ब्रात्यिस्लाव्हा: चेकोस्लोव्हाकियाच्या प. स्लोव्हाकिया विभागाची राजधानी. लोकसंख्या ३,८१,१६५ (१९७९). हे व्हिएन्नाच्या पूर्वेस ४८ किमी. वर असून ऑस्ट्रीया-हंगेरी यांच्या सरहद्दीजवळ डॅन्यूब नदीच्या तीरावर वसले आहे. देशातील प्रमुख औद्योगिक, सांस्कृतिक आणि व्यापारी शहर म्हणून तसेच डॅन्यूब नदीवरील एक प्रमुख बंदर म्हणून यास महत्त्व आहे.

या शहराला पूर्वी ‘प्रेसबुक’असे नाव होते. पुरातत्त्वीय अवशेषांवरून येथे पूर्वी केल्ट व रोमन लोकांची वस्ती होती. इ. स. आठव्या शतकात येथे स्लाव्ह लोकांनी वसाहत केली. पुढे एक व्यापारपेठ म्हणून त्याचा विकास झाला व मोरेव्हियन साम्राज्यकाळात हे एक संपन्न शहर बनले. दुसरा ओटोकार याच्या निधनानंतर (१२७८) हे हंगेरीच्या ताब्यात आले. १५४१-१७८४ या काळात हंगेरीची राजधानी येथे होती. १८०५ मध्ये ऑस्ट्रिया व फ्रान्स यांच्यातील प्रसिद्ध ‘प्रेसबुर्क तहा’वर येथेच सह्या करण्यात आल्याने यास ऐतिहासिक महत्त्व आहे. एकोणिसाव्या शतकात स्लोव्हाक लोकांचे हे केंद्र बनले. चेक व स्लोव्हाक विभागांच्या एकत्रीकरणानंतर हे चेकोस्लोव्हाकियात समाविष्ट झाले (१९१८). १९१८ ते १९३९ पर्यंत स्लोव्हाकिया प्रांताची राजधानी होती. दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९-४५) जर्मन अंमलाखालील स्लोव्हाकिया या प्रजासत्ताकाची राजधानी येथेच होती.

ब्रात्यिस्लाव्हा हे औद्योगिक केंद्र असून येथे तेलशुद्धीकरण, यंत्रसामग्री, विद्युत् साहित्य, रसायने, कापड, कागद, लाकूडकाम, अन्नप्रक्रिया, मद्यनिर्मिती इ. उद्योग विकास पावलेले आहेत. येथील कोमीनिअस विद्यापीठ (१९१९) व स्लोव्हाक ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस प्रसिद्ध आहेत. येथील संग्रहालये, नवव्या शतकातील किल्ला, सट मार्टिन्स कॅथीड्रल, फ्रॅन्सिस्कन चर्च, नगरभवन इ. प्रेक्षणीय आहेत.

लिमये, दि. ह.