डाकार : पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ५,३१,००० (१९७३). हे अटलांटिकवरील बंदर सेनेगल व गँबिया नद्यांमधील त्रिभुज प्रदेशात वसले आहे. वोलॉफ लोकांचे चिंचेच्या झाडाचे नाव व लेबू लोकांच्या गावाचे नाव डाखार यांवरून डाकार नाव पडले. १८५७ मध्ये फ्रेंचांनी प. आफ्रिका बळकावला. १८८५ मध्ये सेंट लुइस–डाकार ही प. आफ्रिकेची पहिली आगगाडी सुरू झाली, तेव्हा भुईमूग समृद्ध पृष्ठप्रदेश असलेल्या डाकारचा विकास वेगाने होऊ लागला. बंदर सुधारणा व फ्रेंचांचा नाविक तळ यामुळे १९०४ पासून डाकार फ्रेंच प. आफ्रिकेची राजधानी बनले. तेलवाहू जहाजांसाठी सोयीही तेथे झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर शेंगदाणा तेलशुद्धीकरण उद्योग वाढला आणि सिगारेटी, कापड व वस्त्रे,

डाकार येथील आधुनिक मशीद

पादत्राणे, शीत पेये, डबाबंद मासे, साबण, दारू गळणे, ट्रकजुळणी, खनिज तेलशुद्धीकरण इत्यादींचे कारखाने निघाले. नजीकचे गॉरे बेट पर्यटन केंद्र बनले. १७º से. ते ३२º से. तापमान, सु. ६५ सेमी. पाऊस, उत्तरी वारे व सागरी झुळका यांमुळे डाकारचे हवामान सुखद आणि प्रसन्न बनले आहे. डाकारच्या सुरक्षित व आधुनिक सुविधायुक्त बंदराची ७५% निर्यात फॉस्फेट व भुईमूग आणि ७५% आयात हायड्रोकार्बन पदार्थाची आहे. यॉफ हा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. येथील लोकांत आफ्रिकी मुसलमान व बिगर आफ्रिकी कॅथलिक ख्रिश्चन यांचे प्रमाण जास्त आहे. येथील शैक्षणिक, वैद्यकीय इ. सार्वजनिक सेवा प्रगत आहेत. राष्ट्राध्यक्ष प्रसाद, संसदभवन, प्रशासन कार्यालय, आफ्रिकी संस्कृतींचे अभ्यासकेंद्रे असलेले डाकार विद्यापीठ, पाश्चर संस्था, मानव जातीविज्ञान, पुरातत्त्वविद्या, आफ्रिकी इतिहास, सागरी वस्तू यांची वस्तुसंग्रहालये, उद्यान व प्राणीसंग्रहालय इ. येथील प्रेक्षणीय वास्तू व संस्था आहेत.

गद्रे. वि. रा.