पानशेत : पुणे जिल्ह्यातील वेले (वेल्हे) तालुक्यातील अंबी या मुठेच्या उपनदीवरील गाव (लो. ५५-१९७१) व खडकवासला प्रकल्पातील एक प्रमुख धरण. ते पुण्याच्या नैर्ऋत्येस सु. ४० किमी. असून पुणे शहराला व जिल्ह्यातील शेतीला तेथून पाणीपुरवठा केला जातो.

पानशेत धरणखडकवासला धरणातील पाण्याचा राखीव साठा वाढविण्यासाठी त्याच्या वरच्या बाजूस खडकवासला प्रकल्पाद्वारे मुठा नदीच्या उगमाकडील अंबी व मोसी नद्यांवर अनुक्रमे पानशेत व वरसगाव येथे दोन मातीची धरणे बांधण्याचे आणि खडकवासला धरणाचे मजबुतीकरण करण्याचे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस ठरविण्यात आले. या प्रकल्पातील पानशेत धरणाच्या कामास १९५७ मध्ये सुरुवात झाली. हे धरण पूर्ण होत असतानाच १२ जुलै १९६१ रोजी फुटल्याने मुठा नदीच्या खालच्या भागात प्रचंड पूर आला. पुणे शहराला याचा जबर तडाखा बसून शहर व परिसरातील ५,०५३ घरांना व ५५,०७६ लोकांना त्याची झळ पोचली. १९७२ मध्ये धरणाची पुनर्बांधणी करण्यात आली. धरणाली लांबी ८२३ मी. व उंची ६०.०५ मी. असून याच्या ‘तानाजी सागर’ जलाशयाची पाणी साठविण्याची कमाल क्षमता ३०.४ कोटी घ.मी. व विद्युत्निर्मितिक्षमता १० मे. वॉ. आहे. यातील पाणी खडकवासला धरणात सोडून तेथून एकूण १६१ किमी. लांबीचे दोन कालवे काढण्यात येणार आहेत. १९७५ पर्यंत १३९ किमी. लांबीच्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे एकूण जलसिंचन क्षेत्र ६४,७५२ हेक्टर आहे.

फडके. वि. शं. चौंंडे, मा. ल.