मदीना : सौदी अरेबियातील इस्लाम धर्मीयांचे पवित्र स्थान. तांबड्या समुद्रावरील येन्बो बंदराच्या पूर्वेस २०० किमी. अंतरावर हे वसले असून दमात्कसच्या आग्नेयीस सु. १,२६० किमी. अंतरावर लोहमार्गावरील हे एक स्थानक आहे. प्राचीन काळी ‘यथरब’ ह्या नावाने ते ओळखले जाई. मुहंमद पैगंबरांचे मक्केहून या शहरी स्थलांतर झाल्यावर या शहराचे नाव पुन्हा बदलून ते ‘मदीनातुन्नाबी’ (पैगंबरांचे शहर) असे पडले. कालांतराने उपरिनिर्दिष्ट लांबलचक नावाचे संक्षिप्त रूप ‘मदीना’ हे प्रचारात आले. मुहंमद पैगंबरांनी मक्केहून मदीनेला इ. स. ६२२ मध्ये स्थलांतर केले आणि ह्याच ठिकाणी ते आपल्या मृत्यूपर्यंत (इ. स. ६३०) राहिले. म्हणूनच अखिल इस्लामी जगासाठी मक्केप्रमाणेच हे शहरदेखील एक पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध झाले. लोकसंख्या १,९८,१८३ (१९७४).

अरबी पठारावरील पश्चिम भागात मदीना शहर असून, या शहरा- पासून या पठाराचा भाग पश्चिमेकडे थेट तांबड्या समुद्रापर्यंत उतरत जातो. या शहराच्या सभोवार डोंगर आहेत. त्यामुळे शहराचा आसमंत पाण्याने समृद्ध असून येथील जमीनही सुपीक बनली आहे. मदीना हा पूर्वी मरूद्यानाचा भाग होता. या शहराच्या चारी बाजूंस एक उंच तटबंदी असून तीत नऊ दरवाजे आहेत. ह्या बाह्य तट- बंदीच्या आत आणखी एक कोटासारखा भाग आहे. मूळ मदीना त्यात वसले असून पूर्व भागात मुहंमद पैगंबरांची कबर आहे. पैगंबरांच्या कबरीव्यतिरिक्त मदीनेमध्ये त्यांची एक मशीदही आहे.ऑटोमन सुलतान दुसरा सलीम ह्याने (कार. १५६६-७४) या मशिदीला संगमरवरी दगडांनी व काचतुकड्यांच्या चित्राकृतींनी सुशोभित केले.१९५३ ते १९५५ च्या दरम्यान राजे सौद ह्यांनी या मशिदीची दुरूस्ती करून तिचे नूतनीकरण केले.

यहुदी लोकांनी येथे प्रथम आपल्या वसाहती स्थापन केल्या. मुहंमद पैगंबरांच्या आणि त्यानंतरच्या तीन खलीफांच्या काळात मदीना हे धार्मिक आणि राजकीय चळवळींचे केंद्रस्थान बनले होते. परंतु जेव्हा हजरत अली या चौथ्या खलीफाने आपली राजधानी कूफा येथे हलविली, तेव्हा वा शहराचे महत्त्व संपुष्टात आले. तरीही हजरत अलीचे सुपुत्र इमाम हसन यांनी आपली खिलाफत हजरत यांना सुपूर्द केली आणि मदीनेच्या शांत वातावरणात त्यांनी आपले उर्वरित आयुष्य घालविले. तद्वत इमाम मालिक-बिन अनस (मृत्यू इ. स. ७९५) ह्याने याच शहरी अखेरपर्यंत वास्तव्य करून आपले संपूर्ण जीवन धार्मिक ग्रंथांच्या निर्मितीसाठी खर्ची घातले. उमय्या आणि अब्वासी खिलाफतींच्या काळानंतर तुर्कांनी १५१७ मध्ये मदीनेवर आपला अंमल बसविला. त्यांनी १९०८ मध्ये दमास्कसपासून मदीनेपर्यंत लोहमार्ग सुरू केला. १९२५ मध्ये इब्न सौद ह्याने मदीना शहर जिंकून घेतले. १९६० मध्ये मदीना येथे विद्यापीठ स्थापन करण्यात आले. हेजॅझ या सुपीक प्रदेशात मदीना वसलेले असल्याने ह्या शहराच्या भागात धान्ये, भाजीपाला आणि द्राक्षे विपुल प्रमाणात पिकविली जातात. हे शहर प्रामुख्याने खजुरासाठी प्रसिद्ध असून खजूर व मेण येथून अनेक देशांना निर्यात केले जाते. खजूर उद्योगाप्रणाणेच बांधकामाचे सामान तयार करण्याचा उद्योगही येथे विकसित झालेला आहे.

नईमुद्दीन, सैय्यद