यांगत्सी नदी :  चीनमधील तसेच आशिया खंडातील लांबीने सर्वांत मोठी, तर जगातील पाचव्या क्रमांकाची नदी. लांबी ५,४९४ किमी. जलवाहन क्षेत्र १८,२९,००० चौ. किमी. नदीच्या खोऱ्याचा पूर्व-पश्चिम विस्तार ३,२१९ किमी. व दक्षिणोत्तर विस्तार ९५६ किमी. आहे. या संपूर्ण नदीसाठी वापरण्यात येणारे यांगत्सी किंवा यांगत्सी किअँग (नदी) हे नाव चीनमधील प्राचीन यांग जहागिरीवरून आले असून ते यूरोपियनांनी दिलेले असावे. चिनी लोक मात्र सामान्यपणे ‘जांग ज्यांग’ (लांब नदी) ह्या नावाचा वापर करतात. जांग ज्यांग किंवा ‘डा किअँग’ (मोठी नदी) या नावानेही यांगत्सी ओळखली जाते. यूरोपियनांनी ‘ब्लू रिव्हर’ (निळी नदी) असेही नाव या नदीला दिलेले आहे. इतरही काही स्थानिक नावे यांगत्सीला आहेत. यांगत्सीच्या मधल्या व खालच्या टप्प्यांतील पाणी तपकिरी-पिवळसर दिसते.

यां गत्सी नदी चीनच्या पश्चिम भागात, तिबेटच्या ईशान्य सरहद्दीजवळ, डांग्‌कूला पर्वतश्रेणीत, सस.पासून ५ ,४८६ मी. उंचीवर उगम पावते आणि चीनच्या अकरा प्रांतांमधून वाहत जाऊन पूर्वेस शांघायजवळ पूर्व चिनी समुद्राला मिळते. नदीचा तीन-चतुर्थांशापेक्षा अधिक प्रवाह पर्वतीय प्रदेशातून वाहतो. उलान मुलुन आणि चुताए हे यांगत्सीचे मुख्य दोन शीर्षप्रवाह आहेत. त्यांपैकी दक्षिणेकडील ‘उलान मुलुन’ (चिनी) किंवा ‘उलान मुरेन’ (तिबेटी) या नावाने ओळखला जाणारा प्रवाह मुख्य आहे. या दोन शीर्षप्रवाहांच्या संगमापासूनचा तिबेटी उच्चभूमीच्या प्रदेशातील यांगत्सीचा प्रवाह उथळ व विस्तृत अशा दरीतून पूर्वेस वाहत असून, नदीपात्रात ठिकठिकाणी सरोवरे व लहानलहान जलाशय निर्माण झालेले आहेत. तिबेटी उच्चभूमीतून बाहेर पडल्यावर बायान कारा पर्वताच्या दक्षिणेस नदी जास्त उंचीवरून आग्नेय दिशेत एकदम खाली उतरताना दिसते. येथील खडकाळ व तीव्र उताराच्या प्रदेशातून नदीने दीड ते तीन किमी. खोलीची अरुंद दरी – निदरी निर्माण केली आहे. या भागात ४,८७७ मी.पेक्षा अधिक उंचीची बर्फाच्छादित व हिमनद्यांनी युक्त अशी पर्वतशिखरे आहेत. आग्नेय दिशेत बरेच अंतर वाहत गेल्यावर नदी दक्षिणवाहिनी होते. या मार्गातील नदीपात्र इतके खोल व तीव्र उताराचे आहे की, काठावर साधी पाऊलवाटही आढळत नाही. या भागात वसाहत अगदीच विरळ असून तीही नदीपात्रापासून उंच ठिकाणी आढळते. उगमापासून ९६५ किमी. अंतरावरील बाटांगपर्यंत नदी सस.पासून २,५९० मी. पर्यंत खाली उतरली आहे. या भागात यांगत्सीचा बराचसा प्रवाह तिबेट-सेचवान सरहद्दीवरून, मेकाँग आणि सॅल्‌वीन नद्यांच्या जवळून व त्यांच्याशी समांतर दक्षिण दिशेत वाहत जातो. येथे या तीन नद्या एकमेकींपासून केवळ २४ ते ४८ किमी. अंतरावर आहेत. त्यानंतर मेकाँग – सॅलवीन् नद्या तशाच पुढे दक्षिणेस वाहत जातात. यांगत्सी मात्र एका उंच टेबललँडमुळे पुढे दक्षिणेस वाहत न जाता प्रथम ती एकदम उत्तरेस, त्यानंतर पुन्हा दक्षिणेस वळते. पिंगच्यू ॲननंतर सेचवान – यूनान सरहद्दीवरून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस ईपिनकडे वाहत जाते. या दरम्यानचा प्रवाहसुद्धा पर्वतीय प्रदेशातून वाहत असून नदीची दरी खोल, रुंद व तीव्र उतारांचे काठ असलेली आहे. दरम्यान यांगत्सीला अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यांपैकी यालुंग (लांबी सु. १,१७५ किमी.) ही सर्वांत मोठी नदी आहे. उगमापासून ईपिनपर्यंतचा नदीप्रवाहाचा पहिला टप्पा समजला जातो. ईपिनपर्यंतचा प्रवाह ‘जिन्शा’ (सोनेरी वाळू) या नावाने, तर ईपिनपासून खालचा प्रवाह प्रामुख्याने यांगत्सीकिअँग अथवा जांग ज्यांग या नावाने ओळखला जातो. पहिल्या टप्प्यातील खोऱ्यात राहणारे लोक परंपरागत जुन्या पद्धतीची शेती व गुरे पाळण्याचा व्यवसाय करतात. या भागात उन्हाळे उबदार व हिवाळे कडक असून पिकांच्या वाढीचा काळ चार ते पाच महिन्यांचा असतो. जास्त लोकसंख्येच्या स्थळी चिनी, डंगान, नेपाळी व भारतीय लोक आढळतात.

ई पिन ते यीचंग यांदरम्यानचा १,०१४ किमी. लांबीच्या नदीप्रवाहाचा समावेश दुसऱ्या टप्प्यात होतो. ईपिननंतर डोंगराळ अशा सेचवान प्रांतातून ही नदी ईशान्येस वाहत असून तेथे तिच्या पात्राची रूंदी ३०५ ते ४८८ मी. पर्यंत व खोली काही ठिकाणी १० मी. पेक्षा अधिक आढळते. प्रवाह वेगवान असून पात्र खोल व तीव्र उताराचे आहे. सेचवान खोरे सुपीक व कृषियोग्य हवामानाचे आहे. सौम्य हवामानात रेशमी किड्यांची जोपासना केली जाते. तेथे लोह, कोळसा, तांबे, फॉस्फरस, मँगॅनीज, कथिल, सोने, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू इ. खनिज पदार्थ सापडत असल्याने सेचवान प्रदेशाला   ‘समृद्ध भूमी’ असे संबोधले जाते. तेथे लोकसंख्याही दाट आहे. या भागात मिन (७८८ किमी.), जीआलिंग (१,१२६ किमी.), कुचिअँग (१,०१४ किमी.), तो आणि वू या उपनद्या यांगत्सीला येऊन मिळतात. ईपिन आणि चुंगकिंगजवळ उत्तरेकडून अनुक्रमे मिन व जीआलिंग नद्या यांगत्सीला मिळतात. चंगडू हे या भागातील मिन नदीकाठावरील मोठे शहर असून चुंगकिंग हे औद्योगिक केंद्र व प्रमुख नदीबंदर आहे.

से चवान प्रांतातून बाहेर पडून २०० किमी. अंतर पर्वतीय प्रदेशातून वाहत गेल्यानंतर यीचंगजवळ नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते. या पर्वतीय प्रदेशात नदीने त्स्यूतान, यू व शीलीन या अरूंद, तीव्र उताराच्या व ४०० ते ६१० मी. उंचीचे चुनखडकयुक्त उभे कडे असलेल्या तीन घळ्या निर्माण केल्या आहेत. यांशिवाय येथे सुंदर स्तंभ आणि मनोरेही निर्माण झालेले दिसतात. यांपैकी पहिली घळई लांबीने कमी (८ किमी.) असली, तरी तिचा अरूंदपणा, पाण्यातील द्रुतवाह व भोवरे यांमुळे जलवाहतुकीच्या दृष्टीने फारच धोकादायक आहे. दुसरी घळई ४८ किमी. लांबीची, अरूंद व ४९० ते ६१० मी. उंचीचे भिंतीसारखे उभे सरळ कडे असलेली आहे. तिसरी घळई ३४ किमी. लांबीची आणि काही ठिकाणी चुनखडकीचे सरळ व उंच कडे असलेली आहे.

यांगत्सी  नदीच्या  तिसऱ्या  टप्प्याने  पूर्व  चीनमधील  विस्तृत  मैदानी  प्रदेश  व्यापला  असून  चीनमधील  कृषी  व  औद्योगिक  दृष्ट्या  सर्वांत  विकसित  असा  हा  प्रदेश  आहे.  येथे लोकसंख्येची  घनताही  दाट  आहे.  या  टप्प्यात  नदीला  हान   (१,५१९  किमी.), यूआन (९६५), शीआंग (८०५ किमी.), गान (७५६ किमी.) इ. अनेक  उपनद्या येऊन  मिळत  असून  प्रवाहमार्गात चँग, तुंगतिंग, ल्यांग, पोयांग  यांसारखी  अनेक  सरोवरे  व  जलाशयही  निर्माण  झाले  आहेत.  यूआन  व  शीआंग  या  नद्या  तुंगतिंग सरोवरामार्गे, तर  गान  नदी  पोयांग  सरोवरामार्गे  यांगत्सीला  मिळते.  मासेमारी  व  जलसिंचनाच्या  दृष्टींनी  या  सर्व  जलाशयांना  विशेष  महत्त्व  आहे.  ल्यांग  सरोवराजवळील मैदानात  नदीपात्राची  रुंदी  ७९२  मी.पर्यंत  व  खोली  ३०  मी.पर्यंत  वाढलेली  आढळते.  तसेच  येथील  प्रवाह  प्रतिसेकंदास  एक  ते  सव्वा  मीटर  या  वेगाने  वाहतो.  हान-यांगत्सी यांच्या  संगमाजवळ  हानयांग  ,   हान्‌को  व  वूचांग  ही  तीन  शहरे  वसली  होती.  सांप्रत  या  तीन  शहरांचे  मिळून  वूहान  या  महानगरात  रूपांतर  झाले  असून  ते  एक  नदीबंदर म्हणून  विशेष  प्रसिद्ध  आहे.  ल्यांग-द्झ-ह  या  मैदानी  प्रदेशाच्या  पूर्वेस  नदी  अरुंद  व  प्रेक्षणीय  अशा  दरीतून  वाहत  जाते.  येथेच  नदीच्या  दक्षिण  भागात  पोयांग  हे  विस्तृत सरोवर   (  क्षेत्रफळ  २  ,  ५९०  चौ.  किमी.)  असून  ते  एका  उपनदीने  यांगत्सीला  जोडले  आहे.  यानंतर  नदी  ईशान्येस  उत्तर  चिनी  मैदानाकडे  वाहू  लागते.  येथेही  नदीला अनेक  सरोवरांचे  प्रवाह  येऊन  मिळतात.  तेथील  नदीपात्राची  रुंदी  ९१४  ते  १,८३०  मी.  व  खोली  ३०  मी.  पर्यंत  आढळते, या  भागात  आन्‌चिंग, वूशी, शूजो, शांघायसारखी  अनेक  मोठमोठी  शहरे  निर्माण  झाली  आहेत.  जंग  ज्यांग  शहरापासून  पुढे  यांगत्सीच्या  त्रिभुज  प्रदेशाला  सुरुवात  होते.  येथे  यांगत्सीच्या  अनेक  उपनद्या, शाखा, उपशाखा, नद्यांची  जुनी  पात्रे, सरोवरे  व  दलदलीचे  प्रदेश  आढळतात.  ताई (क्षेत्रफळ ३,३६७  चौ.  किमी.)  हे  त्रिभुज  प्रदेशातील  सर्वांत  मोठे  सरोवर  आहे. यांगत्सीच्या मुखाशी  ८०  किमी.  रुंदीची  नदीमुखखाडी  निर्माण  झाली  आहे.  समुद्राला  मिळण्यापूर्वी  यांगत्सी  दोन  शाखांमध्ये  विभागली  जाऊन  दोन्ही  शाखा  स्वतंत्रपणे  समुद्राला  जाऊन मिळतात.  डावीकडील  शाखेची  रुंदी  ५  ते  १०  किमी.  ,   तर  उजवीकडील  शाखा  १०  ते  २४  किमी.  रुंदीची  आहे.  या  दोन्ही  शाखांदरम्यान  चुंगमिंग   (  क्षेत्रफळ  ७७७  चौ. किमी.)  हे  नदीच्या  मुखाशी  गाळ  साचून  सु.  एक  हजार  वर्षांपूर्वी  निर्माण  झालेले  बेट  आहे.  यांगत्सीच्या  मुखापासून  वरच्या  प्रवाहाकडे  ४००  किमी.पर्यंत  भरतीचे  पाणी  चढते, तर  मुखाशी  चार  ते  साडे  चार  मीटर  उंचीच्या  लाटा  निर्माण  होतात.

तिसऱ्या  टप्प्यातील  यांगत्सीचे  पात्र  मैदानी  प्रदेशा     पेक्षा  काहीसे  उंच  असल्यामुळे  पुरापासून  संरक्षण  करण्याच्या  दृष्टीने  मुख्य  नदीकाठावर  व  उपनद्यांच्या  काठांवर  २  , ७३६ किमी.  लांबीचे  बांध  घातले  आहेत.  काही  ठिकाणी  त्यासाठी  धरणेही  बांधली  आहेत.  तुंगतिंग  व  पोयांग  या  नैसर्गिक  जलाशयांना  असे  बांध  घातले  आहेत.  शाशी  येथे  ९२० चौ.  किमी.  क्षेत्रफळाचा  जलाशय  तयार  झालेला  आहे.  सागरापासून  त्रिभुज  प्रदेशाचे  संरक्षण  करण्यासाठी  समुद्रकिनाऱ्यावर  किनाऱ्याला  समांतर  असे  दोन  प्रचंड  बांध  घातले आहेत.  त्रिभुज  प्रदेशातील  विस्तृत  क्षेत्र  भात  व  कापसाच्या  लागवडीखाली  आहे.

यांगत्सीच्या  प्रमुख  आठ  उपनद्या  असून  त्यांपैकी  यालुंग  ,   मिन  ,   जीआलिंग  व  हान  ह्या  चार  उपनद्या  डावीकडून, तर  वू, यूआन, शीआंग  व  गान  ह्या  चार  उपनद्या उजवीकडून  यांगत्सीला  मिळतात.

प्रवा हमानात  यांगत्सीचा  जगात  चौथा  क्रमांक  लागतो.  पावसाळ्यात  यांगत्सी  नदी  प्रतिसेकंदाला  ५०,९७०  घ.  मी.  ते  ७०,७९२  घ.  मी.  इतके  पाणी  समुद्रात  आणून टाकते, तर कोरड्या  ऋतूत  हेच  प्रमाण  प्रतिसेकंदास  ६,००३  घ.  मी.  ते  ७,९८५  घ.  मी.  यांदरम्यान  असते.  खोऱ्यातील  दाट  वनश्री  तसेच  नदी  पर्वतीय  प्रदेशांतून  वाहत असल्याने  तुलनेने ह्‌वांग  होपेक्षा  कमी  गाळ  वाहून  आणते.  पर्वतीय  प्रदेशात  यांगत्सीचे  पाणी  स्वच्छ  व  पारदर्शक  असते  ,   तर  खालच्या  टप्प्यातील  पाण्यात  गाळाचे  प्रमाण अधिक  असते.  नदी दरवर्षी ४३   ते   ५० कोटी टन इतका गाळ वाहून आणते. त्यापैकी  २८  ते  ३०  कोटी  टन  गा  ळ   मुखापर्यंत  वाहून  आणला  जातो  ,   तर  १५  ते  २०  कोटी  टन गाळाचे  समुद्राला मिळण्यापूर्वीच  पात्रात  संचयन  केले  जाते.  मुखाशी  होणाऱ्या  गाळाच्या  संचयनामुळे  त्रिभुज  प्रदेशा  चा   समुद्रातील  विस्तार  सरासरीने  ४०  वर्षांत  १  किमी. किंवा  वर्षाला  १५  ते २५  मीटर  या  प्रमाणात  वाढत  आहे.

मोसमी  पर्जन्याच्या  काळात  यांगत्सी  व  तिच्या  उपनद्यांतील  पुराचे  पाणी  सभोवतालच्या  प्रदेशात  पसरून  विस्तृत  क्षेत्र  पुराच्या  पाण्याखाली  येते.  पर्वतीय  प्रदेशातून  मैदानी प्रदेशात  वाहत  आल्यावर  त्यांच्या  पात्रातील  पाण्याचा  वेग  एकदम  मंदावून  पात्रातच  गाळाचे  संचयन  होते  व  नदीचे  पात्र  उथळ  बनत  जाते.  त्यामुळे  पुराचे  पाणी  नदीपात्रात  न मावल्याने  सभोवतालच्या  मैदानी  प्रदेशात  पसरून  तेथील  लोकांना  पुराच्या  गंभीर  धोक्याला  वारंवार  तोंड  द्यावे  लागते.  यांगत्सी  व  तिच्या  उपनद्यांच्या  पुराचे  पाणी  एकत्र होऊन  चीनला  पुरातन  काळापासून  अनेकदा  गंभीर  स्वरूपाचे  पुराचे  तडाखे  बसले  आहेत.  इ.  स.  पू.  २२९७  आलेल्या  प्रचंड  पुराचे  उल्लेख  प्राचीन साहित्यात  अनेक ठिकाणी  आढळतात.  बराच  काळपर्यंतच्या  सततच्या  तुफान  पर्जन्यवृष्टीमुळे  ह्‌वांग  हो  ,   वे  व  यांगत्सी  या  नद्यांना  महापूर  आला  होता.  त्यांच्या  पुराच्या  पाण्याखाली  उत्तर चीन मैदानाचा  जवळजवळ  सर्व  प्रदेश  जाऊन  त्या  जलाशयाला  प्रचंड  सागराचे  स्वरूप  आले  होते.  कमी  उंचीच्या  प्रदेशात  या  पुराचे  पाणी  बरीच  वर्षे  टिकून  राहिले  होते.  या अरिष्टानंतरही  अनेक  वेळा  मोठमोठे  पूर  आल्याचे  ऐतिहासिक  दाखले  मिळतात.  इ.  स.  पू.  २०६  ते  १९६०  या  काळात  अरिष्ट  ओढवणारे  १,०३०  पेक्षा  अधिक  पूर  येऊन गेले. सरासरीने  दर  ५०  ते  ५५  वर्षांत  किमान  एकदा  यांगत्सी  खोऱ्यात  अरिष्टकारक  पूरपरिस्थिती  निर्माण  झाल्याचे  आढळले  आहे.  गेल्या  एका  शतकातच  १८७०, १८९६, १९३१, १९४९  व  १९५४  या  वर्षी  मोठे  पूर  येऊन  गेले.  संततधार  मोसमी  पावसामुळे  १९३१  च्या  मे-जून  मध्ये  नदीच्या  मधल्या  व  खालच्या  टप्प्यांत  सहा  वेळा  पुराचे  तडाखे बसले. या पुरांमुळे  २३  ठिकाणच्या  धरणांची  आणि  बंधाऱ्याची  नासधूस  झाली, सु. ९०,६५०  चौ.  किमी.  पेक्षा  अधिक  क्षेत्र  पाण्याखाली  गेले  व  ४  कोटी  लोक  बेघर  झाले. नानकिंग, वूहान यांसारखी  मोठमोठी  शहरे  पाण्याखाली  गेली.  वूहान  शहरात  तर  चार  महिन्यांपेक्षा  अधिक  काळ  साठून  राहिलेल्या  पाण्याची  खोली  २  ते  ६  मी.  होती.

जलवाहतुकीस  उपयुक्त  ठरणारी  यांगत्सी  ही  चीनमधील  प्रमुख  नदी  आहे.  नदीचा  २,७३६  किमी.  लांबीचा  प्रवाह  जलवाहतुकीस  उपयोगी  असून  खोऱ्यातील  एकूण जलवाहतूकयोग्य  मार्गांची  लांबी  ५६,३२७  किमी.  आहे.  नानकिंग, वूहान  व  चुंगकिंग  ती  तीवरील  प्रमुख  बंदरे  आहेत.  १०,०००  टन  वजनाच्या  बोटी  किनाऱ्यापासून  आत १,१२६ किमी.  वरील  वूहानपर्यंत, तर २,०००  टन  वजनाच्या  बोटी  यीचंग  बंदरापर्यंत  ये-जा  करू  शकतात.  उन्हाळ्यात (मोसमी  पर्जन्याच्या  काळात)  पाण्याची  कमाल  पातळी असताना वूहानपर्यंत  १५,०००  टन  वजनाच्या  सागरी  बोटी, तर  यीचंगपर्यंत  ४,०००  टन  वजनाच्या  बोटी  जाऊ  शकतात.  लहान  होड्या  मात्र  पिंगच्युॲन  शहरापर्यंत  जाऊ  शकतात. घळ्यांमधील  जास्त  वेगाच्या  पाण्यातून  वाहतूक  करण्यासाठी  जास्त  क्षमतेच्या  खास  बोटी  वापराव्या  लागतात.  ⇨ ग्रँड  कालवा  ह्या  चीनमधील  व  जगातील  सर्वांत  प्राचीन  व लांब  कालव्याने  ह्‌वांग  हो  व  यांगत्सी  या  दोन  नद्या  एकमेकींना  जोडल्या  असून  हा  कालवाही  जलवाहतुकीस  उपयुक्त आहे.  यांगत्सीवर  वूहान (१९५६)  व  नानकिंग (१९६८) या  दोन  ठिकाणी  मोठे  लोहमार्ग-पूल  बांधले  असून  चुंगकिंग  येथे  व  सेचवान-यूनान  सरहद्दीवरील  कुनमिंगजवळही  पूल  आहेत.

यांगत्सी, तिच्या  उपनद्या  व  खोऱ्यातील  लहानमोठी  सरोवरे  मासेमारीसाठी  प्रसिद्ध  आहेत.  पाचशेपेक्षा  अधिक  जातीचे  मासे  येथे  सापडत  असून  त्यांपैकी  कार्प, ब्रीम, चिनी पर्च,   गॅपर्स, लँप्री, काळा व  पांढरा  आमूर, फ्लॅटफिश, स्टर्जन, रो  ह्या  जाती  महत्त्वाच्या  आहेत.

यांगत्सी  नदीचे  खोरे  सुपीक  असून  प्राचीन  काळापासून  शेतीच्या  दृष्टीने  विशेष  प्रसिद्ध  आहे.  चीनच्या  अ  र्थ  व्यवस्थेत  यांगत्सीला  अत्यंत  महत्त्वाचे  स्थान  असल्याने  यांगत्सीला ‘चीनचे  भाग्य’  असे  संबोधले  जाते.  तांदूळ  व  इतर  पिकांच्या  भरपूर  उत्पादनांमुळे  यांगत्सी  खोऱ्याला  ‘चीनचे  धान्याचे  कोठार’  म्हणतात.  तांदळाच्या  देशातील  एकूण उत्पादनांपैकी  ७०%  उत्पादन  या  खोऱ्यात  होते.  तांदळाशिवाय  कापूस, गहू, सातू, मका, कडधान्ये, अंबाडी, रताळी, वनस्पती तेले, चहा  ही  या  खोऱ्यातील प्रमुख  कृषी  उत्पादने  आहेत.  अपुऱ्या  व  अनियमित  पावसामुळे  कृत्रिम  रीत्या  पाणीपुरवठा  करावा  लागतो.  प्राचीन  काळापासून  यांगत्सीचा  जलसिंचनासाठी  वापर  केला  जात असून  खोऱ्यातील  बरेचसे  क्षेत्र  ओलिताखाली  आणलेले  आहे.  जलविद्युत्‌निर्मितीसाठीही  यांगत्सीला, तिच्या  उपनद्यांना  व  खोऱ्यातील  सरोवरांना  महत्त्वाचे  स्थान  आहे. चीनमधील  सर्व  नद्या  मिळून  एकूण  संभाव्य  जलविद्युत्‌निर्मितिक्षमतेपैकी  ४०%  म्हणजे  सु.  २,१७२  लक्ष  किवॉ.  इतकी  संभाव्य  जलविद्युत्‌निर्मितिक्षमता  यांगत्सीची  आहे. त्स्यूतान, यू  व  शीलिन  घळ्यांच्याजवळ  ही  क्षमता  जास्त (सु.  ४००  लक्ष  किवॉ.)  आहे.  यीचंगवर  ६  किमी.  वरील  घळईत  जलविद्युत्‌निर्मितीच्या  दृष्टीने  अत्यंत  योग्य  असे जगप्रसिद्ध  ठिकाण  आहे.  पूरनियंत्रण, जलसिंचन  व  जलविद्युत्‌निर्मितीसाठी  खोऱ्यात  अनेक  प्रकल्प  उभारण्यात  आले  आहेत.  शांघाय, नानकिंग, वूहान, चुंगकिंग  व चंगडू  ही  नदीखोऱ्यातील  १०  लाखांवर  लोकसंख्या  असलेली  प्रमुख  शहरे  आहेत.

लेखक : चौधरी, वसंत