न्यू हँपशर : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील सुरुवातीच्या मूळ तेरा वसाहतींपैकी एक वसाहत व राज्य. ४२° ४० उ. ते ४५° १८ उ. आणि ७०° ३७ प. ते ७२° ३४ प. यांदरम्यान ते वसले असून, दक्षिणेस मॅसॅचूसेट्स व पश्चिमेस व्हर्‌माँट ही राज्य, उत्तरेस कॅनडाचा क्वीबेक प्रांत आणि पूर्वेस मेन राज्य व अलटांटिक महासागर यांनी सीमित झाले आहे. राज्याच्या २६,०९७ चौ. किमी. क्षेत्रफळापैकी पाण्याखाली ८१४ चौ. किमी. असून राज्याला अटलांटिक महासागराचा सु. ३० किमी. किनारी प्रदेश आहे. लोकसंख्या ८,१८,००० (१९७५). राजधानी काँकर्ड.

भूवर्णन : दक्षिण व मध्य भाग सखल, ठेंगण्या पठारांचे असून, त्यांतील अनेक नैसर्गिक सरोवरांपैकी मध्यभागातील विनिपसॉकी सरोवर सर्वांत मोठे आहे. मेरिमॅक नदीने या प्रदेशाचे दोन उभे प्राकृतिक भाग केले असून, पूर्वेकडचा अटलांटिक महासागरापर्यंत उतरत गेलेला व पश्चिम भाग कनेक्टिकट नदीपर्यंत पसरलेला आहे. नैर्ऋत्य भागात ६०० ते ९०० मी. उंचीचे पर्वत असून, आग्‍नेय भागात ३० किमी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. त्याच्यालगत सपाट जमीन असून किनाऱ्यापासून समुद्रात १४ किमी.वर आइल्स ऑफ शोल्स हा द्वीपसमूह अर्धा या राज्यात व अर्धा मेन राज्याच्या हद्दीत जातो. उत्तरेच्या मध्य भागातून वायव्येकडे गेलेल्या व्हाइट मौंटनमध्ये फ्रँग्‍कोनीया, कार्टर मराइया आणि प्रेझिडेन्शल या पर्वतश्रेणी असून, त्यांत ९५० ते १,९०० मी. पर्यंत उंचीची अनेक शिखरे आहेत. त्यांपैकी मौंट वॉशिंग्टन हे सर्वोच्च (१,९१७ मी.) शिखर आहे. मौंट जेफर्सन, क्ले, मन्‍रो, मेडिसन ही १,८०० मी. उंचीची इतर शिखरे आहेत. इंटरव्हेल, फ्रँग्कोनीया नॉच इ. खोल दऱ्यांनी या पर्वतांना छेद दिले आहेत. अगदी उत्तरेकडे निबिड अरण्ये, डोंगरांचे कणे, उंचसखल दऱ्या आणि अनेक प्रवाह वाहतात. न्यू हँपशर राज्यात ॲमनूसक, कंटुकक, सॉको व सॅमन फॉल्स या नद्या आहेत. राज्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवर वाहणारी कनेक्टिकट, मध्य भागातील दक्षिणवाहिनी मेरिमॅक आणि वायव्येकडील अँड्रस्कॉगिन या नद्या, त्यांच्या उपनद्या व लहानमोठी १,३०० वर सरोवरे यांनी न्यू हँपशरमध्ये पाण्याचे वैपुल्य निर्माण केले आहे. पाण्यापासून दूर असे एकही स्थान नाही तथापि खडकाळ भूप्रदेशामुळे नदीकाठ आणि किनारी प्रदेश एवढ्याच भागांत थोडीफार शेतीयोग्य जमीन आहे. राज्यात ग्रॅनाइट, बेसाल्ट, संगमरवर, स्लेट अशा प्रकारचे खडक व शाडू, फेल्स्पार आणि अभ्रक एवढीच महत्त्वाची खनिजे आहेत. दुसऱ्या महायुद्धकाळात जगातील सर्वाधिक अभ्रक या राज्यातून उपलब्ध झाला.

हवामान : दक्षिणेकडे व किनाऱ्यापाशी तपमान थंडीत – ६·९° से. व उन्हाळ्यात २१·१° से. असते, तर उत्तरेकडील डोंगराळ भागात ते थंडीत ११·१° से.व उन्हाळ्यात १५·६° से. असते. राज्यात वार्षिक सरासरी पाऊस ८७ ते ११२ सेंमी. होतो. राज्याचा ८०% भूभाग वनाच्छादित असून, तीत व्हाइट पाइन, हेमलॉक, मॅपल, ओक, ॲश, एल्म अशा जातींचे वृक्ष व बेरी फळांच्या अनेक जाळ्या, फूलवेली व झुडपे आढळतात तर पर्वतप्रदेशात शीत हवामानातील वनस्पती आहेत. हरिण, कोल्हा, सायाळ, चिचुंद्री, ससा, खार, अस्वल, रानमांजर, बीव्हर, रॅकून, मिंक, स्कंक हे प्राणी व १५० हून अधिक जातींचे पक्षी तसेच नदी-तळ्यांतून मुद्दाम पैदास केलेले ट्राउट, सॅमन, बॅस, पिकेरेल, पर्च या जातींचे खाद्योपयोगी मासे विपुल प्रमाणात आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : राज्याच्या पूर्व सीमेवरील पिस्कॅटक्वा नदीमुखातून सागरावरून देशात सुलभ प्रवेश होतो ही गोष्ट १६०३ साली कॅ. मार्टिन प्रिंग, १६०५ मध्ये साम्युएल ए शांप्लँ आणि १६१४ मध्ये जॉन स्मिथ या तिघांनाही पटली. १६२३ मध्ये त्या नदीमुखाजवळ डेव्हिड टॉम्सनच्या नेतृत्वाने स्ट्रॉबेरी बँक (सध्याचे पोर्टस्मथ) येथे पहिली इंग्रज वसाहत झाली आणि हँपशर या परगण्याचे नाव त्यास देण्यात आले (१६२९). दुसरी वसाहत नदीमुखापासून थोड्या वरच्या बाजूस डोव्हर या नावाने हिल्टन बंधूंनी स्थापन केली. ही ठाणी मच्छीमारी व व्यापार यांकरिता स्थापन करण्यात आली. १६२९ मध्ये कॅप्टन जॉन मेसन याने इंग्‍लंच्या राजाकडून या भागाची सनद मिळवली. या भागावर मॅसॅचूसेट्सच्या अधिकाऱ्यांचेच प्रथम नियंत्रण राहिले. मेसनच्या वंशजांनी सु. शतकभर वारसा हक्कासाठी दिवाणी दावे चालू ठेवले व १६८९ मध्ये इंग्‍लंडच्या राजाने न्यू हँपशर हा शाही मुलूख ठरविला तथापि विसाव्या शतकापर्यंत याच्या सीमेचा वाद चालूच होता. १७६० मध्ये न्यूयॉर्कचे अधिकारी आणि न्यू हँपशर भूमीचे हिस्से अनेकांना सनदीवर देणारा गव्हर्नर बेनिंग वेंटवर्थ यांच्या दरम्यान, कनेक्टिकट नदीकाठच्या प्रदेशाबद्दल संघर्ष सुरू झाले आणि शंभर नवी गावे वसली. टॉमस वेंटवर्थ याला १७७५ मध्ये हाकलून देऊन न्यू हँपशर ही पहिली वसाहत इंग्रज अंमलाखालून मुक्त झाली. १७७६ मध्ये सर्व वसाहतींच्या अधिवेशनात स्वातंत्र्याच्या घोषणेचा पुरस्कार करण्याचा आदेश, या वसाहतीने आपल्या प्रतिनिधींना दिला. जॉन लँग्‍डन या सधन वापाऱ्याने वसाहतीस आर्थिक मदत दिली. १७८४ मध्ये न्यू हँपशरने संविधान संमत केले व संघराज्याला निर्णायक पाठिंबा दिला. यादवी युद्धानंतर न्यू हँपशरमधील अनेक शेतकरी आपले नशीब काढण्यासाठी पश्चिमेकडील राज्यात गेले. राज्याचे राष्ट्रसंसदेतील प्रतिनिधी व अब्राहम लिंकनचे मित्र जॉन हेल व एमॉस टक यांनी राष्ट्रसंसदेत गुलामगिरीविरुद्ध हिरिरीने बाजू घेतली, त्यामुळे त्या प्रश्नावर तडजोडीचे धोरण ठेवणाऱ्या डॅन्येल वेब्‌‌स्टर व फ्रँक्लिन पीअर्स यांना राज्याने राजकारणातून बहिष्कृत केले. यादवी युद्धात भरपूर मनुष्यबळ पुरविल्यानंतर शेतीवर कशीतरी गुजराण करणाऱ्या या राज्याची औद्योगिक प्रगती होऊ लागली. नवीन रोजगारांच्या आकर्षणामुळे मूळच्या रहिवाशांत फ्रेंच-कॅनेडियन व यूरोपीयेतरांची भरती झाली. १९०५ मध्ये राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांच्या मध्यस्थीने रूसो-जपानी तहावर पोर्टस्मथ येथे सह्या झाल्या, तेव्हा या राज्याला जागतिक प्रसिद्धी लाभली. १९४४ साली ब्रेटन वुड्स येथील परिषदेनंतर आंतरराष्ट्रीय चलननिधीची स्थापना करण्यात आली. न्यू हँपशरने पहिल्या महायुद्धात सैनिक आणि युद्धसामग्री पुरवली व पोर्टस्मथ पाणबुड्या बांधण्याचे ठाणे झाले. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांशिवाय युद्धनौका, पाणबुड्या, पोषाख, पादत्राणे इ. साहित्याचा पुरवठा या राज्याने केला. यानंतर औद्योगिकीकरणास सुरुवात होऊन वस्तीही झपाट्याने वाढली. या राज्याची घटना जुनी असून १७८४ मध्ये तयार झाली आहे. त्यावेळेपासून आतापर्यंत ७२ गव्हर्नर झाले (१९७२). त्यांपैकी काहींची पुन्हा निवड झाली होती. घटनेत अनेक दुरुस्त्याही झाल्या. संविधानानुसार राज्यकारभारासाठी एक राज्यपाल व पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एक सदस्यमंडळ दोन वर्षांसाठी निवडून दिलेले असते. ते सर्व न्यायाधिकाऱ्यांच्या व खातेप्रमुखांच्या नेमणुका करते. विधिमंडळाच्या दोन गृहांपैकी सीनेटचे ३० सदस्य असून हाउस ऑफ रेप्रेझेंटेटिव्हचे ३७५ सभासद असतात. ते दोन वर्षांसाठी निवडलेले असतात. दोन्ही सभागृहांची अधिवेशने विषमांकी वर्षी राजधानी काँकर्ड येथे भरतात. न्यायव्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती व त्यांचे चार सहकारी, तसेच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सहा सहकारी, प्रोबेट न्यायाधीश व नगरपालिका न्यायालयांचे खास न्यायाधीश हे सर्व ७० वर्षे वयापर्यंत काम करतात. राज्यातर्फे संघीय काँग्रेसवर दोन सीनेटर व दोन प्रतिनिधी निवडले जातात. राज्यसंविधानाची दोन वैशिष्ट्ये अशी, की सीनेटचे मतदारसंघ लोकसंख्येवरून न ठरता करपात्र मालमत्तेच्या विभागांवरून ठरलेले आहेत आणि प्रतिनिधींची जेव्हा निवडणूक होते तेव्हा ग्रामीण विभागातील मतदारांच्या दुप्पट शहरी मतदारांचा एक निवडणूक विभाग धरण्यात येतो. मतदार हे साक्षर व प्रौढ असावेत, पण नादार व गुन्ह्याखाली शिक्षा झालेले नसावेत. प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे दहा परगण्यांमध्ये विभाजन केलेले आहे.

आर्थिक व सामाजिक स्थिती : डोंगराळ भूस्वरूप, खडकाळ जमिनी आणि हिवाळ्यातील दहिवर यांमुळे न्यू हँपशर राज्यातील शेतीव्यवसाय हा दुय्यम आहे. कुरणांवर पोसलेली गुरे व दूधदुभत्याची जनावरे, कोंबड्या, अंडी, पीचसारखी फळे आणि मॅपल वृक्षाच्या रसापासून तयार केलेली साखर एवढीच उत्पादने महत्त्वाची आहेत.

नरम-जाड सालींचे वृक्ष व इतर वनसंपत्ती, असंख्य सरोवरे, नद्या व त्यांपासून मिळणारी स्वस्त जलविद्युत्, लोकांत मुरलेली उच्च दर्जाची कारागिरी या गोष्टींचा अंतर्भाव राज्याच्या नैसर्गिक साधनसामग्रीत केला जातो. दुसऱ्या महायुद्धकाळात हजारो टन अभ्रकाचे उत्पादन या राज्यातून करण्यात आले. राज्याच्या एकूण महसुलापैकी २०% पेक्षा जास्त मिळकत पर्यटन व्यवसायापासून होते. हिवाळ्यात बर्फाच्छादित असलेल्या व्हाइट मौंटनवर बर्फावरील खेळ–स्केटिंग, आइस हॉकी–हे लोकप्रिय आहेत. किनाऱ्यावरील चौपाट्या, सरोवरे विहारासाठी व मासेमारीसाठी उपयुक्त असल्याने अमेरिकेच्या इतर राज्यांतून अनेक हौशी प्रवाशी न्यू हँपशरकडे आकर्षित होतात. काळवीट, हरणे आणि अस्वले, अनेक चित्रविचित्र पक्षी व या राज्यातील पहिल्या इंग्रज वसाहतीतील अनेक ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना आकृष्ट करतात. लॉब्स्टर, कॉड, हॅडॉक, स्मेल्ट, खेकडे इत्यादींची किनाऱ्यावर व लगतच्या खोल समुद्रात मासेमारी चालते. वाळू, रेती, बांधकामाचा दगड व अभ्रक एवढीच उपयुक्त खनिजे येथील खाणींत मिळतात.

राज्यात सु. १,३९० किमी. लांबीचे लोहमार्ग असून २२,२०० किमी. लांबीचे रस्ते आहेत. यांपैकी ८०% रस्ते पक्के आहेत. डोंगराळ प्रदेशामुळे जलमार्ग अगदी कमी असून, लोहमार्ग व रस्ते यांची लांबीदेखील इतर विकसित राज्यांच्या मानाने कमी आहे.

पोर्टस्मथ हे महत्त्वाचे सागरी बंदर असून, काँकर्ड ही राज्याची राजधानी आणि शासकीय शहर आहे. डोव्हर, कीन ही औद्योगिक शहरे असून मँचेस्टर हे राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. बर्लिन, क्रॉफर्ड नॉच, लकोनीअ ही इतर छोटी गावे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. ॲम्हर्स्ट, एक्झीटर आणि कोलब्रुक हीही गावे वसाहतकालापासून प्रसिद्ध आहेत. एकूण लोकसंख्येपैकी ५७% नागरी व ४३% ग्रामीण वस्ती आहे. राज्याची प्रमुख भाषा इंग्रजी असून, ख्रिस्ती धर्माचे रोमन कॅथलिक, काँग्रिगेशनॅलिझम, मेथडिस्ट, बॅप्टिस्ट आणि एपिस्कोपल हे प्रमुख पंथ बहुतेक शहरांत आढळतात. प्राथमिक शाळांत शिक्षण ६ ते १४ वर्षांपर्यंत सक्तीचे असून निरक्षर परंतु व्यवसाय करणाऱ्या १६ ते २१ वर्षांमधील विद्यार्थ्यांकरिता सायंशाळांची व्यवस्था आहे. १९७५ मध्ये राज्यातील ३६२ प्राथमिक विद्यालयांतून ६९,३५३ विद्यार्थी शिकत होते तर २० माध्यमिक शाळांतून ६,०५७ विद्यार्थी होते. डार्टमथ (१७६९) हे सर्वांत जुने महाविद्यालय असून न्यू हँपशर विद्यापीठ (१८६६) डरॅम येथे आहे. त्यात १०,२९७ विद्यार्थी शिकत होते (१९७४). येथील शाळांत १,२५,००० वर विद्यार्थी आहेत. डोंगराळ प्रदेशामुळे या राज्याला ‘अमेरिकेचे स्वित्झर्लंड’ असे म्हणतात तर कणाश्माचे खडक जास्त असल्याने त्यास ‘ग्रॅनाइट स्टेट’ असेही संबोधिले जाते. न्यू हँपशरचे लोक स्वत्रंत बाण्याचे व लोकशाहीबद्दल जागरूक आहेत. राज्यावर ब्रिटिश संस्कृतीची दाट छाया पडलेली आढळून येते.

ओक, शा. नि. भागवत, अ. वि.