सांतांदेर : स्पेनमधील एक प्रसिद्घ बंदर व शहर आणि कँटेब्रिया (सांतांदेर) प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,८१,५८९(२०१०). उत्तर स्पेनमधील बिस्केच्या उपसागर किनाऱ्यावर असलेल्या मेयर या खडकाळ भूशिराच्या दक्षिण किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. मेयर भूशिराचा विस्तार पूर्वेकडे झालेला असल्यामुळे बिस्केच्या उपसागरातील सांतांदेर हा लहानसा उपसागर सागरी लाटांपासून सुरक्षित बनला असून त्याचा मोठा फायदा या बंदराला झाला आहे. रोमन वसाहतकाळातही हे एक उत्कृष्ट नैसर्गिक बंदर म्हणून प्रसिद्घ होते. कॅस्टाइल राजवटीत त्यांचे प्रमुख बंदर म्हणून सांतांदेरचा वापर केला जाई. पहिल्या नेपोलियनच्या काळात फ्रेंचांनी त्यावर आक्रमण केले. २५ ऑगस्ट १९३७ रोजी जनरल फ्रान्सिस्को फ्रँको याच्या राष्ट्रवादी सेनेने या शहराचा ताबा घेतला होता. दुसऱ्या महायुद्घाच्या काळात हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले (१९४१). त्यानंतर त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. अमेरिकेशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाल्यापासून या बंदराचे महत्त्व वाढले परंतु पश्चिम गोलार्धातील स्पॅनिश राजवट संपुष्टात आल्यानंतर येथून होणाऱ्या व्यापारात घट झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात या शहराच्या पृष्ठप्रदेशातून लोहखनिजाचे उत्पादन सुरू झाल्यानंतर या बंदराचे महत्त्व पुन्हा वाढले.

सांतांदेरलगतच्या टेकड्यांमधून मिळणाऱ्या लोह खनिजाचे शुद्घीकरण, माशांवरील प्रक्रिया, वस्त्रनिर्मिती, जहाजबांधणी, कागद, साबण, रसायने, यंत्रे, धातुकर्म, झोतभट्टी, खाद्यपदार्थनिर्मिती इ. उद्योगधंदे येथे चालतात. स्पेनचे हे प्रमुख बंदर असल्यामुळे व्यापारीदृष्ट्या त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे.

उंचावरील जुना शहरी भाग कॅथीड्रलभोवती दाटीवाटीने वसला आहे. तेरावा आल्फॉन्सो या राजास प्रदान केलेला मॅगडॅलेना राजवाडा, गॉथिक कॅथीड्रल, ⇨ मारसेलीनो मेनेंदेथ ई पेलायो या प्रसिद्घ लेखक व व्युत्पन्न इतिहासकाराचे तत्कालीन ग्रंथालय आणि प्रागैतिहासिक अवशेष व कलावस्तू यांसाठी ख्यातकीर्त असलेले प्रांतिक वस्तुसंग्रहालय ह्या येथील प्रेक्षणीय वास्तू आहेत. गॉथिक कॅथीड्रल मध्ये काही नवीन बांधकाम झाले असून त्यात एक भुयार काढले आहे व त्यात मूरिश बाप्तिस्मापात्र ठेवले आहे. येथील बिशपसाठीची धर्मसभा जुनी आहे. १९७२ मध्ये द युनिव्हर्सिटी ऑफ सांतांदेर स्थापन करण्यात आली. शहरातील मेनेंदेथ ई पेलायो इंटरनॅशनल समर युनिव्हर्सिटीकडे अनेक विदेशी विद्यार्थीही आकर्षित होतात. शहराच्या जवळपास ⇨ अल्तामिरा व कास्तिल्ले ही प्राचीन गुहांची जगप्रसिद्घ स्थाने असून तीत वीस हजार वर्षांपूर्वीची भित्तिचित्रे आणि नक्षीकाम आहे. शहर निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेले आहे. तसेच निसर्गसुंदर पुळणी आणि उन्हाळ्यातील आल्हाददायक हवामान यांमुळे ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

देशपांडे, सु. र.