मीगॅस्थिनीझ : (इ. स. पू. सु. चौथे शतक). भारतात आलेला एक ग्रीक इतिहासकार व मुत्सद्दी. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. तो मूळचा आयोनीय-ग्रीक असून अलेक्झांडरचा उत्तराधिकारी पहिला सेल्युकस निकेटर याने त्याला चंद्रगुप्त मौर्याच्या राजदरबारी पाटलिपुत्र (पाटणा) येथे राजदूत म्हणून पाठवले (इ. स. पू. ३०२). त्याने पाटलिपुत्रच्या आसपासच्या मगध प्रदेशात आणि उत्तर हिंदुस्थानात प्रवास करून माहिती जमविली आणि तो वृत्तांत चार भागांत इंडिका या नावाने संकलित केला. त्याचा मूळ ग्रंथ कालौघात नष्ट झाला असला, तरी नंतरच्या स्ट्रेबो, ॲरियन, प्लिनी, टॉलेमी, प्लूटार्क, जस्टिन, डायोडोरस इ. अभिजात ग्रीक-लॅटिन लेखकांनी त्यांतून घेतलेल्या अवतरणांच्या व माहितीच्या रूपानेच त्यातील काही भागाची माहिती मिळते. ही सर्व माहिती जॉन माक्रिंडल या आधुनिक इतिहासकाराने संगृहित केली आहे. यावरून भारत समृद्ध असून गुलामगिरी, दुष्काळ, असत्प्रवृत्ती यांचा त्यावेळी अभाव होता आणि चोऱ्या क्वचितच होत असत, अशी माहिती नोंदविली आहे. यात काहीशी अतिशयोक्ती असली आणि त्याची सर्वच माहिती अचूक नसली, तरी मौर्यकालाविषयी माहिती देणारा एक ऐतिहासिक साधनग्रंथ म्हणून त्याचे मूल्य वादातीत आहे.

देशपांडे, सु. र.