अमेरिका, उत्तर : पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धातील खंड. क्षेत्रफळ २ कोटी, १५ लक्ष चौ. किमी. लोक- संख्या सुमारे ३२·०७ कोटी (१९७०). दक्षिणोत्तर विस्तार अक्षवृत्त ७ उ. (पनामा-संयोगभूमी) ते ८३ ७’ उ. (एल्झमीअर बेटाच्या उत्तर किनाऱ्यापर्यंत). पूर्वपश्चिम विस्तार रेखावृत्त १७२ २५’ पू. (अल्यूशन बेटे) ते ५३ ३२’ प. (न्यू फाउंडलंड). या खंडाच्या उत्तरेस आर्क्टिक महासागर, पश्चिमेस पॅसिफिक व पूर्वेस अटलांटिक महासागर असून दक्षिणेस पनामाच्या संयोगभूमीने हे खंड दक्षिण अमेरिका खंडास जोडलेले आहे. ईशान्ये- कडील ग्रीनलंड हे बेट काहींच्या मते या खंडाचाच भाग आहे. जगातील एकंदर भूभागाच्या सु. १६ टक्के प्रदेश या खंडाने व्यापलेला असून यामध्ये हवाई बेटे सोडून अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन बेटे व कॅनडाच्या उत्तरेकडील आर्क्टिक बेटांचा समावेश होतो. या खंडाचे पूर्व- पश्चिम जास्तीत जास्त अंतर सु. ६,४३६ किमी. असून १०० प. रेखावृत्त त्याच्या जवळजवळ मध्यावरून गेले आहे. दक्षिणोत्तर अंतर ७,२४० किमी. व आर्क्टिक प्रदेश धरून ८,५२८ किमी. आहे. वायव्य किनाऱ्याजवळ बेरिंग समुद्रात पुष्कळ लहान लहान बेटे आहेत. पॅसिफिकमध्ये ॲलेक्झांडर द्वीपसमूह, क्वीन शार्लट आणि व्हँक्‌व्हर बेटे, मध्य अमेरिकेच्या पूर्वेकडील अटलांटिक व कॅरिबियन यांच्या दरम्यान वेस्ट इंडिज बेटे, अटलांटिक किनाऱ्याजवळ न्यू फाउंडलंड, नोव्हास्कोशा, केप ब्रेटन आणि प्रिन्स एडवर्ड बेटे तसेच लाँग आयलंड (न्यूयॉर्क) हे बेट आहे.

कॅनडा व संयुक्त संस्थाने हे देश दक्षिणेकडील देशांपेक्षा सांस्कृतिक व आर्थिक दृष्ट्या बरेच भिन्न आहेत. उत्तरेकडे अँग्‍लोफ्रेंच संस्कृतींचे वर्चस्व आढळून येते, तर दक्षिणेकडे स्पॅनिश–पोर्तुगीज संस्कृतींचे प्राबल्य दिसून येते. औद्योगिक दृष्ट्याही उत्तरभाग समृद्ध आहे.

भूवैज्ञनिक रचना: उत्तर अमेरिकेतील सर्वांत जुने खडक म्हणजे कॅनेडियन ढालीचे खडक होत. या ढालीचे क्षेत्र कॅम्ब्रियन कालापासून जमीनच राहिलेले आहे. पूर्व आणि मध्य कॅनडाचे सु. ५१ लक्ष चौ.किमी.चे क्षेत्र त्यांनी व्यापलेले असून आर्क्टिकच्या किनाऱ्यापासून ते दक्षिणेकडे पसरले आहेत. हे खडक आर्कीयन म्हणजे अतिपुरातनकालीन असून त्यांच्यात ग्रॅनाइट आणि ग्रॅनाइट-नाइस हे प्रामुख्याने आढळतात. त्याच- प्रमाणे अतिप्राचीनकाळी सागरांच्या तळावर साचलेल्या गाळांचे व लाव्ह्यांचे तीव्र रूपांतर होऊन तयार झालेले खडकही जागोजागी विखुरलेले आढळतात. कवचाच्या हालचालींमुळे या सर्व खडकांच्या संरचना विक्षोभित झालेल्या आहेत. लोह, निकेल, तांबे, चांदी आणि सोने या धातूंचे उच्च दर्जाचे विपुल साठे या खडकांत सापडतात.

कॅम्ब्रियननंतरच्या निरनिराळ्या काळांत झालेल्या कवचाच्या हालचालींमुळे ढालक्षेत्राशेजारच्या भूद्रोणी- तील थरांना घड्या पडून पूर्व किनाऱ्याजवळ ॲपालॅचिअन व पश्चिम-किनाऱ्याजवळील रॉकी व इतर पर्वतरांगा तयार झाल्या त्यामुळे जमिनीच्या क्षेत्रात भर पडली. जुन्या व नव्या ॲपालॅचियन या पूर्वेकडील रांगा अनुक्रमे पूर्वपुराजीवकल्पात आणि उत्तरपुराजीवकल्पात घडून आलेल्या गिरिजनक हालचालींमुळे तयार झालेल्या असून पश्चिमेकडील रांगा मध्यजीवकल्पाच्या अखेरीस घडून आलेल्या गिरिजनक हालचालींतून उद्‌भवल्या आहेत.

पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील पर्वतरांगांच्या मध्ये पूर्वी मॅकेंझी नदीपासून मिसूरीपर्यंत व पुढे दक्षिणेकडे मिसिसिपीच्या खोऱ्यात पसरलेला उथळ सागर होता. त्या सागराच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जमिनी- वरून वाहत आलेला गाळ साचून व समुद्र भरून जाऊन तेथे सखल मैदानी प्रदेश, आजचा मध्यवर्ती मैदानी प्रदेश तयार झाला. या प्रदेशात प्रामुख्याने पुराजीवकल्पाच्या काळातले विक्षोभित न झालेले, आडवे किंवा थोडे कललेले खडकांचे थर उघडे पडलेले आहेत. त्यांच्यापैकी कार्बोनिफेरसकालीन खडकांत दगडी कोळशाचे मोठे साठे आहेत. दक्षिणेकडील पठारी मैदानाच्या प्रदेशातही पुराजीवकल्पातील खडक आहेत. त्यांच्यातही दगडी कोळसा आणि खनिज तेलाचे विपुल साठे आहेत.

मध्यवर्ती मैदानी प्रदेशात पुराजीवकल्पाच्या खडकांवर विखरून पसरलेले मध्यजीवकल्पाचे अविक्षोभित खडकही आहेत. त्याचप्रमाणे पश्चिमेकडील पर्वत-रांगांत आणि पठारी मैदानाच्या प्रदेशांतही मध्यजीवकल्पाचे खडक विस्तृत प्रमाणात आहेत. कवचाच्या हालचालींमुळे ते उंचावले गेले आहेत किंवा विक्षोभित होऊन त्यांना घड्या पडल्या आहेत.

तृतीयकालीन खडक प्रामुख्याने पूर्वकिनाऱ्यालगतच्या सखल प्रदेशात आणि रॉकी पर्वतांच्या पूर्वेच्या मैदानी प्रदेशात आढळतात.

अगदी अलीकडच्या प्लाइस्टोसीन काळातील हिमयुगात उत्तर अमेरिकेचा निम्म्याहून अधिक भाग बर्फाच्या दाट आवरणाखाली झाकला गेला होता. हिमयुगाच्या अखेरीस आणि आंतरहिमानी काळात बर्फा- च्छादन नाहीसे होत असताना हिमोढ साचून तयार झालेले पातळ थरांचे आवरण दक्षिणेकडील मिसूरी– ओहायओ रेषेपर्यंतच्या सखल प्रदेशात कित्येक जागी आढळते.

भूरचना: भौगोलिक दृष्ट्या या खंडाचे चार प्रमुख विभाग पडतात. ईशान्येकडील कॅनडाचा ढालप्रदेश, पूर्वेकडील पर्वतप्रदेश व त्याला लागून असलेला किनारी मैदानांचा प्रदेश, मध्यवर्ती मैदानी प्रदेश आणि 

पश्चिमकडील डोंगराळ व पठारी प्रदेश.

कॅनडाचा ढालप्रदेश हा अतिपुरातन प्रदेश असून उत्थान व खचण्याच्या क्रिया, क्षरण आणि हिमयुगीन घडामोडी यांमुळे त्याला आजचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याला ‘लॉरेंशन ढालप्रदेश’ अशीही संज्ञा आहे. लॅब्रॅडॉरपासून मॅकेंझी खोऱ्यापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात काहींच्या मते आर्क्टिक बेटे व ग्रीनलंड यांचाही समावेश होतो. हा बहुतेक प्रदेश सरासरीने ३० मी. पर्यंत उंचसखल असून त्यात काही अवशिष्ट शैल, काही कमी उंचीचे डोंगर व अनेक सरोवरे आढळतात. या विभागात विपुल खनिजे, जंगले व फर असणारे प्राणी आढळतात.


पूर्वेकडील पर्वतप्रदेशात सेंट लॉरेन्सपासून ॲलाबॅमापर्यंत पसरलेले ॲपालॅचिअन पर्वत (उंची सु. २,०४२ मी.) प्रमुख असून त्यांच्या पूर्वेस पीडमाँट हे डोंगरपायथ्याचे पठार व पश्चिमेकडेही लहान पठारे आहेत. ॲपालॅचियनच्या पश्चिमेस बराच डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश असून तो सरासरी १०० ते ५०० मी. उंचीचा आहे. याशिवाय लॉरेंशन पर्वत, अँडिराँडॅक पर्वत हे पूर्वभागात आहेत. या पर्वतप्रदेशाच्या पूर्वेस अरुंद वालुकामय किनारपट्टी आहे. ती दक्षिणेकडे रुंद होत जाते. येथे किनाऱ्याजवळ अनेक वाळूचे बांध, दलदली व बेटे तयार झालेली आहेत. पठाराच्या कडेवरून मैदानी प्रदेशात पडणाऱ्या अनेक लहान-मोठ्या प्रवाहांमुळे तेथे धबधब्यांची रेषा (फॉल लाइन) तयार झालेली आहे. मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावरील सखल प्रदेश जंगलमय आहे.

पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशांपैकी रॉकी पर्वत ही लांबीने जगात दुसऱ्या क्रमांकाची पर्वतश्रेणी आहे. ही अर्क्टिक महासागरापासून न्यू मेक्सिकोपर्यंत पसरलेली असून तेथून मेक्सिकोतील सिएरा माद्रे, मध्य  अमेरिकेतील पर्वतरांगा व पुढे दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत यांच्याशी जोडली गेली आहे. रॉकीच्या पश्चिमेस अलास्का पर्वतरांग (सर्वोच्च शिखर मौंट मॅकिन्ले – ६,१७८ मी.), ब्रिटिश कोलंबियाचे पर्वत, कोस्ट रेंज, कॅस्केड रेंज व सिएरा नेव्हाडा (सर्वोच्च शिखर मौट व्हिटने – ४,४१८ मी.) या रांगा आहेत. रॉकी व या रांगा यांच्या दरम्यान वायव्येचा पठारी प्रदेश, यूकॉन पठार हा ६०० ते १,५०० मी. उंचीचा प्रदेश, कोलंबिया व कोलोरॅडो पठारे, अमेरिकेचा ग्रेट बेसिन हा प्रदेश आणि काही जागृत व काही मृत ज्वालामुखी आहेत. या खंडाचे सर्वोच्च शिखर मौंट मॅकिन्ले व सर्वांत कमी उंचीचा प्रदेश डेथ व्हॅली (समुद्रसपाटीखाली ८५ मी.) हे या पश्चिम पर्वतप्रदेशातच आहेत. मेक्सिकोमध्ये सिएरा माद्रेच्या रांगांमध्ये १,२०० ते २,४०० मी. उंचीचा पठारी प्रदेश आहे. पॅसिफिकच्या बाजूस काही थोड्या जागा सोडल्यास किनारपट्टीचा सखल प्रदेश जवळजवळ नाहीच.

रॉकीच्या पूर्वेस ग्रेट प्लेन्स हा ६०० ते १,५०० मी. उंचीचा मैदानी समजला जाणारा विस्तृत प्रदेश आहे. याच्याही पूर्वेस उत्तर कॅनडातील बॅरन ग्राउंड्स व लॉरेंशन पठाराची पश्चिम बाजू असून मध्य सस्कॅचेवनच्या दक्षिणेस मध्यवर्ती मैदानाचा ६० ते ३०० मी. उंचीचा विस्तीर्ण प्रदेश मेक्सिकोच्या आखातापर्यंत पसरलेला आहे. यात दक्षिणेकडे ओझार्क व वॉशिटॉ डोंगर हेच काय ते उंच भाग आहेत. हा मैदानी प्रदेश अत्यंत समृद्ध आहे.

समुद्र, नद्या, सरोवरे इ. : या खंडाच्या उत्तरेकडे आर्क्टिक समुद्र पसरला आहे. ग्रीनलंड आणि बॅफिन बेटांच्या मध्ये बॅफिनचा उपसागर आहे. व्हिक्टोरिया आणि बँक्स बेटांच्या पश्चिमेला बोफर्ट समुद्र आहे. अलास्का आणि अतिपूर्व रशियाच्या भागांना जोडणारा सांधा म्हणजे चुकची समुद्र होय. कॅनडाच्या उत्तरेला बुथियाचे आखात, फॉक्स बेसिन, हडसन उपसागर, हडसन सामुद्रधुनी, अंगावा आखात आणि जेम्स उप- सागर आहे. कॅनडाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर पसरला असून किनाऱ्यालगतच्या भागात लॅब्रॅडॉरचा समुद्र, सेंट लॉरेन्सचे आखात, फंडीचा उपसागर आणि प्लासेंशाचे आखात आहे. संयुक्त संस्थानांच्या पूर्वेला चेसापीक व डेलावेअरची आखाते आहेत. सामान्यतः संपूर्ण पूर्व किनारा अटलांटिक महासागराने सीमित झालेला आहे. दक्षिणेकडे फ्लॉरिडाची सामुद्रधुनी व मेक्सिकोचे आखात आहे. कॅनडाच्या पश्चिमेला अलास्का- चे आखात, ब्रिस्टलचा उपसागर, जॉर्जियाची सामुद्राधुनी वगैरे लहानमोठे जलसंचय आहेत. सामान्यतः पश्चिमेला पॅसिफिक महासागर आहे. संयुक्त संस्थानांच्या पश्चिमेकडे प्यूजित साउंड असून कॅलिफोर्नियाचे आखात उत्तर-दक्षिण पसरलेले आहे.

मध्यवर्ती मैदानी प्रदेशातून येणार्‍या नद्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. संयुक्त संस्थानां- तील जवळजवळ निम्म्या भूप्रदेशावरील पाणी एकटी मिसिसिपी नदी गोळा करते. मिसूरी ही तिची प्रमुख उपनदी मध्य रॉकी पर्वतात उगम पावते. मिसिसिपी-मिसूरीची लांबी ६,२६० किमी. आहे. पूर्वेकडून तिला ओहायओ व टेनेसी या महत्त्वाच्या नद्या मिळतात. मिसिसिपी–मिसूरी नद्यांनी हा प्रदेश समृद्ध केला आहे. यूकॉन ही कॅनेडियन रॉकीपासून मध्य अलास्कापर्यंत व पुढे बेरिंगच्या सामुद्रधुनीपर्यंत वाहते. मॅकेंझी ही उत्तरवाहिनी नदी आर्क्टिक महासागरास मिळते तिला मोठ्या उपनद्या नाहीत. कोलंबिया ही रॉकी पर्वतात उगम पावून पॅसिफिकला जाऊन मिळते. कोलोरॅडो नदी ही मध्य आणि दक्षिण रॉकी पर्वतापासून कॅलिफोर्नियाच्या आखातापर्यंत वाहते. रीओ ग्रँड ही रॉकीच्या पूर्व उतारावर उगम पावून संयुक्त संस्थाने व मेक्सिको यांच्या सरहद्दींवरून वाहत जाऊन मेक्सिकोच्या आखाताला मिळते.

पूर्वेकडे कनेक्टिकट, हडसन, मोहॉक, डेलावेअर, पोटोमॅक, जेम्स, सेंट लॉरेन्स, हॅमिल्टन इ. लहान नद्या आहेत. तसेच पश्चिमेकडेही कमी लांबीच्या नद्या जास्त आहेत. पठारी प्रदेशात सॉल्ट लेकला मिळणाऱ्या नद्या अधूनमधून आढळतात.

सरोवरांमध्ये सुपीरिअर, मिशिगन, ह्यूरन, ईअरी आणि आँटॅरिओ ही महासरोवरे प्रसिद्ध आहेत.

परस्परांना ती संलग्न असून ती पुढे सेंट लॉरेन्स नदीला जोडलेली आहेत. सुपीरिअर सरोवर सेंट मेरी नदी- शी जोडलेले आहे. मिशिगन आणि ह्यूरन दक्षिणेकडे ईअरी सरोवराशी सेंट क्लेअर आणि डिट्रॉइट नदीमार्गे जोडली गेली आहेत. ईअरी सरोवर आँटॅरिओशी नायगारा नदीने जोडले गेले आहे. या नदीवर प्रसिद्ध नायगारा धबधबा आहे. १९५९ मध्ये ‘सेंट लॉरेन्स सी वे’ निर्माण झाल्यापासून अंतर्भागाशी महासागरी संबंध जोडला गेला आहे. पंचमहासरोवरांव्यतिरिक्त संयुक्त संस्थानांतील सॉल्ट लेक आणि कॅनडातील ग्रेट बेअर लेक, ग्रेट स्लेव्ह लेक, विनिपेग सरोवर वगैरे अनेक सरोवरे प्रसिद्ध आहे.

हवामान : या खंडाच्या उत्तर भागातून, कॅनडा व अलास्कामधून उत्तर ध्रुववृत्त व मेक्सिकोतून कर्कवृत्त जाते. त्यामुळे येथे हवामानाचे विविध प्रकार दिसून येतात. या अक्षांश-विस्ताराप्रमाणेच स्थानिक उंची, वारे व समुद्रप्रवाह यांचाही परिणाम हवामानावर झालेला दिसतो. बेरिंग सामुद्राधुनीपासून आर्क्टिक महासागरा- पर्यंतच्या भागात जानेवारीत –४० ते –२९ से. आणि जुलैत –१ते १०से. तपमान असते. सु. २५ सेंमी. पाऊस पडतो. या भागात बरीच हिमवृष्टी होते. याच्या दक्षिणेस अलास्का ते मध्य कॅनडा या भागात जानेवारीत –३०ते –२०से., जुलैत सु. १०ते १५से. तपमान व २५ ते ५०सेंमी. पाऊस पडतो. अलास्का ते उत्तर कॅलिफोर्निया या पॅसिफिक किनाऱ्यावर जानेवारीत उत्तरेकडे –१०ते ०से. व दक्षिणेस १०ते १५ से. आणि जुलैत सु. १०ते २०से. पर्यंत तपमान असते. येथे पश्चिमी वाऱ्यांमुळे पाऊस १०० ते २५० सेंमी. पडतो. या किनारी प्रदेशाच्या दक्षिणेस नैर्ऋत्य कॅलिफोर्नियात विशिष्ट भूमध्यसागरी हवामान आढळते. येथे सु. २५ ते ५० सेंमी. हिवाळी पाऊस पडतो. या भागाच्या दक्षिणेस संयुक्त संस्थानांचा नैर्ऋत्य भाग व मेक्सिकोचा पश्चिम भाग येथे रूक्ष, मरु-प्रदेशीय हवामान आहे. येथे २५ सेंमी. पेक्षा कमी पाऊस पडतो. पश्चिमेकडील पर्वतमय प्रदेशात तपमान व पर्जन्यमान यांत फार विविधता आढळते. तेथील ग्रेट बेसिन या भागात अवघा १०–१२ सेंमी. पाऊस पडतो. पर्वतशिखरांवर भरपूर हिमवृष्टि होते. रॉकीच्या पूर्वेच्या ग्रेट प्लेन्स भागात जानेवारीत –२० ते –१से. पर्यंत तपमान असते. उन्हाळा मात्र कडक असतो पाऊस २५ ते ५० सेंमी. पर्यंत पडतो. मध्यवर्ती मैदानात सरोवरांच्या व आग्नेय कॅनडाच्या भागात ५० ते १०० सेंमी. पाऊस पडतो. मेक्सिको-आखाताच्या किनाऱ्यावर व पूर्व किनाऱ्यावर १०० ते २०० सेंमी. पाऊस पडतो. आणि आखाताच्या किनारी भागात जानेवारीचे तपमान १० ते २०से. तर पूर्व किनाऱ्यावर उत्तरेकडे –१० ते –३५ सें. असते. जुलैमध्ये या भागात सामान्यतः २० ते ३० से. तपमान असते. मेक्सिकोच्या पठारावर पाऊस सु. २५ ते ५० सेंमी. तर तपमान सु. १७से. असते. आखाताच्या किनाऱ्यावरील काही सखल भागांत व कॅरिबियन


  प्रदेशात ३०० सेंमी. पर्यंत पाऊस व उष्णकटिबंधीय तपमान आढळते. डेथ व्हॅलीमध्ये ५६ से. पर्यंत उच्चतम तपमान नोंदलेले आहे, तर कॅनडाच्या वायव्य भागात –६१ से. पर्यंत नीचतम तपमान आढळले आहे. ॲपालॅचियन पर्वतविभागात स्थलपरत्वे ५० ते १५० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. तपमान उंचीप्रमाणे व अक्षांशा- प्रमाणे ० ते १५ से. पर्यंत असते. उत्तरेकडे काही ठिकाणी  ते ० से. इतके खाली जाते. कुरोसिवोच्या अलास्का-प्रवाह या फाट्यामुळे कॅनडाच्या पश्चिम किनाऱ्याचे हवामान पश्चिमयूरोपीय हवामानाप्रमाणे सौम्य व काहीसे ऊबदार झाले आहे, तर कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर कॅलिफोर्नियन प्रवाहामुळे हवामान काहीसे कमी ऊबदार झाले आहे. गल्फ-प्रवाहामुळे संयुक्त संस्थानांच्या आग्नेय व पूर्व किनाऱ्यांवर उन्हाळ्यात ऊबदार वारे येतात, परंतु हिवाळ्यात वारे समुद्राकडे जात असल्यामुळे प्रवाहाचा हवामानावर परिणाम होत नाही. गल्फ-प्रवाह ईशान्येस वळतो तेथे प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान सागरतळचे थंडपाणी पृष्ठभागावर येते. त्यावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील हवेवर थोडा परिणाम होतो. कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावर लॅब्रॅडॉर-प्रवाहामुळे हवामान थंड झाले आहे. न्यू फाउंडलंडजवळ थंड व ऊबदार प्रवाहांवरील हवा एकत्र येऊन वारंवार धुके पडते. ते तेथील नौकानयनास व मासेमारी-उद्योगास धोक्याचे असते. पश्चिम किनाऱ्यावर ३० ते ३५अक्षांशांच्या उत्तरेस पश्चिमी वारे वाहतात. ते पाऊस देतात व थंडीची तीव्रता कमी करतात. उष्णकटि- बंधीय भागात उन्हाळ्यात पूर्वेकडून व्यापारी वारे येतात ते भरपूर पाऊस देतात. हिवाळ्यात जास्त भारमानाचा पट्टा असल्यामुळे व उन्हाळ्यात दूरत्वामुळे व्यापारी वाऱ्यांचा फायदा न मिळाल्यामुळे मेक्सिकोचा पश्चिम भाग व संयुक्त संस्थानांचा नैर्ऋत्य भाग रुक्ष बनलेला आहे. ५०अक्षवृत्ताच्या आसपासच्या भागात पश्चिमेकडून पूर्वेकडे सौम्य आवर्ते जात असतात तर फ्लॉरिडाच्या आसपास उष्णकटिबंधीय विध्वंसक चक्री वादळे होत असतात. उत्तर अमेरिकेत डोंगररांगा दक्षिणोत्तर आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या थंड ध्रुवीय वाऱ्यांस अडविणारा पूर्वपश्चिम डोंगर नसल्यामुळे ते वारे थेट मेक्सिकोच्या आखातापर्यंत येतात व मैदानी प्रदेशातील हवा फार थंड करतात. त्यामुळे पिकांचे बरेच नुकसान होते.

मृदा: पूर्वेकडील आर्द्र भागात पेडाल्फर जमीन आढळते. लोह व ॲल्युमिनियम हे घटक मोठ्या प्रमाणात येथील जमिनीत आढळतात. जमिनीत क्षार कमी असून त्याला कारण जमिनीची होणारी धूप हे होय. पश्चिमे- कडील कमी आर्द्र व काहीशा शुष्क प्रदेशात पडोकल प्रकारची जमीन आहे. क्षार व अल्कली यांचे संचयन थराथरांत आढळते. ९८ ते १०० प. रेखांशांच्या दरम्यान म्हणजे जवळजवळ मध्यभागी प्रेअरी प्रकारची जमीन आढळते. आर्क्टिक प्रदेशाच्या सीमाविभागात टंड्रा प्रकारची जमीन आढळते. ही गोठलेली जमीन असून जमिनीचा थरही फारच कमी जाडीचा असतो. भुऱ्या रंगाची बारीक कणांची माती यात आढळते. संयुक्त संस्थानांच्या ईशान्य भागात व सेंट लॉरेन्स-खोऱ्यात भुऱ्या करड्या रंगाची पॉडझॉल जमीन आढळते. पान-  झडीचे वृक्ष विशेष असल्यामुळे सेंद्रिय द्रव्यांचा जमिनीला पुरवठा होतो. अरण्ये तोडल्यावर पहिले पीक फार उत्कृष्ट येते. तदनंतर मात्र खतांचा पुरवठा वारंवार करावा लागतो. तांबडी-पिवळी जमीन आग्नेय संयुक्त संस्थानांत आढळते. पॉडझॉल व लॅटोसल (जांभ्या खडकाच्या) मातीचे गुणधर्म प्रकर्षाने आढळतात. लोह व ॲल्युमिनियम कमी प्रमाणात आढळतात. पिवळ्या मातीची धूप मात्र येथे मोठ्या प्रमाणावर झाली आहे. किनाऱ्यालगत या जमिनीचा पट्टाच आढळतो. पाईन अरण्यांना ही जमीन पोषक आहे. अल्कलाईन अंश कमी असल्यामुळे शेती-क्षमता कमी आहे. परंतु काही खतांचा वापर केल्यास ही जमीन शेतीस योग्य ठरते. प्रेअरी जमीन पूर्वेकडील पेडाल्फर व पश्चिमेकडील पडोकल यांच्या दरम्यान आढळते. हा अरुंद पट्टा असून दाट रंगाच्या आणि सूक्ष्म कणांनी बनलेल्या या जमिनीत चुनखडीचा थर कमी आहे. ही जमीन जगातील उत्कृष्ट प्रकारची शेतजमीन म्हणून ओळखली जाते. चर्नोझम जमीन अल्बर्टा-टेक्सासपर्यंतच्या पट्ट्यात आढळते. संमिश्र उंच व खुजे गवत सर्वत्र वाढलेले असल्यामुळे जमिनीची धूप विशेष नाही. चुन्याचा थर आतील आवरणात असतो. वरच्या थरांत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण अधिक आढळते. खनिजे बरीच आढळतात. शेतीला- ही अनुकूल अशी ही जमीन आहे. चेस्टनट रंगाची जमीन ही चर्नोझमच्या पश्चिमेस आढळते. ती कमी सेंद्रिय-द्रव्ययुक्त आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीला विशेष अनुकूल नाही. तपकिरी माती ही चेस्टनट- प्रमाणेच गुणधर्म असणारी असून पावसाच्या कमतरतेमुळे तिच्यात शुष्कताच जास्त असते. कोलोरॅडोत पठारी प्रदेशात व पायथ्याजवळ ही जमीन आढळते. पाणीपुरवठ्याच्या शक्यतेवरच शेती अवलंबून असते. भुऱ्या वाळवंटी मातीचेही काही प्रदेश असून जेथे पर्जन्यमान जवळजवळ नसतेच तेथे अत्यंत कोरडी अशी ही जमीन आढळते. क्वचित इतस्ततः दिसणारी झुडपे व क्षार ही यांची वैशिष्ट्ये आहेत. जाडीभरडी जमीन शेतीस प्रतिकूल आहे.

 खनिज संपत्ती : प्राचीन समुद्रांनी उत्तर अमेरिकेचा बराच भूभाग व्यापलेला होता. त्या काळात स्तरित खडक तयार झाले आणि अशा स्तरित खडकांत तैलक्षेत्रे निर्माण झाली असावीत. आर्क्टिक समुद्रापासून खंडाच्या मध्यभागातून दक्षिणेकडे गेलेला पट्टा तेलासाठी प्रसिद्ध आहे. कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम आदी खनिजे येथे मिळतात. प्रचंड दाबामुळे धातुप्रधान खनिजेदेखील तयार झाली. त्यामुळे पश्चिमेकडील प्रदेशात खूप खनिजसंपत्ती आढळते. लोह मात्र कॅनेडियन ढालप्रदेशात विशेष आढळते. कॅनडाच्या राष्ट्रीय उत्पादनातील मोठा वाटा या खनिजांचाच आहे. मेक्सिकोमध्ये चांदी, संयुक्त संस्थानांत तांबे, सोने, शिसे, जस्त व लोखंड आढळते. उत्तर आरकॅन्सॉमध्ये बॉक्साइट, ॲलाबॅमामध्ये चांदी व क्यूबामध्ये लोह आढळते. सिमेंट उद्योगास लागणारी वाळू, गोटे, खडक सर्वत्रच आढळतात. सोने व युरेनियम मात्र त्या मानाने कमी आहे. सर्वत्र खनिज उद्योगांच्या संदर्भात वाहतुकीची जाळीच निर्माण झाली आहेत. जगातील ५२% कोळसा येथे मिळतो. अँथ्रासाईट जातीचा हा कोळसा ईशान्य पेनसिल्व्हेनियात व बिट्युमिनस कोळसा ॲपालॅचिअन प्रदेशात, आयोवा, मिसूरी, कॅनझस, ओक्लाहोमा, नैर्ऋत्य टेक्सास व मिशिगन राज्यांत आढळतो. कमी दर्जाचा कोळसा महासागरांभोवती, रॉकी पर्वताचा पॅसिफिक महासागराकडील प्रदेश, कॅनडात नोव्हास्कोशा, ॲल्बर्टा, ब्रिटिश कोलंबिया येथे आढळतो. १८५९ पासून संयुक्त संस्थानांतून पेट्रोलियमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. जगातील ४०% उत्पादन या खंडात होते. पेनसिल्वेहनिया, न्यूयॉर्क, ओहायओ, पश्चिम व्हर्जिनिया, इंडियाना, केंटकी, मिशिगन, इलिनॉय, ओक्लाहोमा, आरकॅन्सॉ, टेक्सास, कॅनझस ही राज्ये प्रमुख तेलप्रदेश गणली जातात. दक्षिण कॅलिफोर्निया, ॲलाबॅमा व मिसिसिपी, तसेच अलास्का व कॅनडात मॅकेंझीचे खोरे ही प्रसिद्ध तैलक्षेत्रे आहेत. १९१० ते १९१९ पर्यंत मेक्सिको हे जगात दुसऱ्या क्रमांकाचे तेल-उत्पादक राष्ट्र गणले होते. लोखंडाचे उत्पादन महासरोवरांच्या सभोवती विपुल प्रमाणात होते एकूण जगाच्या उत्पादनापैकी १८% उत्पादन या खंडात होते. मिनेसोटा, विस्कॉन्सिन, मिशिगन, न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, कॅलिफोर्निया व उटा ही राज्ये यासाठी प्रसिद्ध आहेत. उच्च प्रतीचे लोखंड कॅनडात सापडते. बेल बेटाजवळ न्यू फाउंडलंडचा किनारा, वायव्य महासरोवरीय प्रदेश, तसेच बर्ण्ट क्रीक (लॅब्रॅडॉर व क्वेबेक सीमा-प्रदेशाजवळ) येथेही ते सापडते. कॅनडात निकेल व कोबाल्ट, संयुक्त संस्थानांत व मेक्सिकोत व्हॅनेडियम व मॉलिब्डिनम आणि संयुक्त संस्थानांत टंगस्टन सापडते. युरेनियम मात्र कॅनडात सापडते.

वनस्पती : अगदी उत्तरेकडे टंड्राप्रदेशीय झुडुपे आहेत. त्याच्या दक्षिणेस अलास्कापासून ते थेट लॅब्रॅडॉर- पर्यंत सूचिपर्णी वृक्षांचा मोठा पट्टा पसरलेला आहे. त्यांत फर, स्प्रूस, लार्च, पाइन हे प्रमुख वृक्ष आहेत. पश्चिमे- कडील जास्त वृष्टीच्या प्रदेशात दाट व सदाहरित अरण्ये आढळतात. किनाऱ्यांवरील पर्वतश्रेणी, पॅसिफिक उतारावरील प्रदेश म्हणजेच पश्चिम उतारप्रदेश येथे डग्‍लस फर, रेड सीडार, हेमलॉक इ. इमारती लाकूड मिळते. किनारपट्टी विभागातील कॅलिफोर्निया, सिएरा नेव्हाडाचा पश्चिम उतार या प्रदेशांत रेड वूड, डग्‍लस फर, हेमलॉक, शुगर पाईन, यलो पाईन, सीडार या जातीची वनश्री आढळते. आयडाहो, माँटॅना (पश्चिम), प. वायोमिंग, कोलोरॅडो, येथे इंगलमन स्प्रूस, अल्पाईन जातींचे वृक्ष आहेत. मध्यम वृष्टीच्या टेकड्यांच्या प्रदेशांत व पूर्व उतारावर कॅस्केड, सिएरा नेव्हाडा, उत्तर रॉकीचा पश्चिम उतार, ॲरिझोनातील उंच प्रदेश येथे यलो पाईन, डग्‍लस फर, व्हाइट फर, शुगर पाईन वगैरे वृक्ष आढळतात परंतु उटा, नेव्हाडातील काही प्रदेश, न्यू मेक्सिको, ॲरिझोना व कोलोरॅडो येथे संमिश्र वनस्पती आढळते. मेक्सिकोचे पठार व पश्चिम भागातील मरु- प्रदेश येथे मरुप्रदेशीय वनस्पती आढळतात कॅक्टसच्या अनेक जाती हे येथील वैशिष्ट्य आहे. मॅक्सिकोच्या सखल किनारी प्रदेशात उष्णकटिबंधीय अरण्ये आहेत.

पूर्वेकडील भागात ॲपालॅचिअन भाग सोडून इतरत्र कठीण व मऊ लाकूड देणारी अरण्ये आहेत. मेन, अँडिराँडॅक, मिशिगन द्वीपकल्प, लेक सुपीरियर परिसर आणि ॲपालॅचियनचा अतिउंच प्रदेश येथे सूचिपर्णी वृक्षांची अरण्ये आढळतात ब्‍लॅक स्प्रूस, बालसम फर, जॅक पाईन इ. वृक्ष तेथे आढळतात. ॲपालॅचियन, ओहायओ व मध्य मिसिसिपी या प्रदेशांत कठीण लाकूड देणारी अरण्ये असून त्यांत ओक, चेस्टनट वगैरे वृक्ष आढळतात. अलीकडे जंगलकापणीमुळे बरेच नुकसान झाले आहे. आग्नेय पाईन-पट्टा हा महत्त्वाचा सूचिपर्णी वृक्षांचा प्रदेश गणला जातो. येथे गवतही आढळते. मिसिसिपीच्या उत्तर प्रवाहाशेजारची अरण्ये ही सायप्रस व गम हार्डवुड वृक्षांनी युक्त आहेत. उष्ण प्रदेशातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात खाजणे आढळतात. ग्रेट प्लेन्स व मध्यवर्ती मैदाने हे मुख्यतः गवताळ प्रदेश असून त्यांतील बराच भाग आता शेतीसाठी उपयोगात आणला जात आहे.

प्राणी: अमेरिका खंडात उत्तरेकडे अस्वले, कॅरुबू, मस्कऑक्स, कुत्रा, सील, विविध प्रकारचे पक्षी यांसारखे अतिशीतल हवामानाला तोंड देऊ शकतील असे प्राणी आढळतात तर संयुक्त संस्थानांच्या पूर्वे- कडील अर्ध्या भागात शेतीला उपयुक्त ठरणारी पाळीव जनावरे विपुल प्रमाणात असून पश्चिमेकडील अर्ध्या भागात कळपाने राहणारी जनावरे व इतर जंगली जनावरे, विशेषेकरून पर्वतराजींच्या प्रदेशात व पठारी भागावर, आढळतात. प्रेअरी विभागात अमेरिकन बायसन हे गव्यासारखे प्राणी भरपूर होते परंतु अनिर्बंध शिकारीमुळे ते आता कमी झाले आहेत. उत्तरेकडील सूचिपर्णी अरण्यांच्या प्रदेशांत सिल्व्हर फॉक्स, अर्मिन, बीव्हर, मिंक इ. फरधारी प्राणी विपुल आहेत. रॉकी पर्वतावरील शेळ्या, मेंढ्या, प्यूमा, ग्रिझली अस्वल, काळवीट व हरणे, मस्करॅट, रॅकून, ऑपोसम, साळिंदर हे विशेष प्राणी होत. उष्णकटिबंधीय मेक्सिको वगैरे भागांत इतर प्राण्यांशिवाय सुसरी व मध्य अमेरिकेत दक्षिण अमेरिकेतल्यासारखे जग्वार, आर्माडिलो वगैरे प्राणी आहेत. उत्तर अटलांटिक समुद्रकिनाऱ्यावर कॉड, हॅडॉक, मॅकेरल, हेरिंग वगैरे अनेक प्रकारचे मासे विपुल मिळातात. न्यू फाउंडलंडजवळच्या ग्रँड बँक्स, संयुक्त संस्थानांच्या किनाऱ्याजवळील जॉर्ज बँक्स ही जगप्रसिद्ध मासेमारीची क्षेत्रे आहेत. ब्रिटिश कोलंबिया व अलास्का यांच्या किनाऱ्यांवर सॅमन मासे मोठ्या प्रमाणात सापडतात. नोव्हास्कोशा व प्रिन्स एडवर्ड बेटे येथे कालवे व शेवंड भरपूर मिळतात. 

संदर्भ : 1. Carlson, Briana, North America, London, 1963.

         2. Paterson, J. H. North America, London, 1965.

         3. Pounds, N. J. G. North America, London, 1964.

खातु, कृ. का.