टाँगा : फ्रेंडली बेटे. द. पॅसिफिकमधील एक संसदीय राजसत्तेचा स्वतंत्र द्वीपसमूह. क्षेत्रफळ ६९७ चौ. किमी. लोकसंख्या ८७,४०६ (१९७०). हा १५० हून अधिक बेटांचा समूह फिजीच्या पूर्वेस व सामोआच्या दक्षिणेस सु. १५° द. ते २३° ३०’ द. व १७३° प. ते १७७° प. यांदरम्यान असून त्यात दक्षिणेकडील टाँगाटापू, मध्यातील हापाई आणि उत्तरेकडील व्हाव्हाऊ हे तीन प्रमुख गट आहेत. त्यात निउआ, कोटू, नोमूका, ओटूतोलू यांचाही समावेश असून शिवाय उत्तरेची नीऊआफॉओ, न्यूआटॉबूटाबू, टाफाही आणि इतरही काही बेटे टाँगातच आहेत. टाँगाटापूवरील देशाचे मुख्यबंदर नूकूआलोफा (लो. २५,०००) ही राजधानी आहे.

भूवर्णन : या बेटांच्या सामान्यतः दक्षिणोत्तर गेलेल्या दोन रांगा असून पश्चिमेकडील रांगेतील बेटे उंच डोंगराळ आणि ज्वालामुखीजन्य आहेत. काऑ हे १,०३० मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. पूर्वेकडील बेटे उत्थित, प्रवाळी चुनखडकाची किंवा सागरी ज्वालामुखीजन्य गाळाच्या चुनखडकयुक्त थरांची आहेत. काही बेटांवर व जवळच्या समुद्रतळावर जागृत ज्वालामुखी असून वारंवार भूकंप होतात. सागरी ज्वालामुखी स्फोटाचे वेळी एखादे लहानसे बेट पाण्यातून वर येऊन पुन्हा पाण्याखाली गेल्याचीही उदाहरणे आहेत. टाँगाच्या पूर्वेस पॅसिफिक एकदम खोल असून तेथील ‘ टाँगाडीप’ या सागरी गर्तेची खोली १०,८८२ मी. आहे.

येथील हवामान सामान्यतः सौम्य व आरोग्यदायक आहे. जुलैचे सरासरी तपमान १०° से. व जानेवारीचे ३२° से. असते. वार्षिक सरासरी तपमान दक्षिणेकडे २३° से. व उत्तरेकडे २७° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान दक्षिणेकडे १६० सेंमी. व उत्तरेकडे २१८ सेंमी. असते. वारे आग्नेयीचे असून नोव्हेंबर ते मार्चपर्यंत वादळेही होतात.

मृदा लाव्हाजन्य आणि चुनखडीयुक्त असून बहुतेक सर्वत्र चांगली सुपीक आहे. येथे खनिजे आढळलेली नाहीत  तथापि तेलासाठी संशोधन चालू आहे. येथे उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय वनस्पती विपुल असून मूळचे प्राणी मात्र थोडेच आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : टाँगातील लोक सामोआतून येथे आले असे समजले जाते. दहाव्या शतकात येथे तुई टाँगा राजघराण्याची सत्ता चालू झाली व ती शतकानुशतके चालू राहिली. १६१६ मध्ये याकॉप लमेर व स्खाउटेन हे डच नाविक टाँगाच्या काही बेटांवर आले होते. तथापि १६४३ मध्ये आबेल टास्मानने तेथे मुक्काम केला होता. कॅप्टन कुक मात्र १७७३, ७४ व ७७ मध्ये आला व येथील लोकांशी मैत्री करून त्याने बेटांस ‘फ्रेंडली’ हे नाव दिले. १७९७ मध्ये काही मिशनरी आले होते परंतु तेथील यादवीत तिघे मारले जाऊन बाकीचे परत गेले. १८२२–२३ मध्ये वेस्लेय मिशनची येथे स्थापना झाली. १८३१ मध्ये टौफाआहाऊ हा हापाईचा प्रबळ सत्ताधारी ख्रिस्ती झाला. तो चुलत्याच्या मागून १८४५ मध्ये पहिला जॉर्ज टूपू म्हणून राजा झाला. १८५२ मध्ये यादवीचा अंत करून त्याने १८६२ मध्ये संसदेची स्थापना केली आणि १८७५ मध्ये संविधान लागू केले. त्याने फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांच्याशी तह करून तटस्थतेचे धोरण पतकरले.

१८८० मध्ये बेकर हा वेस्लेयन मंत्री मुख्यमंत्री होऊन फ्री वेस्लेयन चर्चसाठी धार्मिक छळ सुरू झाला, तेव्हा ब्रिटिशांनी हस्तक्षेप करून त्याला हाकलून दिले. १८९३ मध्ये पहिला जॉर्ज टूपू मृत्यू पावून, त्याचा पणतू दुसरा जॉर्ज टूपू गादीवर आला. १९०० च्या तहाने टाँगा ब्रिटिश संरक्षित प्रदेश झाला. १९१८ मध्ये दुसरा टूपू मृत्यू पावून त्याची मुलगी राणी सलोटे टूपू तिसरी गादीवर आली. तिच्या प्रदीर्घ कारकीर्दीत देश कर्जमुक्त होऊन निरक्षरता नष्ट झाली. ती देशात व ब्रिटनमध्येही लोकप्रिय झाली. १९६५ मध्ये ती मृत्यू पावल्यावर तिचा मुलगा टौफाआहाऊ टूपू चौथा हा राजा झाला. १९७० मध्ये टाँगा हा ब्रिटिश राष्ट्रकुलातील स्वतंत्र देश झाला.

टाँगामध्ये संसदीय राजेशाही आहे. राजा प्रिव्ही, कौन्सिल, मंत्रिमंडळ, विधानसभा व न्यायसंस्था यांच्याद्वारे राज्यकारभार चालतो. राजा व मंत्रिमंडळ मिळून प्रिव्ही कौन्सिल होते. मंत्रिमंडळात प्रधानमंत्री, उपप्रधानमंत्री, इतर मंत्री आणि हापाई व व्हाव्हाऊ येथील राज्यपाल असतात. विधानसभेत प्रिव्ही कौन्सिलचे सदस्य, सरदारांचे सात व लोकांनी तीन वर्षांसाठी निवडलेले सात प्रतिनिधी असतात. २१ वर्षांवरील स्त्रियांस व २१ वर्षांवरील करदात्या पुरुषांस मताधिकार आहे. मॅजिस्ट्रेट कोर्टे, जमीनबाब न्यायालये, त्यांवर सुप्रीम कोर्ट हे अपील कोर्ट व सर्वांच्यावर प्रिव्ही कौन्सिल अशी न्यायदान व्यवस्था आहे. टाँगाचे स्वतःचे नेहमीचे व राखीव सैन्यदल आहे.

आर्थिक स्थिती : कृषी हा टाँगाचा प्रमुख व्यवसाय असून मासेमारी हा दुय्यम व्यवसाय आहे. मका, नारळ, रताळी, केळी, लिंबू जातीची फळे, याम, कसावा, तवकीर, अननस, कलिंगडे इ. पिके होतात. निर्यातीसाठी नारळ, खोबरे व केळी ही फार महत्त्वाची असून प्रत्येकाला अर्ध्या जमिनीत नारळ लावावेच लागतात. उद्योगधंदे व कारखाने म्हणण्याजोगे नाहीतच. १९७१ मध्ये टाँगात ३१,०२० डुकरे ६,१७२ घोडे व ३,१४१ गुरे होती.

१९६७ पासून ऑस्ट्रेलियन डॉलरच्या सममूल्याचे टाँगन डॉलर हे चलन आहे. त्याचे १०० सेनिटी होतात.१०, ५, २,१ व / पाआंगा (टाँगन डॉलर) च्या नोटा असून ५०, २०, १०, ५, २ व १ सेनिटींची नाणी असतात.१९६७ मध्ये राज्यारोहणानिमित्त १, / / हाऊ (१०० टाँगन डॉलर) ची सोन्याची नाणी पाडली होती.

१९७१ चा अर्थसंकल्प २७,३१,६०१ टाँगन डॉलर जमेचा आणि ३०,०१,९४७ टाँगन डॉलर खर्चाचा होता. जकात, आयकर व डोईपट्टी ही प्रमुख उत्पन्न साधने आहेत. १९७१ मध्ये ६३,०४, ९१७ टाँगन डॉलरची आयात मुख्यतः अन्नपदार्थ व कपडा यांची व २२,००,२३२ टाँगन डॉलरची निर्यात मुख्यतः खोबरे व केळी यांची झाली. व्यापार ग्रेट ब्रिटन, अमेरिका, यूरोप, न्यूझीलंड व ब्रिटिश राष्ट्रकुलातील देशांशी होतो. देशात बचत बँक आहे परंतु व्यापारी बँका नाहीत. व्यापारवृद्धीसाठी टाँगा कोप्रा (खोबरे) बोर्ड, टाँगा कन्स्ट्रक्शन कंपनी, टाँगा प्रोड्यूस बोर्ड इ. शासकीय संस्था आहेत. देशाची १९६५–७० ची ४५ लक्ष पाआंगांची व १९७०–७५ ची ४८ लक्ष पाआंगांची योजना यशस्वी झाली आहे.

दळणवळण : टाँगाटापूवर १९२ किमी. व व्हाव्हाऊवर ७२ किमी. पक्के रस्ते आहेत. १९७१ मध्ये देशात ६३४ व्यापारी वाहने, ३४१ खाजगी वाहने व ३२१ मोटरसायकली होत्या. नूकूआलोफा बंदरातून ४,१२,२३० टनांची जहाजे आली व गेली. तीन प्रमुख जहाजकंपन्या परदेशी जलवाहतूक करतात. राजधानीजवळ चांगला विमानतळ असून व्हाव्हाऊवर धावपट्टी आहे. १९७१ मध्ये २५० विमाने आली-गेली. फिजी व सामोआशी नियमित विमानवाहतूक चालते. न्यूझीलंड-फिजी-टाँगा अशी दरमहा जहाजवाहतूक आहे. १९६१ पासून राजधानीत ध्वनिक्षेपण केंद्र असून टाँगन, इंग्रजी, सामोअन व फिजी भाषांतून कार्यक्रम प्रक्षेपित होतात. १९७२ मध्ये देशात ८,००० रेडिओ व १,०७३ दूरध्वनी होते. देशात द क्रॉनिकल हे एक शासनप्रणीत साप्ताहिक व मिशनांतर्फे वर्तमानपत्रे निघतात.


लोक व समाजजीवन : टाँगातील लोक मूळचे सामोआतून आलेले पॉलिनीशियन माळी व कोळी असून त्यांची शरीरयष्टीही पॉलिनीशियन धर्तीचीच आहे. एकूण फक्त ३६ बेटांवरच कायम वस्ती आहे. ते टाँगन, पॉलिनीशियन व इंग्रजी या भाषा बोलतात. सु. ७७ टक्के लोक फ्री वेस्लेयन चर्चचे ख्रिस्ती असून राजा हाच त्यांचा धर्मप्रमुखही असतो. ६ ते १४ वर्षे वयाच्या सर्व मुलांस शिक्षण सक्तीचे व मोफत असते.१९७१ मध्ये ८२ शासकीय व ४७ इतर प्राथमिक शाळांतून मिळून १६,४१६ विद्यार्थी होते. २ शासकीय व ५० मिशनरी शाळांतून १०,१६४ विद्यार्थी माध्यमिक शिक्षण घेत होते. देशी परदेशी शिष्यवृत्त्या मिळवून परदेशांत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी जातात. एक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहे. वैद्यकीय व दंतवैद्यकीय सेवा सर्वांस मोफत मिळते. चार शासकीय रुग्णालये व अनेक दवाखाने आहेत. प्रत्येक प्रौढास (१६ वर्षांवरील) ३·३४ हे. जमीन व घरासाठी जागा मिळण्याचा हक्क आहे. मात्र दिवसेंदिवस याची अंमलबजावणी कठीण होत चालली आहे. टाँगातील लोकांनी पुष्कळ बाबतीत पाश्चात्त्यांचे अनुकरण केले असले, तरी आपल्या मूळ संस्कृतीची वैशिष्ट्ये कायम राखली आहेत. मुष्टियुद्ध, रग्बी, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल यांबरोबरच परंपरागत क्रीडाप्रकारही येथे लोकप्रिय आहेत.

राजधानीशिवाय नेआफू व पाँगाय ही प्रमुख शहरे आहेत. पर्यटन व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने नूकूआलोफाचा विमानतळ सुधारला असून राजधानीत अद्ययावत विश्रामगृह बांधले आहे.

डिसूझा, आ. रे. कुमठेकर, ज. ब.

टाँगा 

 टाँगातील, ‘ताउओलुंगा’ लोकनृत्य.    नूकूआलोफा येथील राजवाडा, टाँगा.    हा-अमोंगा : ऋतुचक्रनिदर्शक प्राचीन द्वारपथ वास्तू, टाँगा.    टाँगाचे राष्ट्रीय पेय ‘कावा’ तयार करणारी स्त्री