छोटा नागपूर : पूर्व भारतातील एक पठारी प्रदेश व बिहार राज्याचा एक प्रमुख विभाग. बिहारचा दक्षिणेकडील डोंगराळ भाग धरून प्रामुख्याने यात पालामाऊ, हजारीबाग, धनबाद, रांची, मानभूम आणि सिंगभूम या जिल्ह्यांचा समावेश होत असून रांची हे मुख्य ठिकाण आहे. या विभागाचा आकार आयताकृती असून क्षेत्रफळ सु. ६५,४४२ चौ. किमी. आहे. यापैकी सु. ३६% प्रदेश जंगलव्याप्त आहे. गंगा, शोण आणि महानदी यांच्या खोऱ्यात हा प्रदेश पसरलेला असून पावसाच्या पाण्यावर येणारे भाताचे पीक हे येथील मुख्य पीक आहे. मका, तेलबिया, डाळी, बटाटे वगैरे इतर उत्पन्ने आहेत. जंगल उत्पादनात लाकडाचे विशेषतः साल वृक्षांचे उत्पन्न भरपूर प्रमाणात होते. तसेच जंगली लाखेच्या बाबतीत जगातील मुख्य उत्पादक म्हणून छोटा नागपूरचा उल्लेख केला जातो. शिवाय टसर रेशीम, मोहाची फुले (खाण्यासाठी व देशी दारू बनविण्यासाठी) यांचेही उत्पादन होते. 

हा प्रदेश ग्रॅनाइटी खडकांचा बनलेला असून अनेक खनिजांनी युक्त असल्यामुळे साहजिकच येथे अवजड उद्योगधंद्यांचे एकत्रीकरण झालेले आढळते. भारतातील निम्मे कोळसाउत्पादन येथे होत असून हा कोळसा उत्तम प्रतीचा आहे. हजारीबाग जिल्हा हा जगातील अभ्रक उत्पादनापैकी एक प्रमुख भाग असून शिवाय लोखंड, तांबे, मँगॅनीज, क्रोमाइट, चिनी माती, चुनखडक, कायनाइट, बॉक्साइट इ. खनिजेही सापडतात. अल्प प्रमाणात रेडियम व युरेनियमही सापडते. या खनिज संपत्तीमुळे जमशेटपूर येथे लोखंडाचा, तांबे काढण्याचा व केओलिनपासून ॲल्युमिनियम तयार करण्याचा कारखाना, सिंद्री येथे रासायनिक खतांचा, डालमियानगर येथे सिमेंट व कागद कारखाना, गोमिया येथे दारूगोळ्याचा, बोकारो येथील औष्णिक विद्युत् निर्मिती केंद्र (दामोदर खोरे प्रकल्पाचा एक भाग), जपला येथील सिमेंट कारखाना अशा अनेक उद्योगधंद्यांनी या विभागाचा आर्थिक विकास घडवून आणला असून त्यामुळे जमशेटपूर, दुर्गापूर, राउरकेला, भिलाई इ. शहरे अल्पावधीतच प्रसिद्धीस आली.

 पारसनाथ वा पार्श्वनाथ हे जैनांचे पवित्र यात्रास्थान (सु.१,३७२ मी. उंच) येथेच असून त्या टेकडीवर अनेक जैन मंदिरे आहेत.

 या विभागाजवळूनच ग्रँड ट्रंक रोड जात असून रेल्वे आणि रस्ते यांनी हा विभाग कलकत्ता, पाटणा यांच्याशी जोडलेला आहे. तसेच दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील प्रमुख शहरांशीही जोडलेला आहे.

 दऱ्या, टेकड्या आणि जंगले यांनी युक्त असलेल्या या विभागात अजूनही अनेक आदिवासी आढळतात. हजारीबाग, मानभूम व सिंगभूम येथे संथाळ रांची आणि सभोवतालच्या प्रदेशात ओराओं, मुंडा सिंगभूम, मानभूम येथे गोंड, हो इ. जमाती आढळतात. त्यांची स्वत:ची स्वतंत्र बोली असली, तरी लिपी मात्र नाही. स्वातंत्र्योत्तर काळात यांचा आर्थिक, शैक्षणिक बाबतींत विकास होत आहे.

 कापडी, सुलभा