पारसनाथ : बिहार राज्याच्या हजारीबाग जिल्ह्यातील टेकडी आणि जैनांचे प्रसिद्ध तीर्थस्थान. हे पूर्व रेल्वेमार्गावरील गीरीदीह स्थानकाच्या नैर्ऋत्येस सु. ३० किमी. वर आहे. हा भाग सभोवतालच्या दामोदर व बराकर नद्यांच्या खोऱ्यात एकदम उंचावलेला असून याची समुद्रसपाटीपासून उंची १,३६६ मी. आहे. यात एक मध्यवर्ती अरुंद रांग असून नैर्ऋत्येकडे खडकाळ शिखरे आहेत. तसेच याच्या काही सोंडी उत्तरेकडे बराकर नदीपर्यंत पोहोचल्या आहेत.

याचे मूळ नाव समेत शिखर होते, परंतु जैनांचे तेविसावे तीर्थकर पार्श्वनाथ यांच्या नावावरून यास ‘पारसनाथ’ हे नाव पडले. या टेकडीवर दिगंबरपंथीय मंदिर, तर पायथ्याशी श्वेतांबरपंथीय मंदिर तसेच मधुवन उद्यान आहे. ब्रिटिशांनी १८५८ साली सैनिकी विश्रामधामासाठी याची निवड केली होती. जैनांच्या चोवीस तीर्थकरांपैकी अनेकांचे येथे निर्वाण झाल्याने जैनांचे हे तीर्थस्थान बनले आहे.

तावडे, मो. द.