रावळपिंडी : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील याच नावाच्या विभागाचे व जिल्ह्याचे मुख्यालय, देशाची भूतपूर्व अंतरिम राजधानी (१९५९ – ६७) व चौथ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ९,२८,००० (१९८१ अंदाज). हे शहर पोटवार पठारावर सस. पासून सु. ५३० मी. उंचीवर इस्लामाबादच्या नैर्ऋत्येस १४ किमी. अंतरावर लेह नाल्याकाठी वसले आहे.

रावळपिंडी

रावळनामक साधूंच्या एका समुदायाने (त्यावरून रावळपिंडी) वसविलेल्या एका जुन्या स्थानावरच सांप्रतचे शहर उभारण्यात आले आहे. शहराच्या छावणी भागातील काही प्राचीन भग्नावशेषांवरून हे शहर म्हणजे ख्रिस्तपूर्व काळातील भट्टी जमातीने वसविलेले ‘गाजीपूर’ अथवा ‘गजनीपूर’ असल्याचे मानले जाते. चौदाव्या शतकात मंगोल टोळ्यांनी उद्ध्वस्त केलेल्या ह्या शहराची गाखर जमातप्रमुख झंदाखान याने पुनर्रचना करून त्याला सांप्रतचे नाव दिले. मिल्खासिंग या एका शीख सरदाराने १७६५ मध्ये रावळपिंडीवर ताबा मिळविल्यानंतर शहराचे महत्त्व वाढले. १८४९ मध्ये ब्रिटिशांनी रावळपिंडी काबीज केले. ८ ऑगस्ट १९१९ रोजी याच शहरात इंग्रज व अफगाण प्रतिनिधींनी शांतता तहावर स्वाक्षऱ्या करून इंग्रज-अफगाण युद्धसमाप्तीची घोषणा केली. ग्रेट ब्रिटनने या तहानुसार अफगाणिस्तानचे पूर्ण स्वातंत्र्य मान्य केले. ब्रिटिश अंमलात प्रशासन, दळणवळण व लष्करी ठाणे या दृष्टींनी उत्तर पंजाबचे तसेच काश्मीर खोऱ्याकडील निर्गममार्गाचे प्रमुख ठाणे म्हणून रावळपिंडीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. इस्लामाबाद या पाकिस्तानच्या नवीन राजधानीची उभारणी चालू असताना काही काळ (१९५९ – ६७) रावळपिंडी ही देशाची अंतरिम राजधानी घोषित करण्यात आली होती.

लेह नाल्यामुळे रावळपिंडीचे शहर व कँटोनमेंट असे भाग पडलेले असून मुरी रस्त्यावर एक अनुजीवी नगरी (सॅटेलाइट टाउन) वसविण्यात आली आहे. काश्मीरला जाणाऱ्या मार्गावरील प्रारंभस्थान म्हणून तसेच पेशावर, लाहोर व कराची या शहरांना मुख्य राजमार्ग, लोहमार्ग व हवाईमार्ग यांनी जोडलेले हे शहर व्यापार व उद्योग यांच्या दृष्टींनीही महत्त्वाचे आहे. शहरातील प्रमुख उद्योगांमध्ये रेल्वे एंजिने, वायू, पादत्राणे, कातडी वस्तू, मृत्पात्री, वृत्तपत्री कागद, तंबू, रसायने, लष्करी साहित्य, फर्निचर इत्यादींचे निर्मितिउद्योग असून त्यांशिवाय खनिज तेल शुद्धीकरण कारखाना, लाकूडकापणी गिरण्या, लोखंडाच्या ओतशाळा, आसवन्या, कापड व विणमाल गिरण्या आहेत.

शहरात १८६७ पासून नगरपालिका असून तंत्रनिकेतन, पोलीस प्रशिक्षण संस्था, लष्करी वैद्यकीय महाविद्यालय, पंजाब विद्यापीठाशी संलग्न अशी सहा महाविद्यालये इ. शैक्षणिक सुविधा आहेत. पाकिस्तानी भूसेनेचे मुख्यालयही येथेच आहे. जवळच असलेल्या राजधानी प्रदेशातील कुरांग नदीवर बांधण्यात आलेल्या रावळ धरणामुळे (१९६१-६२) सु. ४,००० हे. क्षेत्र ओलिताखाली आले असून या धरणाद्वारा रावळपिंडी व इस्लामाबाद या दोन्ही शहरांना प्रतिदिनी सु. ५·३० कोटी लि. पाणीपुरवठा करण्यात येतो. शहरात अयूब राष्ट्रीय उद्यान, लियाकत उद्यान ही उद्याने असून जंगनिफाक ही दोन उर्दू दैनिके येथून प्रसिद्ध होतात.

रावळपिंडीमध्येच पाकिस्तानच्या दोन नेत्यांचा (पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अलीखान यांची १९५१ मध्ये हत्या व आठवे पंतप्रधान झेड्. ए. भुट्टो यांना १९७९ मध्ये फाशी) शेवट झाला.

गद्रे, वि. रा.