कूरा नदीवरील टिफ्लिस शहर

टिफ्लिस : टि्बलिसी. रशियातील जॉर्जिया प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ९,८४,००० (१९७४). हे बाकूपासून ४४८ किमी. कूरा नदीवर असून येथे रेल्वे एंजिने व दुरुस्ती, दारू व ती गाळण्याची यंत्रे, विजेची उपकरणे, कातडी सामान व पादत्राणे, प्लॅस्टिक, चॉकोलेट, शेती अवजारे, चिनी मातीची भांडी यांचे कारखाने असून जलविद्युत् केंद्र आहे. विद्यापीठ, जॉर्जियाची शास्त्र अकादमी, अनेक उच्च शिक्षणसंस्था व संशोधनसंस्था यांमुळे हे शैक्षणिक केंद्र बनले आहे. सुप्रसिद्ध रशियन नेता स्टालिन याने येथेच शिक्षण घेतले होते. पश्चिम व पूर्व ट्रान्स-कॉकेशियन मार्गावरील मोक्याचे नियंत्रण केंद्र असल्यामुळे याला इराण, बायझंटिन, अरब, मंगोल, तार्तर व तुर्की सत्तांस तोंड द्यावे लागले. १८०१ मध्ये ते रशियाकडे आले. येथून जॉर्जियन लष्करी महामार्ग आणि काळ्या समुद्रावरील पॉटीपर्यंत व कॅस्पियनवरील बाकूपर्यंत लोहमार्ग जातात. १९२१ मध्ये ही ट्रान्स-कॉकेशियन फेडरेशनची राजधानी होती. १९३६ मध्ये जॉर्जियन प्रजासत्ताक झाल्यावर टि्बलिसी नावाने ते त्याची राजधानी झाले. पाचव्या शतकातील चर्च, उद्याने, नाट्यगृहे, संग्रहालये, शिक्षणसंस्था यांमुळे ते सांस्कृतिक केंद्र बनले आहे. ते महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी केंद्र आहे.

 लिमये, दि. ह.