हिमानी क्रिया : हिमनदीच्या संक्रमणाद्वारे किंवा वाटचालीद्वारे भूपृष्ठाच्या कोणत्याही भागात फेरबदल होण्याला हिमानी क्रिया म्हणतात. हे फेरबदल मुख्यतः हिमनादेय झीज किंवा निक्षेपण म्हणजे भर (साचण्याची क्रिया) यांमुळे घडतात. एखाद्या भागात ज्या सर्वांत खालच्या मर्यादेपर्यंत हिमनदीचा विकास होतो, तिला हिमानी क्रियेची सीमा म्हणतात. अशा भागाला हिमानी क्रिया झालेला भूप्रदेश म्हणतात. अशा प्रकारे हिमनदीची रचना, तिची वाहण्याची गती आणि काही कालांतराने मागे हटत जाऊन एका जागेवर स्थिर होणे या तिच्या क्रिया म्हणजे हिमानी क्रिया होत.प्लाइस्टोसीन काळात ज्या वेळी बहुतेक खंडांचा जास्तीत जास्त भूभाग हिमाच्छादित झाला होता, त्या वेळी हिमानी क्रिया मोठ्या प्रमाणात व व्यापकपणे होत होती. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात हिमनद्यांनी जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ १४.९ द. ल. चौ. किमी. क्षेत्र व्यापलेले होते. त्यांपैकी मोठ्यात मोठी दोन हिमाच्छादित क्षेत्रे ही पृथ्वीच्या ध्रुवांजवळ असून त्यांपैकी एक अंटार्क्टिका आहे. अंटार्क्टिकावरील बर्फाचा थर सु. १.६ किमी. जाडीचा आहे. जगातील शुद्ध पाण्याच्या एकूण साठ्याचा फार मोठा भाग येथे आहे. अंटार्क्टिकाच्या किनाऱ्यावर प्रतिवर्षी ३०–६० सेंमी. हिम पडते. तसेच बर्फाचे प्रचंड थरावर थर साचतात. सपाट माथ्यावरील मोठमोठेहिमनग सुटून वा तुटून समुद्रात येतात. त्याचे क्षेत्रफळ सु. १५० घ. मी. पर्यंत असते.

पृथ्वीवरील दुसरे हिमाच्छादित क्षेत्र ग्रीनलंडजवळ आहे. ग्रीनलंडच्या मध्यवर्ती प्रदेशात काही बर्फाच्छादित ठिकाणी बर्फाची उंची ३,००० मी.पर्यंत आहे. त्याची जास्तीत जास्त जाडी २,००० मी. आहे, तर सरासरी जाडी १,५०० मी. आहे. बाकीचे शिल्लक असलेले सु. ७,००,००० चौ. किमी. क्षेत्र हिमनद्यांनी व्यापलेले आहे.

अंटार्क्टिका, ग्रीनलंड, अलास्का आणि कॅनडाच्या काही भागांत अद्याप खंडांतर्गत हिमानी क्रिया चालू आहेत. या प्रदेशांमध्ये शतकाहून अधिक काळापासून शेकडो मी. जाडीचा हिमसंचय होत आहे आणि सतत वर साचत असलेल्या हिमाच्या वजनाने सदर प्रचंड ढीग हळूहळू उतारावरूनपुढे सरकत असतो. हिमनदी ज्या भागातून वाहते तेथील खडक खरवडले गेल्यामुळे त्यांना झिलई व गुळगुळीतपणा आलेला असतो. हवामानातील बदलामुळे जेव्हा हिमनदी वितळण्यास सुरुवात होते, तेव्हा तेथे हिमनदीच्या प्रवाहाबरोबर वाहत आलेले दगड, गोटे, गाळमाती इ. एकत्र साचल्यामुळे तयार होणाऱ्याहिमोढांचे घनफळ मोठे असते. पर्वतीय हिमानी क्रिया सध्या अनेक भागांत पहावयास मिळतात. हिमनदीचा उगमहिमगव्हरामध्ये झालेला असतो. या हिमनद्या स्वतःच्या वजनाने उताराच्या बाजूने वाहतात. सोबत आजूबाजूचे त्यांच्यात गोठलेले खडक गोळा करतात. पर्वतप्रदेशात उतारावरून हिमनदी वाहत असताना जर हवामान उबदार झाले, तर हिमनदी वितळत असते. त्या वेळी पर्वतीय प्रदेशात विविध प्रकारची भूस्वरूपे तयार होतात. जर हिमनदी महासागरास पोहचली, तर ती ‘यू’ आकाराची दरी तयार करते आणि तिची खोली समुद्रसपाटीच्या खाली असते. बर्फ वितळल्यानंतर तो खळगा समुद्राच्या पाण्याने भरून जातो. तसेच काही ठिकाणी बर्फाचे प्रचंड कडे समुद्रात कोसळून हिमनग तरंगू लागतात. 

पुष्कळशा हिमनद्या गुरुत्वाकर्षणामुळे दिवसातून काही सेंमी.च पुढे जातात आणि हवामानाच्या बदलानुसार हिमनदीची वाहण्याची गती स्थिर होत असते. जमिनीची धूप (झीज) करणाऱ्या घटकांपैकी हिमनदी हा प्रमुख व प्रभावी घटक आहे आणि हिमनदीने झीज केलेल्या जमिनीवरील भूस्वरूपे ठळकपणे उठून दिसतात. स्वित्झर्लंडमधील मॅटरहॉर्न हे अणकुचीदार शिखर, कॅलिफोर्नियातील सिएरा नेव्हाडा पर्वतातील यू आकाराची दरी योसेमिटी तसेच नॉर्वेमधील फ्योर्ड प्रकारचा ४०,००० किमी. लांबीचा दंतूर किनारा ही हिमानी क्रियेची उदाहरणे आहेत.

प्लाइस्टोसीन हिमकालात कॅनडाचा बराचसा भाग बऱ्याच काळापर्यंत हिमाच्छादित होता. पुढे कालांतराने तेथील हिमप्रवहण नाहीसे झाले, तरी तेथील पूर्वीच्या हिमानी क्रियेमुळे नवीन भूविशेष अस्तित्वात आले. त्यांमध्ये रुंदावलेल्या दऱ्या, गाळमातीचे उंचसखल प्रदेश, ठिकठिकाणी पसरलेले दगडमातीचे हिमोढ, सरोवरे, नद्यांच्या मूळ प्रवाहात झालेले बदल व नद्यांच्या मार्गावरील धबधबे हे सर्व ⇨ हिमकालात झालेल्या हिमानी क्रियेचे परिणाम होत.

पहा : हिमकाल; हिमगर्त; हिमगव्हर; हिमनग; हिमनदी व हिमस्तर; हिमलोट; हिमविदर; हिमस्थगिरी; हिमोढ.

कुंभारगावकर, य. रा.