दांडेली : कर्नाटक राज्यातील उ. कॅनरा जिल्ह्याच्या हल्याळ तालुक्यातील एक औद्योगिक शहर. लोकसंख्या २५,४३५ (१९७१). हे हल्याळच्या नैर्ऋत्येस सु. २० किमी. व बेळगावच्या दक्षिणेस सु. ६० किमी. असून काळी नदीच्या डाव्या तीरावर वसलेले आहे. दक्षिणमध्य रेल्वेचा एक फाटा धारवाडपासून दांडेलीपर्यंत जातो. येथील ‘द वेस्ट कोस्ट पेपर मिल्स’ हा कागद कारखाना दांडेलीच्या बांगुरनगर या उपनगरात असून १९७२–७३ मध्ये येथून ५०,००० टन कागदाचे उत्पादन झाले. येथे प्लायवुड निर्मितीचा कारखाना असून २५,००० टन वार्षिक उत्पादन होते. दांडेलीच्या सभोवती असणाऱ्या जंगलातून मिळणारे विपुल लाकूड आणि बांबू, काळी नदीपासून होणारा भरपूर पाणीपुरवठा, जोग येथील विद्युत् केंद्रापासून होणारा वीजपुरवठा आणि वाहतुकीच्या सोयी यांमुळे येथील प्लायवुड व कागद या कारखान्यांचा विशेष विकास झाला आहे. या कारखान्यांमुळेच दांडेलीचा विकास होऊन गावाचे शहरात रूपांतर झाले. हे मंगल धातुनिर्मितीचेही एक केंद्र आहे. येथील १८७ चौ. किमी. क्षेत्राचे अभयारण्य हत्ती, गवा, बिबळ्या वाघ, सांबर, चितळ या प्राण्यांसाठी उल्लेखनीय आहे.

सावंत, प्र. रा.