ग्वेजो : दक्षिण चीनचा एक प्रांत. क्षेत्रफळ १,७३,९९८ चौ.किमी. लोकसंख्या सु. २ कोटी (१९६८ प्रकटन) राजधानी ग्वेयांग. याच्या दक्षिणेस ग्वांगसी, पुर्वेस हूनान, उत्तरेस सेचवान व पश्चिमेस युनान प्रांत आहेत. सु. १,०७० मी. उंचीवरील या डोंगराळ व पठारी प्रदेशात वू, हो व युआन या मुख्य नद्या असून चुनखडकाच्या टेकड्यांचे उंच सुळके, गुहा, दाट वने व दऱ्याखोरी यांमुळे सृष्टिसौंदर्य चित्तवेधक आहे. टेकड्याटेकड्यांमधील सखल भागात थोडीबहुत शेती होते. गहू तांदूळ, मका, थोडा चहा व रेशीम पैदा होतात. जंगलात दक्षिणेकडे कापूर, दालचिनी, तुंग तेल व लाख आणि उत्तरेकडे ओक, पाइन, फर आणि अक्रोड यांचे लाकूड मिळते. पारा हे येथील मुख्य खनिज होय. ग्वेयांगहून इतरत्र विमाने जा-ये करतात परंतु नद्या व अलीकडील थोडेसे लोहमार्ग व सडका यांचा उपयोग अपुरा पडतो. झूनी, आन्‌शुन, शिंग्यी, तुयुन, जन्‌यूवान इ. शहरे विकसत आहेत. चिनी लोक बहुसंख्य असून ते शहरवासी आहेत. ग्रामीण भागात मिओ व इतर अऱ्हान आदिवासी जमाती आहेत. त्यांची कलाकुसर विख्यात आहे.              

                                                              

ओक, द. ह.