर्घकालीन आर्थिक विकासाचे नियोजन आहे. पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांद्वारे (१९७०—८०) देशात प्रमुख वाहतूक व दळणवळणाच्या सुविधा जास्तीतजास्त दिलेल्या आहेत. तसेच परकीय मजूरांवरील अवलंबित्व कमी करणे अन्नपदार्थांचे देशातील उत्पन्न वाढविणे शैक्षणिक, आरोग्य सुविधा उपलब्ध करणे ही पंचवार्षिक योजनेची अन्य उद्दिष्टे आहेत. सौदी अरेबिया जगातील प्रमुख खनिज तेल उत्पादक व निर्यातदार देश आहे. आखाती युद्धानंतर देशाच्या उत्पन्नात सु. ४५% व सरकारी करात ७५% आणि निर्यातीत ९०% हिस्सा खनिज तेल व तदनुषंगिक बाबींचा होता. १९९० मध्ये वार्षिक विकासवाढीचा दर ३.१% होता. हा दर इतर आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विकसनशील देशांच्या तुलनेत चांगला होता. २००३ मध्ये खनिज तेलाच्या किंमतीतील वाढीमुळे आर्थिक विकास वाढीचा दर ७.७% होता. तसेच २००३ पासून दरडोई उत्पन्नातही वाढ झाली आहे.  

  उद्योगधंदे : खनिज तेल शोधामुळे सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल झालेला आहे. १९३८ मध्ये खनिज तेलाचा शोध लागला मात्र रास टॅनुरा खनिज तेलशुद्धीकरण कारखाना १९४५ मध्ये सुरू झाला. तदनंतर खनिज तेलाच्या वाढत्या मागणीमुळे व येथील उपलब्धतेमुळे खनिज तेल उद्योगाची वाढ झाली. अरेबियन-अमेरिकन ऑइल कंपनीने ( ॲरॅम्को ) सौदी अरेबिया-कुवेतच्या तटस्थ क्षेत्राच्या दक्षिणेस रॅस-ॲझ- -सॅफेनिया येथे १९५१ मध्ये, तटस्थ क्षेत्रात १९५३ मध्ये तेलाचा शोध लावला. तसेच अल् गवॉर या जगातील मोठ्या तेलसाठ्याचा व रब–अल्-खली भागातील तेलसाठ्याचा शोधही लागला. ॲरॅम्कोने खनिज तेल व नैसर्गिक वायू वाहतुकीसाठी पाइपलाइन टाकल्या. तदनंतर ॲरॅम्कोची पूर्ण मालकी सौदी अरेबियाने घेतली. खनिज तेलशुद्धीकरण आणि खनिज तेलावर आधारित उद्योग येथे मोठ्या प्रमाणात चालतात व त्याचा राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा जास्त आहे. तथापि सरकारने वस्तुनिर्मिती उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे या उद्योगांचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात १०.२% हिस्सा होता (२०११). या क्षेत्रात एकूण लोकांच्या सरासरी ६.४% लोक गुंतले होते (२००८). पेट्रोकेमिकल व खनिज तेल आधारित उद्योगधंदे नवीन आठ औद्योगिक शहरात केंद्रीत झालेले असून यामध्ये जूबॅइल व येन्बो ही शहरे अग्रगण्य आहेत. सौदी बेसिक इंडस्ट्रीज, अल्-रॅज ही बँक व सौदी टेलिकॉम यांचा उद्योगक्षेत्रातील सहभाग उद्योग-वाढीत महत्त्वपूर्ण आहे. उद्योगक्षेत्रातील २००१—११ च्या दशकात अंदाजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा सरासरी वार्षिक दर ३.५% होता.

  खनिजसंपत्ती : सौदी अरेबिया खनिज तेल साठ्याबाबत जगात पहिल्या क्रमांकावर असून जगातील ज्ञात एकूण खनिज तेलसाठ्याच्या एक चतुर्थांश साठे येथे आहेत. देशाच्या पूर्व भागात रब-अल्-खली वाळवंटी प्रदेश आणि इराणचे आखात या ठिकाणी खनिज तेलसाठे आहेत. येथील खनिज तेल साठा २६४.२९ बिलीयन बॅरल्स होता (२०१०). ॲरॅम्को कंपनीमार्फत सु. ९९% क्रूडतेलाचे उत्पादन घेतले जाते. खनिज तेल उत्पादन देशातील प्रमुख १४ तेलक्षेत्रांतून होते. देशात नैसर्गिक वायूचे साठे ७,५७० बिलीयन क्यु. मी. होते व उत्पादन ७८.१ बिलीयन क्यु. मी. झालेले होते (२००८). सर्वांत मोठा नैसर्गिक वायूसाठा पँकर येथील हविया येथे मिळाला (२००२). देशातील सर्वांत मोठी सोन्याची खाण महद-अल्-दहब येथे असून येथून सु. ४,४७६ किलो सोने मिळाले होते (२०१०). याशिवाय देशात लोखंड, फॉस्फेट, बॉक्साइट, युरेनियम, चांदी, टंगस्टन, निकेल, झिंक, पोटॅशियम यांचे साठेही सापडलेले आहेत. चांदीचे उत्पादन ७,६०० किग्रॅ. होते (२०१०). एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खनिजसंपत्ती पासून मिळणार्‍या उत्पन्न वाढीचा दर २००१ — ११ या दशकात सरासरी १.७% होता. 

शेती : शासनाने १९७० पासून वाळवंट लागवडयोग्य करणे, जलसिंचन योजना, जलनिःसारण, भूपृष्ठावरील पाण्याचे संरक्षण व वाळूच्या सरकण्या-मुळे निर्माण होणारे अडथळे यांवर प्रामुख्याने लक्ष दिले आहे. अविकसित जमिनींचे शेतकर्‍यांना वाटप करून तेथे संशोधन करून त्यावर विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. गहू उत्पादन, दुग्ध व कुक्कुटपालन उत्पन्न वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. देशातील एकूण कष्टकरी लोकांच्या ४.८% लोक कृषिव्यवसायात गुंतले होते (२००८). धान्य-उत्पन्नाचा एकूण उत्पादनात २% हिस्सा होता (२०११). सुमारे ३.६० द. ल. हे. क्षेत्र लागवडीयोग्य होते. त्यापैकी १,९४,००० हे. क्षेत्र कायमस्वरूपी पिकांखाली व १.६२ द. ल. हे. जमीन जलसिंचनाखाली होती (२००२). २०१० मध्ये प्रमुख शेतीमालाचे उत्पन्न खालीलप्रमाणे होते (हजार टनात) : गहू १,३००, खजूर १,०७८, टोमॅटो ४९०, बटाटे ४९५, बार्ली १८, द्राक्षे १६२, कांदे ७०. २०१० मध्ये जनावरांची संख्या पुढीलप्रमाणे (हजारांत) : मेंढ्या ५,९००, शेळ्या ३,३००, उंट १३० व कोंबड्या   १४,६०० होत्या. प्राणिज उत्पादन २०१० मध्ये पुढीलप्रमाणे होते : दूध १,९२०.६ मे. टन, मांस ७३०.६ मे. टन व मासे ९५,०६१ मे. टन (२००९). देशात औष्णिक वीजनिर्मिती केली जाते. देशात १८९.०८ अब्ज किवॉ. तास वीजनिर्मिती झाली होती (२००७).

  सौदी रियाल हे देशाचे चलन असून १ सौदी रियाल म्हणजे २० क्यूरुटा व १०० हलालाह होतात. १०० सौदी रियाल = १७.२५ पौंड =२६.६७ डॉलर = २०.६१ यूरो याप्रमाणे ३० डिसेंबर २०११ चा विनिमय दर होता. सौदी अरेबियन मॉनेटरी एजन्सी (१९५३) ही देशाची प्रमुख बँक आहे. तसेच नॅशनल कमर्शिअल बँक, अल्-रजी बँकिंग अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन व रियाद बँक या राष्ट्रियीकृत बँका आहेत. रियाद येथे शेअर बाजार आहे. खनिज तेल समन्वेषण, संरक्षणविषयक बाबी, अर्थविषयक सेवा यामध्ये गुंतवणुकीस परदेशी गुंतवणुकदारांना प्रतिबंध आहे. 

  येथून प्रामुख्याने खनिज तेल, खनिज तेल रसायने, खते, प्लॅस्टिक, गहू यांची निर्यात होते. निर्यातीत ८७% वाटा खनिज तेलाचा आहे. निर्यातही प्रामुख्याने अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, चीन, भारत, फ्रान्स या देशांना होते. आयातीत अन्नपदार्थ, यंत्रे, तंबाखू , दळणवळणाची साधने, कापड यांचा अंतर्भाव असून ती प्रामुख्याने अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, ग्रेट ब्रिटनमधून होते.

  वाहतूक व संदेशवहन : उंट वाहतुकीसाठी उपयोगात आणले जातात. तांबड्या समुद्रावरील जेद्दा ते इराणच्या आखातावरील दमाम हा रस्ता रियादमार्गे १९६७ मध्ये सुरू झाला आहे. देशात २,२१,३७२ किमी. लांबीचे रस्ते होते. त्यामध्ये १३,५९६ किमी. लांबीचे प्रमुख रस्ते, ३३,९२४ किमी. लांबीचे दुय्यम रस्ते  व २५,८४५  किमी. लांबीचे डांबरी रस्ते होते (२००७). देशात ३२,०६,६००  मोटारी, ११,२७,९०० ट्राम व व्हॅन होत्या (२००५). या देशात स्त्रियांना वाहन चालवण्याची परवानगी नाही. देशात १,४३५ किमी. लांबीचे लोहमार्ग होते (२००५). 

सागरी बंदरांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. तांबड्या समुद्रावरील जेद्दा, यान्बू, जीझॅन व आखातावरील दमाम व अल् जुबेल ही प्रमुख बंदरे आहेत. यांशिवाय अनेक लहान-लहान बंदरेही आहेत. जेद्दा हे व्यापारी व मक्केस येणार्‍या यात्रेकरूंचे प्रवेशाचे ठिकाण आहे. सौदी या राष्ट्रीय हवाई कंपनीमार्फत देशांतर्गत व देशाबाहेरील विमान वाहतूक केली जाते. रियाद, दमाम, जेद्दा, धारान येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. देशांतर्गत वाहतुकीसाठी २२ विमानतळ आहेत. 

  सौदी अरेबियात ३७,००,००० दुरध्वनीधारक व १३,३०,००० भ्रमण दुरध्वनीधारक होते (२००५). ७.८ द. ल. इंटरनेटधारक होते (२००८). १,५१७ डाकगृहे होती (२००३).

  लोक व समाजजीवन : देशात लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १२.६ होती (२०१०). जननदर दरहजारी २३.४ व मृत्यूदर ३.६ होता (२००८). बालमृत्युमान दरहजारी २१ होते (२००५). हे प्रमाण १९८०—८५ मधील बालमृत्युमान ५८ पेक्षा कमी होते. सरासरी आयुर्मान पुरुषांचे ७०.८ व स्त्रियांचे ७५.१ होते (२००७). जननक्षमता दर सरासरी प्रती स्त्री ३.१ होता (२००८). सौदी अरेबियात सु. ८१% लोक शहरी भागात रहात होते. येथे खनिज तेल क्षेत्राच्या परिसरात नव्याने शहरीकरण होत आहे.

सौदी अरेबियातील अरब लोक सेमिटिक वंशाचे आहेत. मध्य अरबस्तानातील भटक्या जमातीला प्राचीन काळी अरब हे नाव दिलेले आढळते. नंतर दक्षिणेकडे स्थायिक होऊन शेती करणार्‍यांना अरब व मध्य अरबस्तानातील भटक्या लोकांना ‘ बेदूइन ’ म्हणत. अरब धर्माने मुसलमान असून यांमध्ये ९०% लोक सुन्नी मुस्लिम व ४% लोक शिया मुस्लिम आहेत. यांशिवाय ४% ख्रिश्चन आणि १% हिंदू होते (२००१). कुराण हा येथील पवित्र ग्रंथ आहे. भटक्या लोकांचा ओढा स्थायिक होऊन शेती करणे अथवा खनिज तेल कंपन्यांत काम करणे यांकडे आहे.

  येथील बहुतेक घरे दगडाची व धाब्याची असतात. शहरात आधुनिक पद्धतीची घरे आहेत. अरबांच्या पोशाखात पुरुष पायाच्या घोट्यापर्यंत ढगळ किंवा तंग पायजमा घालतात, त्यास थोबे म्हणतात. उंच गळ्याचा व लांब बाह्याचा झगा घालतात, त्यास अबा म्हणतात. यावर ते जॅकिटही घालतात. डोक्याभोवती विशिष्ट प्रकारचे कापड गुंडाळतात, त्यास गुत्रा म्हणतात. त्याचे पदर दोन्ही खांद्यांवर रुळतील असे राखून कपाळाच्या वरच्या बाजूने काळ्या लोकरी पट्टीने हे शिरोवस्त्र बांधतात. वाळवंटी प्रदेशातील उन्हाच्या झळा व वाळूची वादळे यांपासून शिरोभागाचे संरक्षण या दृष्टीने या पद्धतीच्या पोशाखाचा उपयोग होतो. स्त्रिया लांब पायघोळ सदरा, सलवार, आखूड कंचुकी वापरतात. हा पोशाख अंगासरशी बसणारा किंवा लांबलचक व सैलही असतो. शहरी भागात पाश्चिमात्य पद्धतीचा पोशाखही वापरला जातो. दुग्धजन्य पदार्थ, खजूर, बोकडाचे मांस, भात हे पदार्थ प्रामुख्याने आहारात असतात. शहरी भागात विविध भाज्या व फळांचाही समावेश आहारात असतो. चहा, कॉफी ही आवडती पेये आहेत. येथे इस्लामच्या तत्त्वाप्रमाणे डुकराचे मांस व मद्य सेवनास प्रतिबंध आहे.


शिक्षण : सौदी अरेबियात शिक्षण ( सर्व स्तरावरचे ) मोफत आहे मात्र सक्तीचे नाही. अरबी भाषेतून शिक्षण देण्यात येत असून इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून उपयोगात आहे. शिक्षण मंत्रालय, ऑफिस ऑफ द ग्रँड मुफ्ती व सुप्रीम एज्युकेशन काउन्सिल ( स्त्रियांच्या शिक्षणासाठी ) मार्फत शिक्षणाची प्रशासकीय व्यवस्था पाहण्यात येते. शिक्षणाच्या प्रशासकीय सोयीसाठी २३ शैक्षणिक जिल्ह्यांत विभाजन केलेलेे आहे. देशातील प्रौढ साक्षरतेचे प्रमाण ८६.१% होते (२००९ अंदाज). तसेच ३,७७५ प्रौढ साक्षरता केंद्रे होती (२००५). स्त्रियांचे शाळेत दाखल होण्याचे प्रमाण १९७० मध्ये २५% होते ते २००५ मध्ये ४७.७% पर्यंत वाढले होते. स्त्रियांसाठी केवळ ८७ महाविद्यालये होती (२००६). २००९-१० मध्ये १३,६०२ प्राथमिक शाळांत २,२३,५११ शिक्षक व ३३,२१,०६६ विद्यार्थी ७,९१० इंटरमिडिअट शाळांत १,१७,३७० शिक्षक व १५,४७,०३३ विद्यार्थी ४,९०९ माध्यमिक शाळांत ९९,७५३ शिक्षक व १४,४१,४०३ विद्यार्थी होते. देशात किंग सौद युनिव्हर्सिटी, रियाद (१९५७) इमाम मुहम्मद इब्न सौद इस्लामिक युनिव्हर्सिटी, रियाद द इस्लामिक युनिव्हर्सिटी, मदीना (१९६१) किंग अब्द अझीझ युनिव्हर्सिटी, जेद्दा (१९६७) किंग फैसल युनिव्हर्सिटी, दमाम किंग फहद युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड मिनरल्स, धारान युम अल् कुरा युनिव्हर्सिटी मक्का किंग अब्द अल् अझीझ मिलिटरी ॲकॅडेमी कॉलेज ऑफ मेडिसीन इ. उच्च शिक्षणाच्या प्रमुख संस्था आहेत.

  आरोग्य : देशातील आरोग्य सेवेकडे १९७९ नंतर विशेषत्वाने लक्ष देण्यात आलेले आहे. देशात आरोग्य सेवा तुलनेने चांगल्या आहेत. देशात १,८४८ आरोग्य केंद्रे, १,०४३ खाजगी दवाखाने, ३६४ रुग्णालयांत ५१,१३० खाटांची सोय होती (२००५). तसेच ४२,९७५ फिजिशियन, ७८,५८७ परिचारिका व ४९,१६७ तांत्रिक कर्मचारी होते (२००५). यात्रेकरूंसाठी संसर्गजन्य रोग प्रतिबंधक केंद्र जेद्दा येथे आहे. येथे सु. ९१% प्रसूती प्रशिक्षित वैद्यकीय सेवेमार्फत होतात. 

देशातील बहुसंख्य लोकांची भाषा अरबी असून इंग्रजी ही दुय्यम भाषा म्हणून उपयोगात आणण्यात येते. देशात अरबी व इंग्रजी भाषेत अनेक दैनिके, साप्ताहिके प्रकाशित होतात. आकाशवाणी व दुरदर्शन प्रसारण माहिती मंत्रालयाचे अखत्यारित आहे. देशातील १३ दैनिकांचा खप १३,९७,००० प्रती होता (२००६). अशरक अल्-अवस्त हे दैनिक प्रसिद्ध असून याचा दररोजचा खप २,७२,००० प्रती होता (२००६). देशात नॅशनल लायब्ररी (१९९९) प्रमुख असून ८० हजार सार्वजनिक ग्रंथालयांत १८,८३,१२० पुस्तके होती.

देशात व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेनिस, फुटबॉल हे आवडते खेळ आहेत. १९८४ मध्ये सौदी अरेबियाच्या सौदी नॅशनल फुटबॉल संघाने आशियाई चषक जिंकला व त्याचवर्षी ते ऑलिंपिक क्रीडा सामन्यात सहभागी झाले. तसेच परंपरागत उंट, घोड्यांच्या शर्यती येथे लोकप्रिय आहेत.

खनिज तेल औद्योगिकीकरणामुळे शहरी लोकसंख्येत वाढ होत आहे. राजधानी रियाद हे सर्वांत मोठे शहर असून देशातील प्रमुख व्यापारी, शैक्षणिक व वाहतुकीचे केंद्र आहे. खनिज तेलसाठे व तदनुषंगिक उद्योगां-मुळे यास विशेष महत्त्व आहे. मक्का हे इस्लामधर्मीयांचे सर्वांत पवित्र स्थान व मुहंमद पैगंबर यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. मदीना हेही इस्लामधर्मीयांचे दुसरे पवित्र स्थान येथे असून मुहंमद पैगंबराची कबर या ठिकाणी आहे. हे शहर खजुरासाठी प्रसिद्ध आहे. त्याची येथून मोठी निर्यात होते. जेद्दा हे तांबड्या समुद्रकिनार्‍यावरील सौदी अरेबियाचे महत्त्वाचे बंदर आहे. हाज यात्रेकरूंचे तांबड्या समुद्रावरील प्रवेशद्वार म्हणून ते प्रसिद्ध आहे. दमाम, धारान, ताइफ ही अन्य महत्त्वाची शहरे आहेत. मक्का व मदीना येथील हाज यात्रेस अत्यंत महत्त्व असून सर्व धर्मशील मुसलमान एक वेळा तरी मक्का-मदीना या पवित्र शहरांस भेट देण्याचा प्रयत्न करतात. दरवर्षी लाखो यात्रेकरू येथे येतात.

गाडे, ना. स.


सौदी अरेबिया
मंत्रालय वास्तू : रियाद. राजधानी रियाद : सत्रकालीन दृश्य.
मक्का येथील मशिदीचे विहंगम दृश्य पारंपरिक वेशभूषेतील सौदी पुरुष
 धारान तेलविहीरीचे दृश्य रब्-अल्-खली वाळवंटातील तेलशुद्धीकरण प्रकल्प, शियबाह.
रब्-अल्-खली वाळवंटाचे एक दृश्य उंटांच्या शर्यती : सौदी अरेबियनांचा आवडता छंद.