आळंदी : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र.हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात, पुण्याच्या उत्तरेस २१ किमी., इंद्रायणीकाठी वसलेले आहे. क्षेत्रफळ ४·२ चौ.किमी. लोकसंख्या ४,८७० (१९७१). शहरात नगरपालिका असून प्राथमिक व माध्यमिक शाळा, ज्ञानेश्वरी विद्यापीठ, अनेक मठ व धर्मशाळा, दवाखाने, ग्रंथालय इ. आहेत.

शिवपीठाचे ठिकाण व पुराणात वर्णिलेले सिद्धक्षेत्र म्हणून आळंदीची ख्याती होती. इंद्रायणीच्या पात्रात सिद्धबेट नावाचे स्थान आजही दाखविले जाते. ज्ञानेश्वरांनी येथे समाधी घेतल्यामुळे आळंदीचे महत्त्व आणखी वाढले. भाविकांनी येथे धर्मशाळा बांधल्या. कार्तिकी व आषाढी एकादशीस, तुकारामबीजेस आणि अधिक मासात येथे मोठ्या यात्रा भरतात. इंद्रायणी नदी व ज्ञानेश्वरांची समाधी यांशिवाय येथील गणपती, मुक्ताबाई, सिद्धेश्वर इत्यादींची मंदिरे, अजानवृक्ष व सोन्याचा पिंपळ, अनेक सिद्धपुरुषांची समाधिस्थाने व चांगदेव भेटीला आला असता ज्ञानेश्वरांनी चालविलेली भिंत इ. स्थळांना भाविक लोक भेट देतात. कार्तिकीस सुमारे दोन लाख तर इतर वेळेस १५ ते ५० हजारांपर्यंत लोक येथे जमतात. पुण्याहून येथे जाण्यासाठी वाहने मिळतात. या आळंदीला देवाची आळंदी असेही म्हणतात.

शाह, . रू.