रग्बी : ग्रेट ब्रिटनमधील वॉरिक परगण्यातील एक बरो व शहर. शहराची लोकसंख्या ५९,५६४ (१९८१). मध्य इंग्लंडमधील ॲव्हन नदीकाठावरील हे शहर बर्मिंगहॅमच्या आग्नेयीस सु. ४५ किमी.वर असून लोहमार्ग प्रस्थानक, अभियांत्रिकी व रेडिओ प्रक्षेपण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. येथे गुरांचा मोठा व्यापार चालतो. शहरात नगरपालिका असून देशातील मोठ्या विद्यानिकेतनांपैकी एक येथे आहे.

लॉरेन्स शेरिफ या रग्बीमध्ये जन्मलेल्या मोठ्या व्यापाऱ्याच्या मृत्युपत्रानुसार येथे १५६७ मध्ये रग्बी विद्यानिकेतनाची स्थापना करण्यात आली. टॉमस आर्नल्ड या मुख्याध्यापकाच्या कारकीर्दीत (१८२७-४२) या शाळेला खूपच प्रसिद्धी मिळाली. त्याचा मुलगा मॅथ्यू आर्नल्डने, आपल्या काव्यात या शाळेचे वर्णन केलेले आढळते. टॉमस ह्यूझचे रग्बी जीवनातील टॉम ब्राउन्स स्कूल डेज हे पुस्तक प्रसिद्ध आहे. रग्बी (फुटबॉल) या प्रसिद्ध लोकप्रिय खेळाला १८२३ मध्ये या शाळेतूनच सुरुवात झाली.

शहरात यंत्रसामग्री, विद्युत्‌उपकरणे यांच्या निर्मितीचे उद्योग आहेत. शहरातील अनेक चांगल्या वास्तूंपैकी, पहिल्या महायुद्धात मारल्या गेलेल्या येथील ६८२ सैनिकांचे स्मारक उल्लेखनीय आहे. प्रसिद्ध इंग्रज कवी रूपर्ट ब्रुक (१८८७-१९१५) याचे हे जन्मगाव होय.

चौंडे, मा. ल.