ताम्रपर्णी नदी : तमिळनाडू राज्याच्या तिरुनेलवेली जिल्ह्यातून वाहणारी एक नदी. लांबी सु. १२८ किमी. जलवाहनक्षेत्र सु. ४,५२१ चौ.किमी. ही दक्षिण सह्याद्री (पश्चिम घाट) तील १,८६९ मी. उंचीच्या अगस्त्यमलई शिखराजवळ उगम पावून पूर्वेकडे वाहत जाऊन मानारच्या आखाताला मिळते. डोंगराळ भागातील हिच्यावरील एका धबधब्याजवळ वनतीर्थ हे पवित्र पण दुर्गम क्षेत्र आहे. पापनाशम् येथे ती पाच निसर्ग सुंदर धबधब्यांनी सपाटीवर येते. तेही एक क्षेत्र असून तेथे मोठे जलविद्युत् केंद्र आहे. नंतर ती अंबासमुद्रम्, तिरुनेलवेली, पालमकोटा, श्रीवैकुंठम् यांवरून समुद्राकडे जाते. अंबासमुद्रम्, पालमकोटा इ. ठिकाणी हिच्यावर महत्त्वाचे पूल आहेत. हिच्या त्रिभूज प्रदेशाच्या दक्षिणेस कायलपटनम् आहे. तेथे मार्को पोलो आला होता. पालमकोटाच्या ईशान्येस सु. ११ किमी. वर तिला सु. ७४ किमी. लांबीची चित्तार ही प्रमुख उपनदी मिळते. दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून हिला पावसाचे पाणी मिळत असल्यामुळे व हिचे खोरे अत्यंत सुपीक असल्यामुळे पंधराव्या शतकापासूनच हिचा उपयोग सिंचनासाठी विस्तृत प्रमाणावर होत आला आहे. हिच्यावर अनेक बांध-बंधारे पूर्वीपासूनच झालेले आहेत. ताम्रपर्णीच्या मुखाजवळ कोलकई ही पांड्य राजांची पहिली राजधानी होती, असे टॉलेमी म्हणतो. आता ते समुद्रापासून ८ किमी. आत आहे. कोलकई आणि कायलपटनम् ही बंदरे गाळामुळे निरुपयोगी झाली म्हणून पोर्तुगीजांनी तुतिकोरिन हे प्रमुख बंदर केले. ताम्रपर्णीच्या मुखाजवळ उत्तम शंख, शिंपले व मोती सापडत असत अशी ख्याती होती. ताम्रपर्णीच्या पात्रातील वाळू तांबूस रंगाची असल्यामुळे हिला ताम्रवर्णा म्हणत आणि हिचे स्थानिक नाव ताम्रवारी (वारि-पाणी) असे आहे. भागवतपुराण, वायुपुराण, वाल्मिकिरामायण इ. प्राचीन ग्रंथात ताम्रपर्णीचे गौरवपूर्ण उल्लेख आहेत.

क्षीरसागर, सुधा