कामारहाटी : पश्चिम बंगालच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील शहर. लोकसंख्या १६९४०४ (१९७१). हे हुगळी नदीच्या पूर्व तीरावर, कलकत्यापासून ११ किमी. वर वसलेले असून, येथील नगरपालिकेच्या हद्‌दीत दक्षिणेश्र्वराचा बहुतांश भाग येतो. ‘राणा रासमणी नवरत्न’ या मंदिरसमूहात काली व कृष्ण देवतांची दोन सुंदर मध्यवर्ती देवळे आणि सभोवार बारा दुय्यम देवळे आहेत. याच पुण्यक्षेत्री स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा निवास असे. येथे तागाच्या व कापसाच्या गिरण्या, रबराच्या वस्तू, सिमेंट, मातीची भांडी ,रंग, कातडी कमावणे इ. व्यवसाय चालतात.

ओक, शा.नि.